Loksabha 2019 : सुनील तटकरेंपुढे अडथळेच अधिक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मार्च 2019

गुहागर - रायगडमध्ये सुनील तटकरेंचा सर्वाधिक भरवसा रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांवर राहणार आहे. रायगड जिल्ह्यात समाजाचे गणित, कुटुंबातील वाद, बेभरवशाचा शेकाप व काँग्रेसचा छुपा विरोध, या गोष्टींना तोंड द्यावे लागणार आहे. याउलट रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांमधील राजकीय स्थिती तटकरेंसाठी अनुकूल ठरत आहे

गुहागर - रायगडमध्ये सुनील तटकरेंचा सर्वाधिक भरवसा रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांवर राहणार आहे. रायगड जिल्ह्यात समाजाचे गणित, कुटुंबातील वाद, बेभरवशाचा शेकाप व काँग्रेसचा छुपा विरोध, या गोष्टींना तोंड द्यावे लागणार आहे. याउलट रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांमधील राजकीय स्थिती तटकरेंसाठी अनुकूल ठरत आहे. 

रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे ४० पंचायत समिती सदस्य असून त्यानंतर शेकाप (३३), राष्ट्रवादी काँग्रेस (२४), काँग्रेस (१०) व भाजप (९) आहे. येथील भाजप कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. परंतु शेकापने राष्ट्रवादी व काँग्रेसबरोबर आघाडी केली असली, तरी जयंत पाटील व सुनील तटकरे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. शेकाप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीपेक्षा शिवसेना जवळची वाटते, हे लपून राहिलेले नाही. 

गेल्या पाच वर्षांत अनेक शेकाप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, हे त्याचेच द्योतक आहे. काँग्रेस व शेकाप यांच्यातही सख्य नाही. शेकाप आघाडीत सामील झाल्यापासून काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय गृहकलह व घराणेशाहीचे आरोपही तटकरेंच्या अडचणी वाढविणारे आहेत. त्यामुळेच रायगड जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघातून मताधिक्‍य मिळवण्यासाठी सुनील तटकरेंना मेहनत करावी लागणार आहे.

जिल्ह्यातील दोन मतदारसंघात सुनील तटकरेंना अनुकूलता आहे. दोन्ही ठिकाणचे आमदार राष्ट्रवादीचे आहेत. आमदार भास्कर जाधव हे सुनील तटकरेंना मदत करताना दिसतात. 

ही परिस्थिती ठरू शकते तटकरेंसाठी अनुकूल 
येथील माजी आमदार सूर्यकांत दळवी शिवसेना नेत्यांवर नाराज आहेत. त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनाविरोधी भूमिका घेतली होती. लोटे परिसरात शिवसेनेबाबत नाराजी आहे. भाजप कार्यकर्तेही अनंत गीतेंवर नाराज आहेत. ही परिस्थिती सुनील तटकरेंसाठी अनुकूल ठरू शकते. याच परिस्थितीचा फायदा घेत दापोली व गुहागर मतदारसंघातून मिळालेले मताधिक्‍य तटकरेंना विजयासाठी उपयोगी पडेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Sunil Tatkare further obstacles