Loksabha 2019 : मंडणगडात मताधिक्‍यावर खलबते 

Loksabha 2019 : मंडणगडात मताधिक्‍यावर खलबते 

मंडणगड - रायगड लोकसभा निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया काल पूर्ण झाली. तालुक्‍यातून कोणत्या उमेदवारास मताधिक्‍य मिळणार याची गणिते समीक्षकांकडून मांडली जाऊ लागली आहेत. निवडणूक कालावधीत सक्रिय झालेल्या विविध मतप्रवाहांपैकी मतदानावर कोणत्या मत प्रवाहाने सर्वाधिक प्रभाव टाकला आहे. यावरच आघाडीचे गणित ठरणार असल्याने विविध अंदाज बांधले जात आहे. 

2014 प्रमाणे या वेळेसही गीते विरुद्ध तटकरे अशी दुरंगी लढतच आहे. विकास विरुद्ध निष्क्रियता व सदाचार विरुद्ध भ्रष्टाचार या दोन मुद्यांवरच निवडणूक लढली गेली असली तरी युवा मतदार, जात फॅक्‍टर व त्याखालोखाल पक्षांच्या अजेड्यांनीही मतदारांवर मोठा प्रभाव टाकला आहे.

शिवसेनेचे तालुक्‍यातील मित्रपक्ष भाजप व रिपाइं यांची नाराजी व वंचित बहुजन आघाडीच्या अस्तित्वामुळे आंबेडकरी चळवळीतील मतांचे मोठ्या प्रमाणावर झालेले विभाजन किती प्रभाव टाकणार आहे याचा अभ्यास होऊ लागला आहे. 

गेल्या काही निवडणुकांतील कल लक्षात घेता पक्षीय विचारधारेला बांधल्या गेलेल्या पारंपरिक मतांचे ध्रुवीकरण गेल्या सहा महिन्यांपासून झालेले दिसून आले. पाच निवडणुकांमध्ये शिवसेनेने सातत्याने या तालुक्‍यातून मोठे मताधिक्‍य मिळवले आहे. मात्र गेल्यावेळी पाच हजार इतके कमी झालेले मताधिक्‍य शिवसेनेच्या चिंतनाचा विषय आहे.

दुसरीकडे गेल्या पाच वर्षात तालुक्‍यात विस्तार वाढविणाऱ्या राष्ट्रवादीने मतांची टक्केवारी वाढवत तालुक्‍यात पाच हजाराचे मताधिक्‍य कापून आपल्या उमेदवारास क्रमांक एकचा उमेदवार करण्याचे गणित यावेळी मांडले आहे. पारंपरिक मते एकगठ्ठा ठेवण्यात दोन्ही पक्षांना यश आल्याने विजयासाठी आवश्‍यक मतांची बेगमी करण्यासाठी दोन्ही आघाड्यांना मुंबईस्थिती चाकरमानी मतदारांवर अवलंबून राहावे लागले आहे. त्यामुळे मतदानाला मुंबईतून मतदारांनी भरलेल्या शेकडो गाड्या तालुक्‍यात दाखल झाल्या. या प्रवासाच्या कालावधीत मतदारांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागला. मतदारांची नाराजी कदाचित नजीक असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांना भोगावी लागणार आहे. 

मताधिक्‍य निसटते असण्याची शक्‍यता 
मतदानाचा निष्कर्ष काय निघणार आहे, यावर पैजाही लावल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकांतील मतदानाकरिता मतदारामंध्ये असलेले अनुत्साही वातावरण लक्षात घेता यावेळेचे तालुक्‍यातून क्रमांक एकचे उमेदवारास मिळणारे मताधिक्‍य निसटते असण्याची शक्‍यता अधिक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com