आडाळीत यासाठी स्थापन केली आहे स्थानिक संरक्षण समिती

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 August 2020

या प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रासाठी आडाळी ग्रामस्थांनी आपली सुमारे 650 एकर जमीन दिली आहे. एमआयडीसीच्यावतीने त्या जमिनीवर सपाटीकरण, अंतर्गत रस्ते वगैरे विकासकामे सुरु झाली आहेत.

कळणे ( सिंधुदुर्ग ) - आडाळी (ता. दोडामार्ग) येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने (एमआयडीसी) विकसित होत असलेल्या औद्योगिक क्षेत्रात नोकरी, रोजगार, व्यवसाय यामध्ये स्थानिक नागरिकांना प्राधान्य मिळण्यासाठी व स्थानिक लोकांचे हितरक्षण करण्यासाठी एखाद्या व्यासपीठाची आवश्‍यकता लक्षात घेऊन "घुंगुरकाठी-सिंधुदुर्ग' या शासन नोंदणीकृत सेवाभावी संस्थेच्या विश्‍वस्त मंडळाने "आडाळी एमआयडीसी स्थानिक लोकाधिकार संरक्षण समिती' स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी आज दिली. समितीमध्ये 12 जणांचा समावेश केला असून पराग गावकर हे समन्वयक, प्रवीण गावकर हे सचिव म्हणून काम करणार आहेत. 

श्री. लळीत म्हणाले, ""या प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रासाठी आडाळी ग्रामस्थांनी आपली सुमारे 650 एकर जमीन दिली आहे. एमआयडीसीच्यावतीने त्या जमिनीवर सपाटीकरण, अंतर्गत रस्ते वगैरे विकासकामे सुरु झाली आहेत. ही कामे पूर्ण होऊन वीजपुरवठा, पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते यांनी सुसज्ज असे औद्योगिक भुखंड उद्योजकांना येत्या वर्ष दोन वर्षात मिळण्याची शक्‍यता आहे. आडाळी औद्योगिक क्षेत्र हे केवळ आडाळी गावच नव्हे तर दोडामार्ग तालुक्‍यातील बेरोजगार युवक-युवती, लघुउद्योजक, कुशल व अकुशल कामगार, व्यापारी, वाहतुक व्यावसायिक व इतरांच्या विकासाची गंगोत्री ठरणार आहे. यामुळे येथे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या, व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत; मात्र याचा जास्तीत जास्त फायदा स्थानिकांना होणे अपेक्षित व आवश्‍यक आहे. यासाठी स्थानिक लोकांचे हितरक्षण करण्यासाठी एखाद्या व्यासपीठाची आवश्‍यकता लक्षात घेऊन "घुंगुरकाठी-सिंधुदुर्ग' ने संरक्षण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.'' 

""समितीच्यावतीने औद्योगिक क्षेत्रामध्ये भविष्यात येणाऱ्या उद्योगांमध्ये काम किंवा नोकरी करण्यासाठी आडाळी गावातील, पंचक्रोशीतील व दोडामार्ग तालुक्‍यातील इच्छुक कुशल व अकुशल बेरोजगार युवक-युवती, स्त्री- पुरुष यांचा माहितीकोश (डाटाबॅंक) तयार करण्यात येईल. आडाळी गावातील जे नागरिक आपला स्वतंत्र व्यवसाय सुरु करु इच्छित असतील (हॉटेल, खानावळ, फुडस्टॉल, किराणा दुकान, अन्य दुकाने, भाजीपाला दुकान, गॅरेज, रिक्षा, टेम्पो वाहतुक वगैरे) अशांचा माहितीकोश (डाटाबॅंक) तयार करण्यात येईल.'' 
- सतीश लळीत 

समितीतील अन्य सदस्य असे... 
अनंत नाडकर्णी (फोंडिये), अजित देसाई (कळणे), सुनीता भिसे (कळणे), शैलेश गावकर, गोविंद परब, सिद्धेश गावकर, पुंडलिक गावकर, कृष्णा सावंत, नारायण गावकर (सर्व रा. आडाळी), स्वप्नील ठाकुर (मोरगाव.). 

20 ऑगस्टपर्यंत अर्ज भरुन घेणार 
समितीने माहितीचा एक अर्ज तयार केला असुन इच्छुकांना हा नमुना आधार कार्ड क्रमांकासह भरुन द्यावा लागेल. हा अर्ज घुंगुरकाठी - सिंधुदुर्ग'च्या आडाळी येथील कार्यालयात उपलब्ध असुन तो समक्ष भरुन द्यावा लागेल. यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. 10 ते 20 ऑगस्ट या कालावधीत (रविवार वगळुन) घुंगुरकाठी भवन, आडाळी' येथे सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत भरुन द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Local Defense Committee Has Been Set Up In Adali