कोकणात शिक्षक भरतीत स्थानिक उमेदवारांना ठेंगा

कोकणात शिक्षक भरतीत स्थानिक उमेदवारांना ठेंगा

सावंतवाडी - दीड - दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिली शिक्षक भरतीची निवड यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत स्थानिकांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली असून तब्बल ९० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त परजिल्ह्यांतील उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे येथील स्थानिकांची २०१० च्या भरतीसारखी निराशा झाली आहे. जिल्हास्तरावर होणारी भरती राज्यस्तरावरून होत असल्याने स्थानिकांना याचा फटका बसत आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये नोकरीला लागायचे आणि बदली करून घ्यायची हे प्रमाण अलीकडे खूप वाढू लागले आहे. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होते व येथील शाळा ओस पडतात. शिक्षक बदल्यांचे प्रमाण मोठे असल्याने यावर पर्याय म्हणून स्थानिक शिक्षकांना प्राधान्य देण्याची भूमिका रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने घेतली होती. 

स्थानिकांना प्राधान्य देण्याबाबतचे ठरावही जिल्हा परिषदेने केले होते; परंतु या ठरावांना केराची टोपली दाखवत पुन्हा एकदा राज्यस्तरावरून भरती करण्यात आली. त्यामुळे या भरतीतून स्थानिक डीएड, बीएडधारक हद्दपार झाले आहेत. २०१० च्या भरतीत रत्नागिरी जिल्ह्यात ११५७ जागांवर ३७ स्थानिकांची निवड झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हेच प्रमाण होते. त्यानंतर येथील डीएड, बीएडधारकांनी आंदोलने केली. लोकप्रतिनिधींनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला; परंतु शासनस्तरावर पाठपुरावा न झाल्याने हीच स्थिती २०१९ च्या भरतीत कायम राहिली आहे. 

सध्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात १ ते ५ साठी ४५४ जागा, तर ६ ते ८ साठी २०५ जागांवर भरती करण्यात येत आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ वी ते ८ वी गणित, विज्ञानसाठी २७८ शिक्षक भरण्यात येणार होते. यांपैकी १०२ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. यात स्थानिकांचे प्रमाण नगण्य असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ९० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त परजिल्ह्यांतील उमेदवार लवकरच रुजू होणार आहेत.

मुलाखतीशिवाय भरतीसाठी जाहिरातीनुसार ५ हजार ८२२ पदांची निवड यादी पवित्र पोर्टलवर शुक्रवारी जाहीर करण्यात आली. १३ ते २१ ऑगस्ट या काळात कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. राज्यात १२ हजार १४० पदे भरली जाणार आहेत. त्यांपैकी मुलाखतीशिवाय ९ हजार १२८ पदे भरली जात असून यांपैकी ९०८० पदे मुलाखतीशिवाय भरतीसाठी उपलब्ध होती. त्यांपैकी ५ हजार ८२२ पदांसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यांपैकी ३ हजार २५८ पदे रिक्त राहिली आहेत. ५ हजार ८२२ पदांपैकी जिल्हा परिषदेतील ३५३०, महानगरपालिकेतील १०५३, नगरपालिकेतील १७२ व खासगी प्राथमिक शाळांमधील १०६७ उमेदवारांची निवड सूची जाहीर करण्यात आली आहे.

सहावी ते आठवी या गटांत मुख्यत्वे इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांकरिता अर्हताप्राप्त उमेदवार उपलब्ध झाले नाहीत. 
त्यामुळे २३९२ पदे रिक्त राहिली आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमधील २३११, ऊर्दू ६९७, इंग्रजी २३७ असे पदावर पात्र उमेदवार मिळालेले नाहीत. हिंदी २७, कन्नड १२ आणि पालिकेच्या हिंदी माध्यमाची १३ अशीही पदे या यादीत रिक्त राहिली आहेत. यामध्ये आरक्षणनिहाय अनुसूचित जाती प्रवर्गातील ३६९, इतर मागासवर्गीय ३०१, एसईबीसी २३२, इडब्लूएस १६१, खुल्या गटातील ११६, भटक्‍या जमाती ब, क, व ड प्रवर्गातील २२७, विमुक्त जाती प्रवर्ग ८१ आणि विशेष मागास प्रवर्गातील ६५ पदांवर उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे मेरिट जास्त लागल्याने अनेकांची निराशा झाली आहे.

शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात असतानाही केवळ १२ हजार पदांची भरती करण्यात येत आहे. त्यातही विविध आरक्षणाचे उमेदवार न मिळाल्याने त्यातीलही जागा रिक्त राहत आहेत. परिणामी निवड यादीचे मेरिटही जास्त लागले. टीईटी, टेट यांसारख्या परीक्षा घेऊन भरती प्रक्रिया २ वर्षे लांबवली गेली. त्यातही स्थानिकांना न्याय मिळालेला नाही. तब्बल दोन वर्षे शासनाने झुलवत ठेवून डीएड, बीएडधारकांना देशोधडीला लावले आहे.
- भाग्यश्री रेवडेकर,
उपाध्यक्ष-कोकण डीएड, बीएडधारक संघटना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com