घरोघरी मासे विकून सोडवला उदरनिर्वाहाचा प्रश्‍न 

सकाळ वृत्तसेवा | Monday, 16 November 2020

कोरोनामुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत ; ग्राहकांचीही सोय 

पावस : बॅंकेचे कर्ज काढून रिक्षा व्यवसाय करीत असताना लॉकडाऊन झाल्यामुळे कोणतेही काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली. या विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी उदरनिर्वाहासाठी मच्छी व्यवसाय करण्याचा घेतलेला निर्णय पावस येथील रिक्षा व्यावसायिक नीलेश सुधाकर नार्वेकर यांना फायदेशीर ठरला. 

सुरुवातीला गवंडी काम करीत असताना तब्येतीला त्रास जाणवू लागल्यामुळे रिक्षा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे तब्येतीचे कारण मिटले. दिवसभर रिक्षा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. पण मार्चपासून कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते. रिक्षा बंद असल्याने उपासमारीची वेळ आली. अनलॉक झाल्यानंतरही कोरोनाच्या भितीने लोक बाहेर पडत नव्हते. त्यामुळे रिक्षा व्यवसायच संकटात आला.

हेही वाचा- ग्रामपंचायतीला कसे लुटले  त्याची सीडीच आपल्याकडेच

रिक्षा खरेदी करण्यासाठी कर्ज काढले होते. त्याचा हप्ता भरणे कठीण झाले. त्यामुळे काहीतरी करणे आवश्‍यक होते. त्यामुळे मच्छीमार जेटीवर जाऊन मच्छी खरेदी करून ती प्रत्येक गावागावात जाऊन विकण्याचा निर्णय केला. जेटीवर जाऊन खरेदी करण्यास सुरवात केली. सुरवातीला थोडा त्रास झाला. नंतर त्यातील गणित कळल्यानंतर त्या व्यवसायात पूर्णपणे उतरण्याचा निर्णय घेतला आणि सकाळी उठून मच्छी खरेदी करून गावांमध्ये ताजी मच्छी विकण्यास सुरवात केली. सध्या चांगल्या पद्धतीने व्यवसाय होत आहे. कारण गावातील अनेक लोक मच्छी खरेदीसाठी मच्छी बाजारांमध्ये जात होते. पण एसटीही बंद असल्याने त्यांना जाण्या-येण्याचा खर्च बघता मच्छी खाणे महाग पडत होते. प्रत्येक ग्राहकाला त्याच्या दारातच मच्छी उपलब्ध झाल्यामुळे मच्छी विक्री चांगली होते. अडचणीच्या काळात उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसताना मच्छी व्यवसायाने आपल्याला आधार दिल्याचे नीलेश नार्वेकर यांनी सांगितले.  

संपादन- अर्चना बनगे