अबब ! रत्नागिरी जिल्ह्यात शेतीचे पावणेचार कोटींचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

ऑक्‍टोबर 2019 मध्ये झालेला मुसळधार पाऊस आणि क्‍यार वादळाचा प्रभाव यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भात, नाचणीला मोठा फटका बसला. विधानसभा निवडणुकीमुळे पंचनामे करण्याचे आदेश उशिराने प्राप्त झाले.

रत्नागिरी - क्‍यार वादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने भात व नागलीचे 5,994 हेक्‍टरचे नुकसान झाले आहे. सोमवारपर्यंत (ता. 5) 5,070 हेक्‍टरचे पंचनामे पूर्ण झाले असून शेतीचे 3 कोटी 72 लाख 78 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील 33 हजार 642 शेतकरी यामध्ये बाधित झाले असून, 85 टक्‍के पंचनामे पूर्ण करण्यात यश आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकारांना दिली. 

ऑक्‍टोबर 2019 मध्ये झालेला मुसळधार पाऊस आणि क्‍यार वादळाचा प्रभाव यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भात, नाचणीला मोठा फटका बसला. विधानसभा निवडणुकीमुळे पंचनामे करण्याचे आदेश उशिराने प्राप्त झाले. त्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक यांची नेमणूक करण्यात आली. जिल्ह्यात भात व नागली लागवडीचे क्षेत्र 79,144 हेक्‍टर आहे.

कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार पावसामुळे 5, 994 हेक्‍टर इतके क्षेत्र बाधित झाल्याचे दिसते. बाधित शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यातील 835 गावांतील 28,533 शेतकऱ्यांचे पंचनामे सोमवारपर्यंत पूर्ण झाले होते. उर्वरित काम उद्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

पंचनामे करताना प्रत्यक्ष शेतातील उभ्या पिकांचे आणि काढणी पश्‍चात अशा दोन बाबींच्या वेगवेगळ्या नोंदी ठेवण्यात आल्या आहेत. त्यात काढणी पश्‍चात 8404 शेतकऱ्यांचे 1338 हेक्‍टरचे, तर 20,129 शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे 3,733 हेक्‍टरवर नुकसान झाले. सर्वाधिक फटका रत्नागिरी आणि राजापूर तालुक्‍याला बसला आहे. 

कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये, अशा सूचना कोकण आयुक्‍तांसह पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी भात कापून घरी नेले होते. पेंढा पाण्यात भिजल्यामुळे तो कुजून गेला होता. त्यासाठी शेतातच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या घरातील नुकसान झालेल्या पेंढ्यांचीही पाहणी केली. भात झोडल्यानंतर शेतकऱ्यांना अक्षरशः भुसा लागत आहे. भात कमी असल्याचे दिसत आहे. याची नोंद नुकसानी सर्व्हेत करावी, अशा सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो दिले ते ग्राह्य धरले जात आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of Agricultural Land Worth Rs 375 Cores in Ratnagiri