बिरवाडीमध्ये धुमाकूळ घालणारे चोरटे मध्यप्रदेशचे; दोघांना अटक

poice-theft.jpg
poice-theft.jpg

महाड : बिरवाडी व काळीज परिसरात शनिवारी 13 जुलैला पहाटे धुमाकूळ घालत साडेपाच लाखांचा ऐवज लूटून गेलेल्या दरोडेखोरांपैकी दोघांना खेड पोलिसांनी 13 जुलैला नाकाबंदी दरम्यान पकडले आहे. महाड पोलिसांनी या दोघांना अटक करुन ताब्यात घेतले असून या परिसरात चोऱ्या करणारी ही टोळी मध्यप्रदेशातील असल्याचे उघड झाले आहे.

महाड शहर, बिरवाडी तसेच औद्योगिक परिसरात गेली महिनाभरापासून सातत्याने चोऱ्या होत आहेत. शहरातील इमारतीमधील फ्लॅट फोडण्याच्या घटना वाढल्या आहेत त्यातच, बिरवाडीत 13 जुलैला पहाटे दरोडेखारांनी धुमाकुळ घातला. बाजारपेठेतील महालक्ष्मी ज्वेलर्स हे सराफाचे दुकान चोरट्यांनी फोडून या ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. बिरवाडीतील श्री कॉलनी परिसरातील विठोबा सावंत यांच्या घराच्या खिडकीचे ग्रील तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत दरोडा टाकून चार हजाराचा ऐवज लंपास केला. परंतु सावंत कुटुंबीयांना जाग आल्याने त्यांनी व शेजारी असलेल्या बालाजी तनपूरे या नागरिकाने चोर चोर अशी आरडाओरड केल्याने त्यांच्यावर चोरट्यांनी दगडांचा मारा केल्याने ते जखमी झाले. नागरिकांच्या भितीने येथून पळालेल्या चोरट्यांनी काळीज गावांमधील सीताराम मोरे कॉम्प्लेक्सला लक्ष्य केले. या इमारतीत बंद असलेल्या तीन सदनिकेत दरोडा घातला. यामध्ये सखाराम बाबू साळुंके यांच्या घरातील एक लाखाची रोख रक्कम व पंधरा तोळे सोन्याचे दागिने असा 5 लाख 41 हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केले. नागरिकांच्या भितीने पोबारा केलेल्या चोरट्यांचा ग्रामस्थांनी पाठलागही केला. 

दरम्यान, या दरोड्यातील दरोडेखोर या प्रकरणानंतर पळून गेल्याचे बिनतारी संदेश सर्वत्र पसरवण्यात आले होते.दोन मोटारसायकलवरुन सहा जण खेडच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कशेडी पोलीस चौकीदरम्यान पोलिसांना पाहताच या चोरांनी दुचाकी रस्त्यात टाकून जंगलातून पळ काढत कशेडीच्या पलीकडे महामार्गावर निघून रिक्षा पकडली. तेथून ते खेडला जात असताना पोलिसांनी रिक्षातून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथून देखील नदीतून पळ काढत असताना दोघेजण पोलिसांच्या हातात सापडले तर, एक जण पसार झाला. 

महाड पोलीस उपविभागीय अधिकारी अरविंद पाटील माणगाव पोलीस उपविभागीय अधिकारी शशीकिरण काशीद, महाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.एम.मधाळे, यांनी या चोरांना खेड येथून ताब्यात घेतले. खेड येथून या दोन चोरांना महाड येथे आणले आहे. दिनेश धनसिंग अलावा व जितेश भवसिंग मनलोई ही दरोडेखोरांची नावे असुन हे दोघेही मध्यप्रदेशातील आहेत. या दोघांसह अन्य अन्य चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळून गेलेल्यांचा शोध सुरु असून महाड मधील इतर गुन्ह्यात देखील या चोरांचा समावेश असण्याची शक्यता आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात विठोबा सावंत व रंजना साळुंखे यांनी तक्रार दाखल केली आहे. चोरीच्या अन्य एका गुन्ह्यात या चोरांचा समावेश सी.सी.टी.व्ही.मध्ये दिसून आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पळून जाताना वापरलेली दुचाकी देखील चोरीची असून ती बिरवाडी जवळील खरवली गावातील चंद्रकांत पवार यांची असवी असा अंदाज आहे.दुचाकी चोरीची तक्रार पवार यांनी दाखल केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com