Election Results : राणेंच्या राजकीय पायाला धक्‍का

Election Results : राणेंच्या राजकीय पायाला धक्‍का

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला असला तरी यात कोकणात विस्तारलेल्या भाजपची झलक पहायला मिळली. या लढतीत नेते युतीशी किती प्रामाणिक होते यापेक्षा भाजपची मते मात्र मोदी फॅक्‍टरमुळे शिवसेनेच्या धनुष्याकडेच वळली. निष्क्रीय कॉंग्रेस-राष्ट्रवादीमुळे त्यांची मते स्वाभिमान आणि शिवसेना अशा दोन्हीकडे विभागली. येत्या विधानसभेची गणिते मात्र या आकडेवारीवर मांडणे धाडसाचे ठरेल. कारण पूर्ण बहुमतात असलेली भाजप युतीचा शब्द पाळणार की स्वतंत्र लढणार यावर कोकणातील गणिते ठरणार आहेत. या निवडणुकीतील पराभव नारायण राणेंसाठी मात्र त्यांच्या राजकीय पायालाच धक्‍का देणारा म्हणावा लागेल. 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निकाल तळकोकणातील नव्या राजकीय समिकरणांचा पट पुन्हा एकदा उलगडणारा ठरला आहे. पुढच्या विधानसभेत शिवसेना आणि भाजप याच पारंपरिक पक्षांमध्ये चढाओढ असेल असे चित्र आहे. आताच्या लढतीत युती विरूद्ध महाराष्ट्र स्वाभिमान अर्थात नारायण राणे असा सामना दिसला. यातही राणेंचा खुप मोठा पराभव झाला. कधीकाळी कोकणात साम्राज्य गाजवणाऱ्या कॉंग्रेस आणि त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे अस्तित्वही दिसले नाही.

पुढच्या विधानसभेत युती झाली तर राजकीय समीकरणे थोडीफार बदलतील. मात्र शिवसेना-भाजप आमने-सामने आल्यास येथील राजकीय चित्रच बदलून जाईल, अशी शक्‍यता आहे. राणेंसाठी हा पराभव खूप मोठा धक्‍का म्हणावा लागेल. कारण लोकसभेच्या राजकारणाचा विचार करता गेली पाच आणि पुढची पाच अशी 10 वर्षे स्पर्धेतून बाहेर रहाणे म्हणजे राजकीय दृष्ट्या खूप मागे पडल्यासारखे मानावे लागेल. 

या निवडणुकीत शिवसेनेला भरभरून मते मिळाली. यात युती फॅक्‍टर महत्त्वाचा ठरला. खरेतर पूर्ण देशाप्रमाणे कोकणातही मोदी फॅक्‍टर जोरात होता. गेल्या पाच वर्षांत सरकारने मोदींचे पद्धतशीर ब्रॅंडींग केले. उज्वला गॅससह इतर अनेक वैयक्‍तिक योजनांमधून लाभार्थींच्या खात्यात थेट पैसे जमा झाले. यातून गावोगाव मोदी पॅटर्न तयार झाला. याचा फायदा शिवसेनेला झाला.

मधल्या काळात शिवसेना-भाजपमध्ये दुरावा होता. या काळात नव्याने आलेल्या नेत्यांनी संघटना बांधणीवर बरेच काम केले. यामुळे जवळपास सहाही मतदारसंघात भाजपची मते वाढली. चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि सावंतवाडी मतदारसंघात भाजपची बांधणी चांगली आहे. त्याचा प्रभाव मतांच्या आकडेवारीवर दिसला. 

नारायण राणे शिवसेनेत असताना भाजपची ताकद केवळ गुहागर आणि देवगड मतदारसंघापुरती मर्यादित होती. तेथेही शिवसेनेला विधानसभेवेळी भाजपसाठी बळ वापरावे लागायचे. यामुळे भाजपची कोकणातील स्थिती बांडगुळासारखी झाली होती. शिवसेना नेतेही त्यांना उपकाराच्या ओझ्याखाली ठेवत असत. आज ही स्थिती नाही. गेल्या विधानसभेत स्वतंत्र लढल्यापासून भाजपने कोकणात पाय पसरले. त्याचा दृष्परिणाम या लोकसभेच्या निकालात दिसला. 

