Loksabha 2019 : भाजपच्या डरकाळ्या आता विरल्या हवेत

संदेश सप्रे
सोमवार, 1 एप्रिल 2019

देवरूख - साडेचार वर्षांच्या दुखण्यावर सेनेकडून अवघ्या दीड तासात मलमपट्टी केल्याने गेले काही दिवस सुरू असलेल्या भाजपच्या डरकाळ्या आता हवेत विरल्या आहेत. लॅंडमार्क ते स्वयंवर आणि तेथून पुढे मराठा मैदानात झालेली युतीची एकी ही याचेच द्योतक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

देवरूख - साडेचार वर्षांच्या दुखण्यावर सेनेकडून अवघ्या दीड तासात मलमपट्टी केल्याने गेले काही दिवस सुरू असलेल्या भाजपच्या डरकाळ्या आता हवेत विरल्या आहेत. लॅंडमार्क ते स्वयंवर आणि तेथून पुढे मराठा मैदानात झालेली युतीची एकी ही याचेच द्योतक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

एकमेकांविरोधात थेट खालच्या पातळीची टीका करून एकमेकांना पाण्यात पाहाणारे दोन मित्रपक्ष आता ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ असे गीत आळवू लागले आहेत. रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षांनी तर राऊतांबद्दलचे गैरसमज दूर झाल्याचे सांगत भाजपचा इरादा स्पष्ट केला. तिकडे सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षांनीही मवाळ भूमिका घेत खासदारांचे ‘लाड’ पुरवल्याची चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून शुक्रवारपर्यंत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून राऊत विरोधाच्या डरकाळ्या फोडल्या जात होत्या. काहींनी प्रसंगी दुसऱ्याला मदत करू, पण सेनेचे काम करणार नाही, असा विडाच उचलला होता. त्यामुळे भाजपचा असंतोष शिवसेना कसा शांत करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. 

शनिवारी महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी शक्‍तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी मराठा मैदानावर जंगी मेळावा झाला. त्यात भाजपचे नेते व्यासपीठावर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. या मेळाव्याआधी सुरवातीला हॉटेल लॅंडमार्कमध्ये, नंतर स्वयंवर मंगल कार्यालयात दोन मॅरेथॉन बैठका घेण्यात आल्या.

या बैठकांमध्ये चार वर्षांतील दुखण्यावर रामबाण मलमपट्टी केली. ही मलमपट्टी एवढी प्रभावी होती की साडेचार वर्षांचे दुखणे अवघ्या दीड तासात थांबले. दुखण्यावर इलाज झाल्यावर भाजपच्या नेत्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर सारा लवाजमा थेट मराठा मैदानावर आला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency