चक्रीवादळाच्या तडाख्यात 'या' पर्यटन केंद्राचे नुकसान

प्रशांत हिंदळेकर
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

क्‍यार चक्रीवादळ निवळल्याने पर्यटन व्यावसायिकांमध्ये उत्साह दिसून आला; मात्र क्‍यार पाठोपाठ आलेल्या महा चक्रीवादळामुळे त्यांच्या उत्साहावर पुन्हा विरजण पडले. केवळ एक ते दोनच दिवस काही ठराविक पर्यटकांनीच जलक्रीडा प्रकारांचा आस्वाद घेण्यास भेट दिल्याचे दिसून आले.

मालवण - क्‍यार चक्रीवादळाचा मोठा फटका किनारपट्टीतील पर्यटन व्यवसायाला बसला आहे. देवबाग येथील त्सुनामी आयर्लंड हे केंद्रच समुद्राला आलेल्या उधाणाच्या तडाख्यात उद्धवस्त झाले आहे. 

जलक्रीडा व्यावसायिकांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काही ठिकाणे विकसित केली होती. यात देवबाग येथील त्सुनामी आयर्लंड या केंद्रांचा समावेश होतो. पण चक्रीवादळामुळे समुद्री उधाणाच्या तडाख्यात हे पर्यटन केंद्र उद्ध्‌वस्त झाले. यात बऱ्याच जलक्रीडा व्यावसायिकांच्या होड्यांचेही नुकसान झाले आहे.

क्‍यार चक्रीवादळ निवळल्याने पर्यटन व्यावसायिकांमध्ये उत्साह दिसून आला; मात्र क्‍यार पाठोपाठ आलेल्या महा चक्रीवादळामुळे त्यांच्या उत्साहावर पुन्हा विरजण पडले. केवळ एक ते दोनच दिवस काही ठराविक पर्यटकांनीच जलक्रीडा प्रकारांचा आस्वाद घेण्यास भेट दिल्याचे दिसून आले. आता दिवाळी सुटीच्या टप्प्यात पर्यटक दाखल होत असल्याचे चित्र किनारपट्टी भागात आहे. 

ऐन दिवाळीत आलेल्या या चक्रीवादळामुळे राज्यभरातील पर्यटकांनी केलेले आगाऊ आरक्षण रद्द केल्याने त्याचा मोठा फटका किनारपट्टी भागातील पर्यटन निवासाच्या व्यवस्थेस बसला. निवास व्यवस्थेसह जलक्रीडा व्यवसाय, हॉटेल व्यवसायांनाही याची झळ बसल्याने सुमारे 80 टक्के अर्थकारण कोलमडल्याचे दिसून आले. 

कोकणी शेतकरी आदित्यनां म्हणाला, आत्महत्येशिवाय पर्याय नायं 

जिल्ह्याच्या अर्थकारणात मासेमारीबरोबरच गेल्या काही वर्षात पर्यटन व्यवसाय महत्त्वपूर्ण राहिला आहे. मात्र नैसर्गिक आपत्तीचा तडाख्यात मासेमारीबरोबरच पर्यटन व्यवसायातील संकटेही वाढल्याचे चित्र किनारपट्टी लगतच्या तालुक्‍यात पहावयास मिळत आहे. तालुक्‍याच्या किनारपट्टी भागात पूर्व परंपरागत मासेमारी हा एकमेव व्यवसाय होता. यावरच मच्छीमार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत होता.

कालांतराने मत्स्यदुष्काळाची समस्या, रोजगाराची भेडसावत असलेली समस्या पाहता मच्छीमार समाजातील तरूण पिढी पर्यायी व्यवसाय म्हणून पर्यटन व्यवसायात उतरली. अनेक तरुणांनी स्कूबा, स्नॉर्कलिंगचे प्रशिक्षण घेत आपल्या भागात पर्यटकांसाठी सुविधा निर्माण केली. स्कूबा, स्नॉर्कलिंगपाठोपाठ बनाना राईड, जेट स्की, पॅरासेलिंग यासारखे साहसी जलक्रीडा प्रकारांचा आनंद पर्यटकांना घेता यावा यासाठी या व्यवसायातही तरुणांनी उडी घेत प्रगती करण्यास सुरवात केली. यात गेल्या सहा सात वर्षात किनारपट्टी भागातील पर्यटन बहरले असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

गेल्या तीन चार वर्षात समुद्रातंर्गत होत असलेल्या बदलांचा मासेमारीसह किनारपट्टी भागातील पर्यटन व्यवसायालाही मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. सर्वसाधारणपणे ऑक्‍टोबर ते मे महिना असा किनारपट्टी भागात जलक्रीडा व्यवसाय चालतो. यावर्षीच्या पर्यटन हंगामाची सुरवात निराशाजनकच राहिली. गणेशोत्सव काळात पडलेला मुसळधार पाऊस, समुद्र खवळलेला राहिल्याने जलक्रीडा प्रकार, किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा बंद राहिली. त्यामुळे दिवाळी सुटीत चांगला व्यवसाय होईल अशी जलक्रीडा व्यावसायिकांना अपेक्षा होती; मात्र त्यांच्या अपेक्षेवर क्‍यार चक्रीवादळाने पाणी फिरविले.

आता इअर एंडवर मदार

निवासव्यवस्थेपाठोपाठ हॉटेल व्यवसायालाही चक्रीवादळाचा फटका हंगामात बसल्याचे दिसून आले. मासळीची आवक घटल्याने मत्स्य खवय्यांना म्हणाव्या त्या प्रमाणात मासळीचा आस्वाद लुटता आला नाही. शिवाय दिवाळी सुटी असूनही म्हणावे तसे पर्यटक येथे दाखल झाले नाहीत. त्यामुळे दिवाळीत गजबजणारी हॉटेल्स काही ठिकाणी ओस पडल्याचे चित्र होते. एकंदरीत निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका या पर्यटन हंगामात व्यावसायिकांना बसला आहे. आता डिसेंबर महिन्यात तरी येथील पर्यटन बहरेल अशी अपेक्षा व्यावसायिक बाळगून आहेत.

व्यवसायीकांचे नुकसान तीन कोटींच्या घरात

दिवाळी सुटीत येथील पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी तारकर्ली, देवबाग, वायरी भुतनाथसह अन्य किनारपट्टी भागातील निवासाची व्यवस्था पर्यटकांनी एक महिना अगोदरच आरक्षित करून ठेवल्याचे चित्र होते; मात्र क्‍यार चक्रीवादळाची माहिती मिळाल्याने पर्यटकांनी आगाऊ केलेले आरक्षण रद्द करत येथील पर्यटनाकडे पाठ फिरविली. त्यामुळे याचा मोठा फटका निवास व्यवस्थेला बसला. यात पर्यटन व्यावसायिकांचे सुमारे 2 ते 3 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सुटीतील शेवटच्या टप्प्यात आता काही पर्यटक दाखल होत असल्याने या पर्यटन व्यावसायिकांना काही दिलासा मिळाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maha Cyclone Kyarr Affects Tourism In Konkan