लाॅक डाऊनमुळे चौपदरीकरणाचे काम ठप्प

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

केसीसी बिल्डकॉन या कंपनीने केले होते. त्यानुसार चौपदरीकरण कामाची गती देखील वाढविण्यात आली होती; मात्र लॉकडाउनमुळे सर्वच कामे ठप्प झाली आहेत. 

कणकवली (सिंधुदुर्ग) - कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. यात महामार्ग चौपदरीकरणाचेही काम ठप्प आहे. महामार्ग विभाग पुन्हा काम सुरू करण्याचे पत्र देत नाही तोपर्यंत चौपदरीकरणाची कामे सुरू करता येत नसल्याचे ठेकेदार प्रतिनिधींकडून स्पष्ट करण्यात आले. सद्यःस्थितीत उड्डाणपूल, नद्यांवरील पूल आणि सर्व्हिस रोडची कामे ठप्प आहेत. लॉकडाउनमुळे मे अखेरपर्यंत चौपदरीकरण पूर्णत्वाचीही शक्‍यता मावळली आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी सर्वप्रथम राज्य सरकारने लॉकडाउन घोषित केले. त्यानंतर केंद्रानेही 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली. यात महामार्ग चौपदरीकरणाचेही काम बंद करण्यात आले आहे. दरम्यान, शासनाने राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाची कामे 1 एप्रिलपासून सुरू होतील असे जाहीर केले असले तरी त्याबाबतचे आदेश आले नसल्याने चौपदरीकरणाची उर्वरित कामे करता येत नसल्याची माहिती महामार्ग चौपदरीकरणाच्या ठेकेदार प्रतिनिधींकडून देण्यात आली. 

सिंधुदुर्गात खारेपाटण ते झाराप या 83 किलोमीटर टप्प्यामधील चौपदरीकरणाचे 90 टक्‍के काम पूर्ण झाले आहे. कणकवली शहरासह नांदगाव, कासार्डे येथील उड्डाणपूल, कुडाळ शहर, जानवली गावातील एक किलोमीटरचा भाग तसेच कसाल, जानवली, खारेपाटण या नद्यांवरील दुसऱ्या पुलांची कामे थांबली आहेत.

याखेरीज जानवली, साकेडी येथील अंडरपासची कामेही अपूर्ण स्थितीत राहिली आहेत. यातील कणकवली शहरातील उड्डाणपूल, खारेपाटण नदीवरील पुलांची कामे वगळता उर्वरित कामे मे 2020 अखेरपर्यंत करण्याचे नियोजन दिलीप बिल्डकॉन आणि केसीसी बिल्डकॉन या कंपनीने केले होते. त्यानुसार चौपदरीकरण कामाची गती देखील वाढविण्यात आली होती; मात्र लॉकडाउनमुळे सर्वच कामे ठप्प झाली आहेत. 

अनेक मजुरांनीही आपले गाव गाठले 
दिलीप बिल्डकॉन आणि केसीसी बिल्डकॉन या ठेकेदार कंपन्यांकडे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतील कामगार मोठ्या संख्येने आहेत. लॉकडाउननंतर यातील अनेक कामगारांनी मिळेल त्या वाहनाने आपले गाव गाठले आहे. तर जे कामगार इथेच थांबले आहेत, त्यांची त्या त्या भागातील बेस कॅम्पवर भोजन आणि निवासाची व्यवस्था केल्याची माहिती ठेकेदार प्रतिनिधींकडून देण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown impact road development work sindhudurg district