esakal | लॉकडाऊनमुळे सीमा बंद झाल्या अन् सिंधुदुर्गातील 'हे' दहा प्रकल्प अडचणीत
sakal

बोलून बातमी शोधा

Lock Down Affects On Mushroom Cultivation Project In Sindhudurg

श्री. देसाई हे उच्च शिक्षित आहेत. त्यांना मुंबई, पुणे येथे नोकरीच्या देखील संधी मिळाल्या होत्या. काही वर्षे त्यांनी मुंबईत नोकरी देखील केली; मात्र नोकरीच्या मागे न पळता आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा, असा विचार त्यांच्या डोक्‍यात आला.

लॉकडाऊनमुळे सीमा बंद झाल्या अन् सिंधुदुर्गातील 'हे' दहा प्रकल्प अडचणीत

sakal_logo
By
निलेश मोरजकर

बांदा ( सिंधुदुर्ग ) - सावंतवाडी तालुक्‍यातील डेगवे-फणसवाडी येथील युवा उद्योजक योगेश देसाई यांनी नोकरीच्या मागे न धावता कर्ज घेऊन गावातच अळंबी शेती प्रकल्प सुरू केला. अळंबीला गोव्यात मोठी मागणी असल्याने सुरुवातीच्या काळात या व्यवसायात त्यांनी जम बसविला; मात्र कोरोनाच्या संकटामुळे राज्यांच्या सीमा बंद झाल्याने कित्येक किलो तयार अळंबी जाग्यावरच राहून कुजून गेली. संपूर्ण व्यवसायच ठप्प झाल्याने या प्रकल्पासाठी घेतलेले कर्जाचे हप्ते फेडायचे कसे? असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. अळंबी प्रकल्प हा शेतीचा भाग असल्याने शासनाने आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे. 

श्री. देसाई हे उच्च शिक्षित आहेत. त्यांना मुंबई, पुणे येथे नोकरीच्या देखील संधी मिळाल्या होत्या. काही वर्षे त्यांनी मुंबईत नोकरी देखील केली; मात्र नोकरीच्या मागे न पळता आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा, असा विचार त्यांच्या डोक्‍यात आला. या विचारानेच त्यांनी 5 वर्षांपूर्वी मुंबई सोडून गाव गाठले. इतरांहून वेगळा काहीतरी व्यवसाय करण्याच्या उद्देशाने त्यांनी स्थानिक बाजारपेठ, व्यवसायाची प्रगती यावर अभ्यास केला. सिंधुदुर्ग जिल्हा हा कृषिप्रधान असल्याने शेतीपूरक व्यवसाय म्हणून त्यांनी अळंबी शेती प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला.

स्थानिक वित्तीय संस्थेकडून त्यांनी अर्थसहाय्य घेऊन व्यवसायास प्रारंभ केला. आपल्या अभ्यासपूर्ण ज्ञानाने त्यांनी या व्यवसायात अल्पावधीतच प्रगती देखील साधली. अनेक चढ-उतार त्यांनी पाहिले. लगतच्या गोवा राज्यात हॉटेलमध्ये अळंबीची मागणी असल्याने त्यांनी या व्यवसायात पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते. 

आपल्या व्यवसायात नुकताच कुठे त्यांनी जम बसवला होता; मात्र कोरोनाच्या वैश्‍विक महामारीने सर्व व्यवहार ठप्प झाले. लॉकडाऊनमुळे सीमा सील झाल्याने अळंबीला बाजारपेठ बंद झाली. सिंधुदुर्ग-गोवा सीमा गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असल्याने अळंबीचा तयार माल हा जाग्यावरच कुजून खराब झाला. यामुळे कर्ज घेऊन सुरू झालेला व्यवसाय डबघाईला आला आहे. 

जिल्ह्यातील अळंबी व्यावसायिक अडचणीत 
जिल्ह्यात अळंबी शेतीचे 10 प्रकल्प आहेत. त्यात सरासरी महिन्याकाठी एकूण 3 ते 3.5 टन मशरुम (अळंबी) चे उत्पादन घेण्यात येते. महिन्याची एकूणच अंदाजे उलाढाल 10 ते 15 लाखांच्या आसपास होते. स्थानिक बाजारपेठेत देखील अळंबीला मागणी आहे. कोरोना संकटात सापडल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या अळंबी प्रकल्पाला शासनाने अर्थसहाय्य करावे, अशी मागणी होत आहे. अळंबी शेतीसाठी व्यवसायिकांनी घेतलेले कर्जाचे हप्ते कसे फेडावे? हा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा आहे. शासनाने आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी अळंबी व्यवसायिकांनी शासनाकडे केली आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने सर्व टुरिझम हॉटेल, मॉल बंद आहेत. त्यामुळे अळंबीचा व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय नाही आहे. 

"" अळंबी ही आरोग्यासाठी हितकारक आहे. त्यामुळे या व्यवसायाला शासनाने आर्थिक पाठबळ देणे गरजेचे आहे. यामुळे व्यावसायिकांना लॉकडाऊनंतर पुन्हा नव्या जिद्दीने मशरूमचा व्यवसाय सुरु करता येऊ शकतो, शिवाय कोकणातील सुशिक्षित तरुणांना पुन्हा योग्य ती दिशा मिळेल. शासनाने या व्यवसायाला चालना देऊन होतकरू तरुणांना न्याय द्यावा. '' 
- योगेश कृष्णा देसाई, युवा उद्योजक 

 
 

loading image