मराठी माध्यमातून शिक्षण देणारा मदरसा

अजय सावंत
शुक्रवार, 19 जुलै 2019

कुडाळ - मराठीतून शिक्षण देणाऱ्या पिंगुळी गोंधयाळे येथील मदरशातील विद्यार्थीसंख्या वाढत आहे. येथे धार्मिक शिक्षणाबरोबरच मराठीतून प्राथमिक शिक्षण दिले जाते. मुलांमध्ये देशभक्ती जागविण्याबरोबरच शिस्तबद्धतेचे धडे दिले जात असल्याचे फलाह ए उम्मत या चालक संस्थेचे अध्यक्ष मुश्‍ताक शेख यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

कुडाळ - मराठीतून शिक्षण देणाऱ्या पिंगुळी गोंधयाळे येथील मदरशातील विद्यार्थीसंख्या वाढत आहे. येथे धार्मिक शिक्षणाबरोबरच मराठीतून प्राथमिक शिक्षण दिले जाते. मुलांमध्ये देशभक्ती जागविण्याबरोबरच शिस्तबद्धतेचे धडे दिले जात असल्याचे फलाह ए उम्मत या चालक संस्थेचे अध्यक्ष मुश्‍ताक शेख यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

जिल्ह्यात पिंगुळी गोंधयाळेसह झाराप, विजयदुर्ग, दोडामार्ग- भेडशी, हरकुळ बुद्रुक, देवगड अशा ठिकाणी मदरसे आहेत. गोंधयाळे वगळता अन्य चार ठिकाणी फक्त धार्मिक शिक्षण दिले जाते.

याबाबत माहिती देताना श्री. शेख म्हणाले, ‘‘मदरसा यावर्षी दहाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. पाच मुलांपासून सुरुवात केली. आज ६० मुले याठिकाणी आहेत. आमचा मुख्य उद्देश धार्मिक शिक्षण देणे हा आहे. ते आम्ही देतो; पण महाराष्ट्रात राहत असल्याने मराठी यायलाच हवी. म्हणून मदरशामध्ये या धार्मिक शिक्षणाबरोबरच शालेय शिक्षण दिले जाते. जिल्हा परिषद शाळेत शिकवले जाणारे सर्व मुख्य विषय या मदरशांमध्ये शिकवले जातात. स्वतःचे शिक्षक ठेवून शालेय शिक्षण देण्याचे काम १० वर्षांपासून सुरू आहे. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण येथे मदरशांमध्ये साजरे केले जातात. मुलांच्या मनामध्ये देशाभिमान जागृत झाला पाहिजे हा उद्देशही मदरशांमधून साकारला जात आहे.’’

ते म्हणाले, ‘‘आमच्याबाबत जे चुकीचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो आम्ही या माध्यमातून पुसण्याचा प्रयत्न करीत आहोत. आमची संस्था १३ कमिटी मेंबरची आहे. इस्लाममध्ये जकात असते. जकात म्हणजे आमच्या समाजात एखाद्याचा व्यवसायात एक लाखाचा धंदा झाला त्या रकमेच्या अडीच टक्के रक्कम किंवा जमा रकमेवरील व्याज हे गरीब मुलांना दिले जाते. मदरशांमध्ये गरीब मुलं शिकत असतात ती रक्कम त्या मुलांवर खर्च केली जाते. आता शालेय शिक्षण सुरू झाल्यामुळे जिल्हाभरातील इतर मुले याठिकाणी येऊ लागली आहेत. गरीब मुलांबरोबरच इतर मध्यमवर्गीय चांगल्या कुटुंबातील मुलेही या मदरशांमध्ये सहभागी होऊ लागली आहेत. ज्याची मुले सधन कुटूंबातील आहेत त्यांच्याकडून आपण दरवर्षाला फक्त दोन हजार रुपये एवढा ठराविक खर्च घेतो; मात्र गरीब मुलांना पूर्णपणे मोफत शिकवले जाते. या मदरशांमध्ये सोलर सिस्टम, संगणक शिक्षणाची व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे आदी सुविधा आहेत. मुलांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच शिस्तीचे धडेही दिले जातात. देशभक्तीचे संस्कार केले जातात.’’

हा मदरसा नुकताच नवीन जागेत दिमाखात स्थलांतरीत झाला. गोंधयाळे येथे एक एकर जागा खरेदी केली. तेथे भव्य इमारत संस्थेच्या नावाने बांधली आहे. कॉम्प्युटर लॅब, वाचनालय, डायनिंग हॉल आदी सुविधा तेथे आहेत. मदरशात पहिली ते दहावीपर्यंत वर्ग आहेत.
- मुश्‍ताक शेख,
अध्यक्ष, फलाह ए उम्मत संस्था.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madarsa giving education in Marathi Medium special story