भाजपला आगामी विधानसभेत गृहीत धरून शिवसेनेला चालनार नाही. मोदींना मिळालेल्या बहुमताचा विचार करता युती होईलच, असे छातीठोकपणे सांगणे कठीण आहे. युती झाली तरी काही भागात भाजप जास्तीच्या जागा मागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढच्या काळात कोकणातही शिवसेना-भाजपमध्ये भाऊबंदकीचा वाद रंगण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

महाराष्ट्र स्वाभिमानसाठी हा निकाल खुप मोठा धक्‍का देणारा आहे. त्यांनी मांडलेली राजकीय गणिते आणि त्यासाठी आखलेले डावपेच कोसळून पडले. रत्नागिरी जिल्ह्यात संघटनात्मक फळी कमजोर असल्याचा फटका त्यांना बसला. त्यांची बरीचशी मदार तेथे राष्ट्रवादी, मनसे आदींच्या छुप्या पाठिंब्यावर होती; पण हा फॉम्यूला चालला नाही.

कॉंग्रेस निष्क्रीय असल्याने ती मते स्वाभिमानकडे वळतील असा अंदाज होता. प्रत्यक्षात स्वतः राणे भाजपचे खासदार आणि त्यांचा मोदींना पाठिंबा असल्याने कॉंग्रेसचा मतदार स्वाभिमानकडे वळण्याबाबत संभ्रमीत झाला. चिपळुणकडच्या भागात तर राष्ट्रवादी सक्रिय न राहिल्याने ही मते मोठ्याप्रमाणात शिवसेनेकडे वळली. त्यामुळे विधानसभेत ती त्यांच्याकडे राहतील असे नाही.

थोड्याफार फरकाने इतर मतदारसंघातही हीच स्थिती पहायला मिळाली. यामुळे पुढची गणिते आणखी वेगळी असणार आहेत. राणेंना सिंधुदुर्गात अपेक्षीत मते मिळाली नसली तरी झालेले मतदानही कमी नाही. कणकवली विधानसभेत मात्र त्यांना मिळालेले मताधिक्‍य विचार करायला लावणारे आहे.

सावंतवाडीमध्ये गेल्यावेळच्या तुलनेत मताधिक्‍य घटले असले तरी खुप मोठा फरक पडलेला नाही. कुडाळमध्ये मात्र गेल्या विधानसभेची तुलना करता चांगली स्थिती म्हणावी लागेल. असे असले तरी हा निकाल पुढच्या विधानसभेच्या दृष्टीने स्वाभिमानच्या मनोधैर्यावर परिणाम करणारा ठरणार आहे.

पुढच्या विधानसभेत उमेदवार कोण असणार आणि शिवसेना-भाजपची युती होणार की नाही? यावर त्यांच्या यश-अपयशाचा आलेख अवलंबून असेल. 
 
कणकवलीत नवी चुरस 
कणकवली विधानसभा मतदारसंघात कणकवलीसह वैभववाडी आणि देवगडचा समावेश होतो. हा राणेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. युतीच्या जागावाटपात येथे भाजपला संधी मिळते. यामुळे शिवसेनेची संघटना तुलनेत कमजोर आहे. या सगळ्या स्थितीमुळे स्वाभिमानला येथून किमान 40 हजार मताधिक्‍याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात 10 हजार 731 इतके मताधिक्‍य मिळाले. यामुळे स्वाभिमानच्या मजबुत संघटनात्मक फळीचा कितपत उपयोग झाला असा प्रश्‍न निर्माण होतो. विधानसभेत आमदार नितेश राणे यांना येथून मोठ्या विजयासाठी पुन्हा एकदा मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. गेल्या पाच वर्षांत येथे अरूण दुधवडकर यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीचा प्रयत्न केला. संदेश पारकर हे कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचा राजकीय बेस कणकवलीतच आहे. यामुळे पुढच्या विधानसभेत शिवसेना-भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी असणार आहे. येथे स्वाभिमानशीच मुख्य स्पर्धा असेल. 

अस्वस्थ कुडाळ 
गेल्या विधानसभेत कुडाळमधून खुद्द नारायण राणे यांचा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी पराभव केला. यानंतर येथील राजकारणच बदलले. नाईक यांनी गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघातील कुडाळ आणि मालवण तालुक्‍यात अनेक कामे मार्गी लावली. संघटनेला बळ देण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी नाईक यांच्याबद्दल पूर्ण मतदारसंघात आलबेल नाही याची झलक या निवडणुकीने दाखविली. येथे शिवसेनेला 8 हजार 193 इतके मताधिक्‍य मिळाले. इतर मतदारसंघाच्या तुलनेत जिल्हाप्रमुखाच्या भागात हा आकडा कमी म्हणावा लागेल. पारंपरिक मच्छिमारांशी दुरावलेले नाते, विशेषतः मालवण तालुक्‍यात स्वाभिमानला शह देण्यात आलेल्या मर्यादा ही यामागची कारणे आहेत. स्वाभिमानच्या बाजूनेही फारशी चांगली स्थिती नाही. त्यांचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांचा हा गड आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वाभिमानचे बडे नेते याच मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे कुडाळमधून स्वाभिमानला मोठ्या मताधिक्‍याची अपेक्षा होती, ती फोल ठरली. आगामी विधानसभेत येथून शिवसेनेचे तिकीट नाईक यांना मिळणार यात शंका नाही. भाजपकडे मात्र येथे फारसा सक्षम चेहरा नाही. या मतदारसंघात त्यांना संघटना बांधायलाही मर्यादा आल्या. स्वाभिमानकडून कोण लढणार याची मात्र उत्सुकता आहे. राणे कुटुंबातील कोणाही सदस्याने उमेदवारीवर दावा केल्यास पक्षातील इतर इच्छूक स्पर्धेत राहणार नाहीत. स्वतः राणे विधानसभा लढवणार असतील तर त्यांच्यासाठी कुडाळचा पर्याय आहे. अन्यथा दत्ता सामंत, सतीश सावंत, अशी नावे चर्चेत येवू शकतात. 
 
