माधव भांडारी म्हणाले, 'या' रागातून नागरिकत्व कायद्याला विरोध

Madhav Bhandari Comment On Oppose To NRC Sindhudurg Marathi News
Madhav Bhandari Comment On Oppose To NRC Sindhudurg Marathi News

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - या देशात नोटाबंदीमुळे ज्यांना खरोखर नुकसान झाले त्याच दु:ख व राग आज नागरिकत्व कायद्याच्या विरोधाने समोर येत आहे अशी टिका भाजपचे प्रवक्‍ते माधव भांडारी यांनी आज येथे केली; मात्र या कायद्याबाबत सुरू असलेला अपप्रचार हा धांदात खोटा असुन एकही भारतीय या कायद्याशी संबंध येत नसुन पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानमधुन निर्वासित अल्पसंख्यांकांशी संबंधित आहे. त्यामुळे अपप्रचारावर कोणीही विश्‍वास न ठेवता या कायद्याचा अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले.

भारतीय नागरिकत्व हा संपुर्ण देशाचा कायदा आहे. कोणत्याही एका राज्याला याबाबत वेगळी भुमिका घेता येत नाही, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. केंद्राने लागू केलेल्या एनआरसी, सीएए कायद्याच्या समर्थनार्थ देशप्रेमी नागरिकांच्या वतीने आज येथील बॅ नाथ पै सभागृहात आयोजित व्याख्यानात श्री. भांडारी बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, विश्‍व हिंदू परिषदेचे अजित फाटक, हिंदू जनजागरण समितीचे संदेश गावडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, उमेश कोरगावकर, निशांत तोरसकर, बाळ पुराणिक, स्वागत नाटेकर आदी होते.

भांडारी म्हणाले, ""1954 पासून तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी आसाममध्ये "एनआरसी'ला सर्वात प्रथम सुरवात केली. यामुळे आसाममध्ये होणाऱ्या घुसखोरांची संख्या समजली. त्यानंतर नोंदणी रजिस्टरचे काम थांबवले गेले; मात्र याविरोधात तेथील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांच्याशी करार करत एनआरसी ताबडतोब सुरू केली. 2009 मध्ये कॉंग्रेस सत्तेत असताना संपूर्ण देशभर हा कायदा लागू करण्यात आला; मात्र काही सुधारणा व दुरुस्ती वगळता या कायद्याबाबत सध्या अस्तित्वात नसलेला मुद्दा उपस्थित केला जात असून लोकांची दिशाभूल केली जात आहे. 9 डिसेंबरला भारतीय नागरिकत्व सुधारणा विधेयक देशाच्या लोकसभेत, त्यानंतर राज्यसभेत दोन्ही संसदेत बहुमताने संमत झाले. त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरीही झाली; मात्र काही दिवसानंतर या कायद्याला विरोध करण्यासाठी मोर्चा, निदर्शने, आंदोलनांना सुरवात झाली आहे. जे लोक या कायद्याला विरोध करत आहेत त्यापैकी 90 टक्‍के लोकांना आपण विरोध का व कशासाठी आहे हेच माहिती नाही. त्यांची पूर्णपणे दिशाभूल करून चुकीच्या कल्पना डोक्‍यात भरवून हा विरोध घडवून आणला जात आहे.''

ते पुढे म्हणाले, ""या कायद्याला विरोध करणे म्हणजे देशाच्या संविधानाला देशाच्या सार्वभौमत्वाला विरोध करतोय हे लक्षात घ्या. भारताच्या सीमाना लागून असलेल्या पाकिस्तान, आसाम, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशातील धार्मिक अल्पसंख्याक यावर अत्याचार झाल्यामुळे भारतात आश्रयासाठी यावे लागते. त्यांना नागरिकत्व देण्याची तरतूद आम्ही केली. ही दुरुस्ती भारतातील एकाही नागरिकांसाठी केलेली दुरुस्ती नाही.''

श्री. तेली म्हणाले, ""हा कायदा अस्तित्वात आला त्याचवेळी दोन्ही सभागृहाने याला मंजूरी दिली होती; मात्र काही लोकांनी याला विरोध करतांना राजकारण केले. यामध्ये कॉंग्रेस, डाव्या पक्षाचा समावेश असुन दोन गट निर्माण करण्याचा यांचा प्रयत्न आहे; मात्र सत्तेसाठी हिंदूत्वाचा विषय कसा बाजूला केला जातो हे मुख्यमंत्र्याच्या विधानावरून दिसुन आले; मात्र याबाबत येथील जनतेने जागृत राहून विरोध मोडून काढण्यासाठी प्रयत्न करावे.''

अजित फाटक व संदेश गावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान या कायद्याच्या विरोधात शहरात रॅली निघाली तेव्हा याचे समर्थन करणारा बॅनर घेऊन उभ्या राहणाऱ्या स्वागत नाटेकर व त्यांना समर्थन देणाऱ्या निशांत तोरसकर यांचा सत्कार भांडारी यांच्या हस्ते करण्यात आला.

समर्थन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागरिकत्व कायद्याला समर्थन म्हणुन येथील पालिकेच्या शिवउद्यान येथून रॅलीचे आयोजन केले होते. याला मोठा प्रतिसाद मिळाला. या रॅलीमध्ये साडेतीनशे फुुट तिरंगा हातात घेऊन भारत माता जय, मेरी आन मेरी जान हिंदूस्तान, एन आरसीचे करे समर्थन भारतमातेचे करे रक्षण, हिंदुस्तान अंगार है पाकिस्तान भंगार है अशा घोषणा देत रॅली शहरातील सालईवाडा बाजारपेठ ते गांधीचौक मार्गे बॅ नाथ पै अशी झाली.

आम्ही कोणाच्याही विरोधात नाही

या कार्यक्रमाचे आयोजक निशांत तोरसकर म्हणाले, ""आम्ही कुठल्याही धर्माच्या व जातीच्या विरोधात नाही; मात्र आम्ही विरोधात आहोत ते एका विशिष्ठ अपप्रवृत्तीच्या. ही प्रवृत्ती आपले राजकीय वजन वाढविण्यासाठी हात पाय पसरवित आहे; मात्र या प्रवृत्तीला हद्दपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com