आवक कमी झाल्याने माशांच्या दरात वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

दापोली - जिल्ह्यात मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या हर्णै बंदरात मासळीची आवक कमी झाली असून त्यामुळे माशांच्या दरात वाढ झाली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या मत्स्याहारी पर्यटकांची पावले मत्स्याहारी जेवण देणाऱ्या हॉटेल्स, घरगुती खानावळीकडे वळली होती. मात्र त्यापैकी काही जणांना नाराज होण्याची वेळ आली.

दापोली - जिल्ह्यात मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या हर्णै बंदरात मासळीची आवक कमी झाली असून त्यामुळे माशांच्या दरात वाढ झाली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या मत्स्याहारी पर्यटकांची पावले मत्स्याहारी जेवण देणाऱ्या हॉटेल्स, घरगुती खानावळीकडे वळली होती. मात्र त्यापैकी काही जणांना नाराज होण्याची वेळ आली.

मच्छीमारीवरील शासकीय बंदी १ ऑगस्टपासून उठवली गेली असली तरी पावसाचा जोर असल्याने येथील मच्छीमार मासेमारीसाठी महिनाभर समुद्रात गेले नाहीत. या वर्षीचा मासेमारीचा मुहूर्त नारळी पौर्णिमेला सुरू झाला. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मिळालेल्या कोळंबी, बांगडे आणि इतर जातीच्या छोट्या माशांनी मच्छीमारांना तारले. तालुक्‍यात दिवाळीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देण्यास सुरवात करतात. याचवेळी स्थानिक हॉटेल्समध्ये मच्छी जेवणाची मागणी मोठ्याप्रमाणात वाढते. या वर्षी ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस थांबला आणि शेवटच्या आठवड्यात असलेल्या दिवाळीत पर्यटकाना योग्य दरात मच्छी उपलब्ध करून देण्यात येथील हॉटेल व्यावसायिकांना शक्‍य झाले.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आलेले पर्यटक पापलेट, सुरमई या आवडत्या मच्छीचा आस्वाद घेऊन तृप्त झाले. मच्छी हंगामापासून किरकोळ चढउतार असलेल्या पापलेट, सुरमई बांगडा आणि कोळंबीच्या दरात गेल्या चार दिवसांपासून वाढ झाली आहे. गेल्या आठ दहा दिवसांत मच्छीची आवक कमी झाल्याने दरांमध्ये वाढ झाल्याची माहिती येथील मच्छीमारांनी दिली.

मच्छीचा प्रकार               दर (किलोमध्ये)
पापलेट छोटी                       ३००
पापलेट मोठी                       १०००
सुरमई                               ६५०
कोळंबी  टायनी                     २५०
कोळंबी ।  व्हाइट                     ५५०

मच्छीच्या दरात गेल्या चार-पाच दिवसांपासून वाढ झाली आहे. मात्र आमच्याकडे येणारे ग्राहक नियमित स्वरूपात खास मच्छी जेवणासाठी येणारे असतात. वर्षअखेरीस मौजमजेसाठी आलेल्या पर्यटकांसाठी मच्छीच्या जेवणाचे दर वाढवलेले नाहीत.
- बाबू हेदुकर, हॉटेल व्यावसायिक दापोली

Web Title: The low growth rate of the incoming fish