Loksabha 2019 : डॉ. नीलेश राणे यांच्या प्रचारात उतरले अख्खे कुटुंब

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

कणकवली - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला जन्माला घालून वर्ष-दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे; मात्र या पक्षाच्या माध्यमातून लोकसभेची पहिली निवडणूक लढण्यासाठी नारायण राणे आणि त्यांचे अख्खे कुटुंब थोरले पुत्र डॉ. नीलेश राणे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.

कणकवली - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला जन्माला घालून वर्ष-दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे; मात्र या पक्षाच्या माध्यमातून लोकसभेची पहिली निवडणूक लढण्यासाठी नारायण राणे आणि त्यांचे अख्खे कुटुंब थोरले पुत्र डॉ. नीलेश राणे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. सकाळी ११ वाजता प्रचारासाठी बाहेर पडून उशिरा पुन्हा आपल्या घरट्यात येणे, असा दिनक्रम राणे कुटुंबीयांचा सुरू आहे.

लोकसभा निवडणूक तारीख जाहीर झाल्यापासून राजकीय नेत्यांच्या घरांचे उंबरे झिजवणारे कार्यकर्ते आणि लोक मोठ्या संख्येने असतात. नेत्यांच्या घराकडची गर्दीही निवडणुकीच्या कालावधीत असते; परंतु याला अपवाद आहेत ते माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे. राणे आहेत हे समजल्यावर त्यांच्या येथील निवासस्थानावर सातत्याने लोकांची वर्दळ असते; पण निवडणुकीच्या काळात राणे कुटुंबीयांच्या घरामध्ये दिवसा शुकशुकाट असतो, याचे कारण म्हणजे सध्या हे अख्ख कुटुंब प्रचारात उतरले आहे.

कार्यकर्त्यांची मने जिंकण्यापासून मतदारांपर्यंत अजेंडा पोचवण्यासाठी प्रचंड वेळ खर्च करावा लागतो. आजारपणाची कुरकूर करून निवडणुका लढवता येत नाहीत. राणे कुटुंबीयांनी या सगळ्यावर मात करत गेल्या काही वर्षांत याच परिश्रमाच्या जोरावर विजय मिळवले. या खेपेला लोकसभेची निवडणूकही राणे कुटुंबीयांच्या दृष्टीने मोठा संघर्ष आहे. किंबहुना राजकीय जीवनातील त्यांची ही नव्याने लढाई सुरू आहे.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला जन्माला घालून राणेंनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे आव्हान उभे केले आहे. देश आणि राज्य पातळीवरील प्रस्थापित पक्षांना बाजूला सारून नव्याने मांडलेली ही चूल कायम पेटवत आणि धगधगत ठेवण्यासाठी लोकसभेला डॉ. नीलेश यांचा विजय आवश्‍यक आहे. यामुळे संपूर्ण राणे कुटुंबीय शहर आणि गाव पिंजून काढत आहेत.

स्वाभिमानचे उमेदवार नीलेश यांना रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी आहे तर आमदार नीतेश सिंधुदुर्गाची जबाबदारी घेऊन प्रत्येक तालुक्‍यात फिरत आहेत. नीलेश हे रत्नागिरीत गावागावांत पोचले आहेत. त्या त्या तालुक्‍यात वस्तीला राहून कार्यकर्त्यांशी आणि मतदारांशी संवाद साधणे, असे त्यांचे नियोजन आहे. तर सिंधुदुर्गात आमदार नीतेश प्रत्येक तालुक्‍यात वस्तीला राहून त्या-त्या गावातील मतदारांना भेटत आहेत. कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करून निवडणुकीचे ‘मायक्रो प्लॅनिंग’ करताना दिसत आहेत. 

आरोग्य सांभाळत प्रचार
नारायण राणे यांनी दोन्ही जिल्ह्यातील मोठ्या मोठ्या सभा घेतल्या तसे प्रत्येक तालुक्‍यातील आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटी घेऊन पक्षाचा अजेंडा पोचवण्याचे प्रयत्न करत आहेत. सकाळी ११ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत बैठका, लोकांशी संपर्क हा दिनक्रम आहे. हे सगळं करताना आरोग्याची काळजी घेताना दिसत आहेत.

नीलेश यांच्या विजयाचे ध्येय!
नीलम राणे यांनी महिलांचे मेळावे, बचत गट महिला मंडळाच्या सभा घेण्याचा धडाका सुरू केला आहे. पंचक्रोशी स्तरावर महिलांची एक सभा त्या घेत आहेत. घरातले काम उरकून त्या दुपारी बाराच्या दरम्यान बाहेर पडल्या तर रात्री उशिरा घरी येतात. १५ दिवसांत प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्याला आहेत; पण नीलेश यांचा विजय हाच उद्देश ठेवून प्रचारात गुंतल्याचे दिसून येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency