जयघोषाने रायगड शिवमय!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

महाड - राजपुरोहितांचे मंत्रोच्चार सुरू झाल्यावर शिवरायांच्या मूर्तीला सुवर्ण नाणी, जल आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. तुतारीची ललकार झाली, ढोल - ताशांच्या गजरात आणि खांद्यावर भगवा ध्वज घेऊन "जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष करणाऱ्या मावळ्यांनी रायगडाचा परिसर दुमदुमून गेला. रायगडावर मंगळवारी (ता. 6) अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे युवराज संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक दिन सोहळा झाला. त्यानिमित्त संपूर्ण रायगड शिवमय झाले होते.

या वेळी युवराज शहाजीराजे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, सेवानिवृत्त कोकण महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख, राष्ट्रसेवा समूह संघटनेचे अध्यक्ष राहुल पोकळे, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनोज आखटे यांच्यासह देशभरातून लाखो शिवप्रेमी उपस्थित होते. मंगळवारी सकाळी नगारखान्याजवळ संभाजी राजे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

Web Title: mahad konkna news shivrajyabhishek sohala on raigad