Loksabha 2019 : मालवण भाजपचा तुर्तास बहिष्कार

Loksabha 2019 : मालवण भाजपचा तुर्तास बहिष्कार

मालवण - रत्नागिरी येथे उद्या (ता.30) युतीचे उमेदवार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी तालुका भाजपला निमंत्रण दिले आहे; मात्र या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमास न जाता त्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय तालुक्‍यातील भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी घेतला आहे. त्यामुळे केवळ भाजप कार्यकर्त्यांच्या भावना पोचविण्यासाठी आपण उद्या रत्नागिरीला जाणार आहे असे भाजपचे तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

दरम्यान तालुक्‍यातील सी-वर्ल्ड प्रकल्प, पर्यटन विषयक धोरण, सीआरझेड, एलईडी, पर्ससीन मासेमारी, आचरा देवस्थान प्रश्‍न यासारखे प्रश्‍न उमेदवार विनायक राऊत यांनी आपल्या वचननाम्यात घेणे आवश्‍यक आहे. यावरील कार्यवाही झाल्यासच त्यांच्या प्रचारात उतरू अन्यथा पुढील भूमिका जाहीर केली जाईल असे जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

तालुक्‍यातील भाजपचे विभागीय अध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख, कोअर कमिटी, आघाडी अध्यक्ष यांची बैठक आज तालुका भाजपच्या कार्यालयात झाली. या बैठकीस तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर, बबलू राऊत, धोंडी चिंदरकर, रविकिरण तोरसकर, भाऊ सामंत, आप्पा लुडबे, गणेश कुशे, विनोद भोगावकर, समीर बावकर, भाई घाडीगावकर यांच्यासह तालुक्‍यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

श्री. केनवडेकर म्हणाले, ""युतीचा धर्म म्हणून मुख्यमंत्री, रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या आदेशानुसार काम केले जाईल; मात्र हे काम करताना कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान दुखविण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. खासदार राऊत यांच्याकडून विविध विकासकामांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करण्यात आला आहे. आमची सत्ता असताना विकासकामांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी केवळ समाजसेवा आणि त्यांचा प्रचार करायचा का? अशी कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्री व रवींद्र चव्हाण यांच्याकडे मांडण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील निर्णय जाहीर केला जाईल. तोपर्यंत उद्याच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमावर भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे प्रश्‍न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत राऊत यांच्या प्रचारात सहभागी होणार नाही. उद्याच्या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष म्हणून उपस्थित राहून कार्यकर्त्यांच्या भावना मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे विकासकामांसाठी आम्ही आमदार, खासदारांकडे भीक म्हणून फंड मागणार नाहीत. आमचे नेते रवींद्र चव्हाण, प्रसाद लाड हे निधी देण्यास सक्षम आहेत.''

श्री. मोंडकर म्हणाले, ""महत्त्वाकांक्षी सी-वर्ल्ड प्रकल्प, सीआरझेडचा प्रश्‍न, एलईडीची विध्वंसकारी मासेमारी यासह अन्य प्रश्‍नांवर खासदार राऊत यांनी आपली भूमिका मांडलेली नाही. त्यांनी आपल्या वचननाम्यात या प्रश्‍नांचा समावेश केल्यासच त्यांच्या प्रचारात आम्ही उतरू अन्यथा पुढील निर्णय जाहीर करू. युतीचा धर्म पाळण्याची जबाबदारी ही शिवसेनेची आहे कारण आम्ही युधिष्ठिराच्या भूमिकेत आहोत. शिवसेना आपल्या वचननाम्यात काय भूमिका मांडते यावरच पुढील दिशा ठरविली जाईल. शिवसेनेचे नितीन वाळके यांनी सोशल मिडीयावरून पंतप्रधान मोंदी यांच्यावर जी टीका टिपण्णी केली त्याचा आम्ही निषेध करत आहोत. त्यांनी याबाबत युतीचा प्रचार करण्यापूर्वी जाहीर माफी मागावी तसेच नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा.'' 

भाजपची ताकद शिवसेनेला दाखवू
तालुक्‍यातील बूथ रचनेचा आढावा घेऊन 121 बूथवर 1 बुथप्रमुख 25 कार्यकर्ते अशी रचना 5 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तालुक्‍यात भाजपचे किती कार्यकर्ते कुठल्या बूथवर आहेत ही ताकद आम्ही शिवसेना आमदार, खासदारांना दाखवून देणार आहोत. तालुक्‍यात कार्यकर्त्यांची 15 हजाराची व्होटबॅंक असल्याचे श्री. केनवडेकर यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com