सावंतवाडीत भाजप विस्तारला 
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळच्या तुलनेत शिवसेनेचे मताधिक्‍य घटले. तरीही मिळालेले 29 हजार 378 इतके लिड कमी नक्‍कीच नाही. अर्थात यात विस्तारलेल्या भाजपच्या मतांचाही समावेश आहे. शिवसेनेची येथील संघटना पूर्णतः पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या नियंत्रणाखाली आहे. लोकसभेच्या प्रचारातही ही बाब ठळकपणे जाणवली. येथे गेल्या पाच वर्षांत माजी आमदार राजन तेली यांनी भाजपची संघटना वाढवली. केसरकर स्वतः मंत्री असले तरी तेली यांनी मुख्यमंत्र्यांशी असलेल्या जवळीकीचा उपयोग करत अनेक विकासकामांना स्पर्श केला. पूर्णवेळ संघटना बांधणीकडे लक्ष दिले. उलट केसरकर यांना मंत्रिपदावर असल्याने मतदारसंघात वेळ द्यायला अडचणी आल्या. यामुळे नाराजी निर्माण झाली. प्रचारसभांमध्ये घटलेली गर्दी ही नाराजी ठळकपणे दाखवत होती. मताधिक्‍य चांगले असले तरी त्यातील भाजपचा वाटा लक्षात घेता शिवसेनेसाठी विधानसभेची आकडेवारी काय असेल हे युतीच्या गणितावर ठरणार आहे. युती झाली तरी तेली या जागेवर दावा करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. युती झाली नाही तर होणारी लढत लक्षवेधी असू शकते. स्वाभिमानचे संजू परब हे विधानसभेचे दावेदार आहेत. त्यांनी या निवडणुकीत सावंतवाडी तालुक्‍यात पूर्ण ताकद लावून काम केले. अर्थात शिवसेना-भाजपच्या एकत्र येण्याने येथील समिकरणे बदलली. असे असलेतरी येथील कॉंग्रेसचे अधिष्ठान, शिवसेनेची परंपरागत ताकद याचा विचार करता निव्वळ राणे समर्थक म्हणून स्वाभिमानला मिळालेली 44 हजार 845 इतके मते कमी नक्‍कीच नाहीत. 
 
राजापूरात विधानसभेची वेगळी गणिते 
नाणारचा प्रभाव असलेल्या राजापूर मतदारसंघात मतदारांचा कौल अखेर शिवसेनेच्या बाजूनेच राहिला. येथे नाणारच्या विरोधामुळे स्वाभिमानला साथ मिळेल ही अपेक्षा फोल ठरली. मात्र या मतदारसंघात कॉंग्रेसची काही मते स्वाभिमानकडे वळल्याचा अंदाज व्यक्‍त केला जात आहे. येथे शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाचे पडसाद मतदानावर दिसतात का? असा प्रश्‍न होता. मात्र तसे झाले नाही. याठिकाणी भाजपची फारशी ताकद नसली तरी शिवसेना आणि स्वाभिमानमध्ये इतर दोन मतदारसंघाच्या तुलनेत मताधिक्‍याचा फरक कमी आहे. नाणार समर्थक असलेल्या पंढरी आंबेरकर यांना तालुक्‍यात अवघी 959 मते मिळाल्याने या प्रकल्पाबाबतचा जनाधारही उघड झाला. स्वाभिमानला मनसे, राष्ट्रवादीची छुपी मदत होईल अशी चर्चा होती; पण तसे काही घडले नाही. येथे राजन साळवी यांची उमेदवारी पक्‍की मानली जात आहे. येथे विधानसभेत राष्ट्रवादीच्या अजीत यशवंतराव यांच्याशी साळवी यांची मुख्य लढत असणार आहे. ते किंवा त्यांचा पक्ष या निवडणुकीत स्पर्धेतच नसल्यामुळे लोकसभेची गणिते विधानसभेच्या तुलनेत वेगळी असणार आहेत. 
 
