esakal | कोकण : यंदाही पर्यटन हंगाम अडचणीत? निर्बंधांमुळे उलाढालीवर परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण : यंदाही पर्यटन हंगाम अडचणीत? निर्बंधांमुळे उलाढालीवर परिणाम

कोकण : यंदाही पर्यटन हंगाम अडचणीत? निर्बंधांमुळे उलाढालीवर परिणाम

sakal_logo
By
स्नेहल कदम

देवगड (सिंधुदुर्ग) : गतवर्षीप्रमाणचे यंदाच्या पर्यटन हंगामावरही कोरोनाचे सावट राहण्याची शक्‍यता आहे. कोरोनाने अधिक डोके वर काढल्यास पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू झाले आहेत. यामुळे यंदाही पर्यटन हंगाम अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. त्याचा एकूणच उलाढालीवर तीव्र परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

कोकण म्हटले की 'पर्यटन' असे समीकरण बनले आहे. जिल्ह्याचा विचार करता येथील किनारपट्टी भागातील स्वच्छ समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, विविध पर्यटन प्रकल्प पर्यटकांच्या दृष्टीने खास आकर्षण असते. धार्मिक पर्यटनाकडे अलिकडे कल वाढत चालल्याने त्यादृष्टीनेही वृध्दांची धडपड असते. शिवाय उन्हाळी हंगामात कोकण दौरा केल्याने मौजमजेबरोबरच खास कोकणी पदार्थांचा आस्वाद घेता येतो. आंबा, काजू तसेच विविध कोकणी पदार्थ खरेदी करता येतात. थेट शेतकरी ते ग्राहक अशी संकल्पनाही यातून वाढीस लागते. बागायतदाराच्या थेट बागेत जावून आपल्या पसंतीचे आंबे खरेदी करण्यामध्ये पर्यटकांना आनंद असतो. यातून कृषी पर्यटनाची संकल्पना पुढे आली.

अलिकडील काही वर्षे गोव्याप्रमाणे सिंधुदुर्ग किनारपट्टी पर्यटकांनी गजबजलेली असते; मात्र गेल्या दोन वर्षापासून पर्यटनावर कोरोनाचे सावट आहे. गतवर्षी लॉकडाउनमुळे पर्यटकांची मोठी अडचण झाली. पर्यटन हंगामावर मर्यादा आल्याने आपोआपोच येथील हॉटेल व्यवसाय मंदावले. आर्थिक उलाढाल मंदावल्याने त्याचा एकूणच उलाढालीवर परिणाम जाणवला. पर्यटन हंगाम अडचणीत सापडल्याने पुरक व्यवसायाची कोंडी झाली. त्यानंतर पावसाळी पर्यटनावरही मर्यादा आल्याने वर्षा पर्यटनही यंदा म्हणावे तसे बहरले नाही.

पुढे दिवाळी आणि वर्ष अखेरीस पर्यटकांनी कोकणात एकच गर्दी केली; मात्र आता कोरोनाचे पुन्हा सावट असल्याने पर्यटन हंगामावर त्याची टांगती तलवार राहण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास यंदाही उन्हाळी पर्यटन बहरण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे आतापासूनच हॉटेल तसेच निवास न्याहारी सुविधा व्यावसायिक चिंतेत आहेत. कोरोनाचे सावट दूर व्हावे, अशी अपेक्षा व्यावसासिक बाळगून आहेत.

इतर गुंतवणूकीवरही कोरोनाचे सावट

येथील आंबा, मासळी हंगामाबरोबरच पर्यटन हंगामाची मोठी उलाढाल असते. पर्यटकांच्या पसंतीनुसार "तंबू निवास आणि वूड हाऊस'ची सोयदेखील किनारपट्टी भागात होत आहे. त्यामुळे पर्यटन हंगामाच्या आशेने होणाऱ्या गुंतवणूकीवरही कोरोनाचे सावट असल्याचे चित्र आहे.