ना मजुरीचा खर्च, ना मेटनन्सची चिंता ; दोनच तासांत करा साडेतीनशे भात पेंढीची झोडणी

राजेश कळंबटे | Monday, 2 November 2020

एक एचपीची मोटर बसून इलेक्‍ट्रिकवर झोडणी करणे शक्‍य झाले आहे.

रत्नागिरी : मजुरांच्या तुटवड्यामुळे भातशेतीवर होणारा खर्च कमी करण्यासाठी रत्नागिरीतील सोमेश्‍वरचे शेतकरी माधव करमरकर यांनी शक्‍कल लढवली आहे. भात झोडणीचा खर्च कमी करण्यासाठी टाकावू वस्तूंपासून टिकावू असे घरगुती झोडणी यंत्र बनवले आहे. घरातील पत्रा, लाकडाच्या फळ्या आणि लोखंडी रॉडच्या साह्याने झोडणी यंत्र तयार केले. त्याला एक एचपीची मोटर बसून इलेक्‍ट्रिकवर झोडणी करणे शक्‍य झाले आहे.

हेही वाचा - राणेंमुळेच केसरकरांचा उदय ः तेली -

चार माणसांचे काम एका व्यक्‍तीकडून अवघ्या काही तासात होत असून जोडीला वेळेसह पैशाची बचत करता येते. शेतकऱ्यांची भात झोडणी सुलभ व्हावी, यासाठी १८ हजारापासून भात झोडणी यंत्र विकत मिळते. वर्षातून एकदाच भात पीक घेतले असल्यामुळे ते यंत्र पुढे आठ महिने पडून राहते. यावर उपाय म्हणून सोमेश्‍वर येथील शेतकरी माधव करमरकर यांनी घरीच भात झोडणी मशीन बनविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जवळचे इलेक्‍ट्रीशियन मित्र परशुराम गोरे आणि सुतारकाम करणारे कमलाकर लिमयेंची मदत घेतली.

Advertising
Advertising

घरातील टाकवू पत्रा, फळ्या, लोखंडी रॉड एकत्र केले. लोखंडी स्टॅण्डवर बॅरलसारख्या दोन फळ्या जोडल्या. झोडणीसाठी बॅरलच्यामध्ये लाकडाचा चौकोन जोडला. शाप्ट फिरला की लाकडाचा चौकोनी भाग भाताच्या पेंडीवर आपटून ते झोडले जाते. वरच्या बाजूला पत्रा लावून तो भाग पॅकिंग केला. बॅरलच्या समोरच्या बाजूला पेंडी जाईल, एवढी मोकळी जागा ठेवली. त्याला एक एचपीची मोटर बसवून वीजेवर ते झोडणी यंत्र चालवणे सोपे जाते. झोडलेले भात एकत्र करण्यासाठी पत्रा आहे. त्यावर भात पडून ते मोकळ्या जमिनीवर गोळा होते. पेंढीचा तुस किंवा गवताचे तुकडे शाप्टच्या वाऱ्याने आपसूकच बाजूला पडतात.

हेही वाचा -  सुपारीला दर; पण रोगाचा फटका -

"दिवसा कापणी आणि रात्री उशिरापर्यंत झोडणी अशी कामे केली जातात; मात्र यंत्रामुळे कापलेले भात सायंकाळी वेळ मिळेल तसे झोडले जाते. अंगमेहनत कमी झाली आहे. दोन तासात साडेतीनशे पेंढी भात झोडले जाते. ३ ते ४ कामगारांवर होणारा हजार ते दोन हजारांचा खर्चही वाचतो. यासाठी विजेचे येणारे बिल तेवढाच खर्च होतो."

- माधव करमरकर, शेतकरी, सोमेश्‍वर

 

संपादन - स्नेहल कदम