निवडणूक खर्चात विनायक राऊतांची आघाडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मे 2019

एक नजर

  • निवडणूक खर्चामध्ये महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांची आघाडी. 
  • राऊत यांचा ४६ लाख ९४ हजार ८६४ एवढा खर्च. 
  • महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नीलेश राणे २८ लाख ३६ हजार निवडणूक खर्च.
  • काँग्रेस आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा ७ लाख ३२ हजार एवढा निवडणूक खर्च. 

रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील बारा उमेदवारांनी निवडणूक विभागाला खर्च सादर केला. उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर ते १८ मार्चपर्यंतच्या निवडणूक खर्चात शिवसेनेचे विनायक राऊत यांनी बाजी मारली. त्यांनी ४६ लाख ९४ हजार खर्च केला. दुसऱ्या क्रमांकावर स्वाभिमानचे नीलेश राणे, तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आघाडीचे नवीनचंद्र बांदिवडेकर आहेत. 

बाराही उमेदवारांच्या खर्चाच्या पडताळणीसाठी निवडणूक निरीक्षक (खर्च) मंजुनाथ तागडी यांनी तीन बैठका घेतल्या. अखेरची बैठक २० एप्रिलला झाली. यावेळी उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून ते १८ एप्रिलपर्यंतच्या खर्चाचा ताळेबंद घातला. खर्चामध्ये महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी आघाडी घेत ४६ लाख ९४ हजार ८६४ एवढा खर्च केला आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नीलेश राणे २८ लाख ३६ हजार, तर काँग्रेस आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी ७ लाख ३२ हजार खर्च केला.

समाजवादी ब्लॉक पक्षाचे उमेदवार संजय शरद गांगनाईक यांचा २ लाख ५१ हजार अपक्ष नारायण गवस १ लाख ४१ हजार, वंचित आघाडीचे मारुती जोशी ८६ हजार, तर बसपाचे किशोर वरक यांनी ८८ हजार एवढा खर्च केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला ७० लाखापर्यंतची आहे. 

निकालाच्या दिवसापर्यंत खर्च 
लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना वेळेवर खर्च सादर करणे बंधनकारक आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक काळातील सभा, कॉर्नरसभा, सत्कार, मेळावे, बैठका, प्रचार वाहने, प्रसिद्धीपत्रके, जाहिरात, खानावळ आदी तपशीलवार माहितीसह खर्च सादर केला. विजयी मिरवणुकीचा खर्च देखील यामध्ये धरला जाणार आहे. त्यामुळे निकालाच्या दिवसापर्यंत उमेदवारांच्या खर्चाकडे लक्ष राहणार आहे.

खर्चाचे दरपत्रक निश्‍चित 
निवडणूक उमेदवाराला आपल्या खर्चाचा हिशेब निवडणूक शाखेकडे दर दिवसाला द्यावा लागतो. मतदरारसंघनिहाय निवडणूक खर्चाचे दरपत्रक निश्‍चित केले आहे. त्यामध्ये ४०० पेक्षा अधिक बाबींचा समावेश करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Ratnagiri SIndhudurg constituency