मुंबई-गोवा महामार्गासाठी अडीच महिन्यांत भूसंपादन - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

महाड - मुंबई-गोवा महामार्गाच्या विकासासाठी आवश्‍यक असलेले भूसंपादनाचे काम अडीच महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली.

महाड - मुंबई-गोवा महामार्गाच्या विकासासाठी आवश्‍यक असलेले भूसंपादनाचे काम अडीच महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली.

महाडजवळील सावित्री नदीवरील पुलाचे उद्‌घाटन केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज करण्यात आले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. कोकणाचे भाग्य बदलू शकेल, अशा प्रकारे तेथील रस्ते आणि महामार्गाचा विकास करण्यात येत आहे. कोकण विकासासाठी केंद्राकडून येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला राज्य सरकार सर्व प्रकारचे सहकार्य करील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यापर्यंतचा रस्ता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव असलेल्या आंबवडेपर्यंतच्या रस्त्याच्या कामाची सुरवात झाल्याबद्दल समाधान व्यक्त करताना, या दोन्ही कामांना विशेष महत्त्व असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या वेळेआधीच पुलाचे काम पूर्ण केले, हीच खरी पूल दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली आहे, अशा भावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी म्हणाले, ""महाराष्ट्र सरकारने मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादन पूर्ण करून दिल्यास चौपदरीकरणाचे कामही डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. कोकणात साडेचार हजार कोटी रुपयांची महामार्गाची कामे सुरू होणार आहेत.'' मुंबई- गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर तेथील विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. हा महामार्ग म्हणजे कोकणचा आत्माच आहे, असेही गडकरी म्हणाले. पुलाचे बांधकाम करणारे अधिकारी, सावित्री पूल दुर्घटनेत मदतकार्य करणारे अधिकारी, दुर्घटना प्रथम पाहणारा आणि मदत करणारा बसंतकुमार, एसटी कर्मचारी यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

आश्‍वासन पूर्तता
मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळील सावित्री नदीवरील पूल 2 ऑगस्ट 2016 च्या रात्री कोसळून मोठी जीवितहानी झाली होती. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी हा पूल 6 महिन्यांत बांधण्याची ग्वाही दिली होती. या पुलासाठी 35 कोटी 77 लाख रुपये खर्च आला.

सावित्री नदीवरील पुलाची वैशिष्ट्ये
खर्च 35. 77 कोटी रुपये
कालावधी : 165 दिवस
रुंदी : 16 मीटर
लांबी : 239 मीटर
आपत्कालीन यंत्रणा आणि विजेची पुरेशी व्यवस्था
Web Title: mahad konka news land acquisition for mumbai-goa highway