चौकशी, कारवाई अद्याप गुलदस्त्यातच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

नऊ महिन्यांनंतर चौकशी आयोगाकडून पाहणी; सरकारी अनास्थेचे ४० बळी
महाड - मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गावर सावित्री नदीवरील पूल २ ऑगस्ट २०१६ च्या मध्यरात्री कोसळल्याने मोठा हाहाकार माजला होता. हा पूल बांधायला घेतल्यापासून १६५ दिवसांत पूर्ण करण्यात आला असला तरीही या अपघाताची कारणे, जुन्या पुलाबाबतची चौकशी आणि दोषींवरील कारवाई अद्याप गुलदस्त्यातच आहे. 

नऊ महिन्यांनंतर चौकशी आयोगाकडून पाहणी; सरकारी अनास्थेचे ४० बळी
महाड - मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गावर सावित्री नदीवरील पूल २ ऑगस्ट २०१६ च्या मध्यरात्री कोसळल्याने मोठा हाहाकार माजला होता. हा पूल बांधायला घेतल्यापासून १६५ दिवसांत पूर्ण करण्यात आला असला तरीही या अपघाताची कारणे, जुन्या पुलाबाबतची चौकशी आणि दोषींवरील कारवाई अद्याप गुलदस्त्यातच आहे. 

सावित्री नदीवर १९२८ मध्ये ब्रिटिशकालीन दगडी कमानीचा पूल बांधलेला होता. अकरा कमानी असलेला १८० मीटर लांबीचा हा पूल २ ऑगस्ट २०१६ ला रात्री साडेअकरा वाजता कोसळला. यादरम्यान कोकणातून मुंबईकडे जाणारी तीन वाहने सावित्री नदीच्या पात्रात बुडाली. यामध्ये जयगड येथून मुंबईकडे जाणारी व राजापूर येथून बोरिवलीकडे जाणाऱ्या दोन एसटी बस; तर मुंबईकडे जाणाऱ्या तवेरा गाडीचा समावेश होता. या वाहनातून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर येथे दहा दिवस मदतकार्य व शोधकार्य सुरू होते.

अपघाताची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेली होती. सरकारने या अपघाताच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश एस. के. शहा आयोगाची नेमणूक केली. या आयाेगाने अपघाताच्या तब्बल ९ महिन्यांनंतर १२ मे रोजी दुर्घटनाग्रस्त पुलाची पाहणी केली. जुना सावित्री पूल वाहून जाण्यामागील कारणे, घटना नैसर्गिक आपत्तीमुळे की मानवी चुकीमुळे घडली, याची पडताळणी करणे, दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करणे, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना सुचवण्याची जबाबदारी ही आयोग पार पाडणार आहे. रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नवा पूल बांधण्याची घोषणा केली होती. त्यानुसार निविदा निघाल्यापासून सहाच महिन्यांत नवा पूल बांधण्यात आला आहे. 

राज्य सरकारने २० ऑगस्टला केंद्राकडे याबाबत प्रस्ताव पाठवला. तातडीने फक्त ११ दिवसांमध्ये केंद्राने प्रक्रिया पूर्ण केली आणि २ सप्टेंबर २०१६ ला नवीन पूल बांधण्याची निविदाही प्रकाशित झाली. १ डिसेंबरला निविदा उघडल्यानंतर पुण्याच्या ‘टी अँड टी इन्फ्रास्ट्रक्‍चर’ कंपनीला त्याचे कंत्राट मिळाले. त्यानंतर १५ डिसेंबरला कामाचे आदेश (वर्क ऑर्डर) दिली गेली. १५ जून २०१७ पर्यंत म्हणजे सहा महिन्यांत पुलाचे काम पूर्ण करण्याची अटच त्यामध्ये घालण्यात आली. फक्त १६५ दिवसांमध्ये म्हणजे ३१ मे २०१७ ला हा पूल तयार झाला आहे.

पुलाबाबतचे प्रश्‍न अनुत्तरितच
कोसळलेल्या जुन्या पुलाजवळ महामार्ग विभागाने १९९६ मध्ये नवा पूल बांधलेला होता; परंतु केवळ कोकणात जाणारी वाहने या पुलावरून जात होती. तरीही जुन्या पुलावरून वाहतूक का सुरू होती? जुना पूल वाहतुकीला का बंद करण्यात आला नाही व याला जबाबदार कोण? अशा प्रश्नांची उत्तरे अजूनही बाकी आहेत.

Web Title: mahad konkan news savitri over bridge inquiry