रत्नागिरीत मनोधैर्य उंचावणारे मताधिक्‍य 
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उदय सामंत यांनी आपली ताकद दाखवली. याठिकाणी शिवसेनेला अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक मताधिक्‍य मिळाले. असे असले तरी येथे भाजपची संघटना मजबूत आहे. बाळ माने यांच्या रूपाने भाजपला सक्षम नेतृत्वही आहे. या लढतीत भाजपची मते शिवसेनेशी प्रामाणिक राहिली. त्यामुळे मताधिक्‍यात त्यांचा वाटाही मोठा आहे. येथे स्वाभिमानची निराशा झाली. मताधिक्‍यापेक्षाही कमी मते स्वाभिमानच्या पारड्यात पडली. त्यांनी रत्नागिरीकडे विशेष लक्ष केंद्रीत केले होते; पण त्याचा उपयोग झाला नाही. विधानसभेत युती न झाल्यास येथे मुख्य लढत शिवसेना-भाजपतच होण्याची शक्‍यता आहे. युती झाली तर मात्र दिग्गज नेत्यांची मनधरणी करण्याचे आव्हान पक्षश्रेष्ठींसमोर असणार आहे. हे मताधिक्‍य शिवसेनेचे मनोधैर्य उंचावण्याचे काम करणार आहे. 
 
चिपळूणात राष्ट्रवादी तटस्थ 
चिपळूणने स्वाभिमानला खूप मोठा धक्‍का दिला. वास्तविक माजी खासदार निलेश राणे यांनी या मतदारसंघात बरेच काम केले. प्रत्यक्षात येथे शिवसेनेला खूप मोठे मताधिक्‍य मिळाले. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस तटस्थ राहिली. ही मते स्वाभिमानकडे न वळता शिवसेनेकडी गेली. यामुळे त्यांचे मताधिक्‍य वाढले. शिवाय येथे तुषार खेतर यांनी भाजपची संघटना गेल्या पाच वर्षात बऱ्यापैकी वाढवली. त्याचाही फायदा शिवसेनेला झाला; पण विधानसभेत येथील गणिते पूर्ण वेगळी असणार आहे. राष्ट्रवादीचे शेखर निकम यांना मानणारा स्वतंत्र मतदार आहे. गेल्या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांनी निसटता पराभव केला होता. त्यावेळी भाजप फारशी सक्षम नव्हती. आता युती न झाल्यास येथील मतांची गणिते खुप मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. शिवाय शेजारच्या रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची झालेली सरशी शिवसेनेसाठी भविष्यात डोकेदुखी ठरू शकते. 
 
 मतदारसंघ.....विनायक राऊत.....निलेश राणे......मताधिक्‍य 
चिपळूण...........87630...........30397............57233 
रत्नागिरी........101259...........41700...........59,559 
राजापूर............71899............38144...........33,755 
कणकवली.........57093............67824...........10,731 
कुडाळ..............63909.............55716............8,193 
सावंतवाडी.........74233.............44845..........29,378 
पोस्टल मते.........2009..............1074...............935 
एकूण................458022........279700...........1,78,322 


"तीस वर्षांच्या कामात काही चुकले असेल तर जरूर नजरेला आणून द्या. आपली माफी मागू; मात्र काही चुकले नसताना, प्रामाणिकपणे व कशाचीही अपेक्षा न ठेवता मी जनतेची कामे करत राहिलो. अशा वेळेला माझ्या मुलांच्यावर राग व रोष नको. तुम्ही पराभवाची भेट मला दिली. माझा तुमच्यावर रोष नाही, रागही नाही; पण या निकालाचा विचार केल्यास भविष्यात कोकणात चांगले लोकप्रतिनिधी निर्माण होवू शकतील व कोकणचा विकास होईल का? याचा विचार करावा. पराभवाने खचणार नाही. परत उमेदीने जनतेच्या प्रश्‍नांसाठी व कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत राहू.'' 
- नारायण राणे,
संस्थापक, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष 

"माझ्या इतक्‍या मोठ्या विजयामागे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि कोकणवासीयांमधील प्रेमाचे नाते ते मुख्य कारण आहे. गेल्या पाच वर्षांत पंतप्रधानांनी सर्वसामान्यांसाठी केलेल्या कामाचा हा प्रभाव आहे. विजयाची खात्री होती. पाचही आमदार दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हा विजय सोपा झाला. हा शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. स्वाभिमान पक्ष हा एका कुटुंबाशी संबंधीत आहे. लोकांनी त्यांना या निवडणूक निकालातून पूर्णविराम दिला.'' 
- विनायक राऊत,
खासदार, शिवसेना  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com