Loksabha 2019 : ...अन् घरी गेल्यावर मातोश्रीवर फोन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

सुनील तटकरेंनी माझ्याच नावाचा उमेदवार उभा केला; पण त्याचा अर्ज आम्ही बाद केला. पण आज आणखी एक तटकरे निवडणुकीच्या रिंगणात आहे. यांच्या दुष्ट, कपटी राजकारणाला दुर्दैवाने याच भाषेत उत्तर द्यावे लागत आहे. राजकारणात आम्ही तुमचे बाप आहोत,

- अनंत गीते

गुहागर - ‘‘पूर्वी गुहागर नगरपंचायतीमध्ये ११ नगरसेवक राष्ट्रवादीचे होते, आता त्यांचा फक्त १ नगरसेवक राहिला. तरीही आमदार भास्कर जाधव प्रचारसभांमधून माझ्यावर मर्यादा सोडून टीका करत आहेत. गुहागरात टीका करायची व घरी गेल्यावर मातोश्रीवर फोन करायचे. आता सुधारला नाहीत तर, निवडणूक लढवायच्या लायकीचेही ठेवणार नाही.’’ असा इशारा रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अनंत गीते यांनी दिला. 

श्री. गीते यांनी रविवारी (ता. ७) गुहागर तालुक्‍यात पाच प्रचार सभा घेतल्या. गुहागर शहरातील सभा गांधी चौकात झाली. यावेळी बोलताना गीते म्हणाले, ग्रामीण भागातील सभा दृष्ट लागण्यासारख्या झाल्या. पालपेण्यात तर रखरखत्या उन्हात ग्रामस्थ, महिला बसल्या होत्या. इथेच उपस्थिती कमी आहे. पण त्याची चिंता मी करत नाही. नगरपंचायतीच्या निकालाप्रमाणेच गुहागर शहरातून मला मतदान होईल, याचा विश्वास आहे. 

सुनील तटकरेंनी माझ्याच नावाचा उमेदवार उभा केला; पण त्याचा अर्ज आम्ही बाद केला. पण आज आणखी एक तटकरे निवडणुकीच्या रिंगणात आहे. यांच्या दुष्ट, कपटी राजकारणाला दुर्दैवाने याच भाषेत उत्तर द्यावे लागत आहे. राजकारणात आम्ही तुमचे बाप आहोत,

- अनंत गीते

गुहागरात खरे तर मते मागण्याचीच गरज नाही. इतके उत्स्फूर्त वातावरण संपूर्ण मतदारसंघात आहे. पेण, अलिबाग विधानसभा मतदारसंघातून किमान ४० हजारांचे मताधिक्‍य मिळेल. गुहागरमध्ये १५ ते २० हजारांचे मताधिक्‍य मिळेल. त्यामुळे युतीचा खासदार पुन्हा दिल्लीत जाणार हे निश्‍चित आहे.  

यावेळी नगरविकास राज्यमंत्री रवींद्र वायकर, सचिन कदम, अशोक पवार, नीलेश मोरे,  पारिजात कांबळे, नीलिमा गुरव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मी एकमेव भाग्यवान खासदार
कोकणातील मी एकमेव भाग्यवान खासदार आहे. मला सलग ६ वेळा युतीचा खासदार म्हणून कोकणाने निवडून दिले. मध्यंतरी फिस्कटलेली युती  पुन्हा नव्या अध्यायाला सुरवात करत आहे. आज सोबत कोणीही नसेल तरी चिंता करू नका. रायगड जिल्ह्यात २३ तारखेला विषारी सापाला ठेचणार हे नक्‍की असे गीते यांनी सांगितले. 

Web Title: Loksabha 2019 Anant Geete comment