
महाविकास आघाडीकडून स्नेहल जगताप यांना उमेदवारी देण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात महाडच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल, हे आता स्पष्ट झालंय.
Mahad : राजकारणात मोठी उलथापालथ; काँग्रेसला धक्का देत माजी आमदाराची कन्या करणार ठाकरे गटात प्रवेश
महाड : माजी आमदार माणिक जगताप (Manik Jagtap) यांच्या कन्या आणि महाडचं नगराध्यक्षपद भूषविलेल्या काँग्रेसच्या स्नेहल जगताप या आता शिवसेना ठाकरे गटात (Shivsena Thackeray Group) प्रवेश करणार आहेत.
महाडच्या चांदे क्रीडांगणावर शनिवारी (ता. 6) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचं स्नेहल जगताप (Snehal Jagtap) यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
महाडचा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचा बालेकिल्ला असल्यानं त्यांची राजकीय कोंडी करण्याची रणनीती उद्धव ठाकरे गटाकडून सुरू आहे. महाविकास आघाडीकडून स्नेहल जगताप यांना उमेदवारी देण्याचे संकेतही मिळत आहेत.
अनेक वर्षे काँग्रेस पक्षासोबत असलेल्या स्नेहल यांचा ठाकरे गटातील प्रवेशाच्या वृत्तामुळं राजकीय खळबळ उडाली आहे. या पत्रकार परिषदेला माजी आमदार माणिक जगताप यांचे भाऊ हनुमंत जगताप, माजी नगराध्यक्ष संदीप जाधव, राजेंद्र कोरपे, धनंजय देशमुख, श्रीधर सकपाळ, माजी नगरसेवक वजीर कोंडीवकर व सुदेश कळमकर उपस्थित होते. आपण घेतलेला निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच घेतल्याचं स्नेहल यांनी या वेळी स्पष्ट केलं.
स्नेहल यांचं नाव उद्धव ठाकरे गटाकडून आमदारकीचे उमेदवार म्हणून घेतलं जात आहे, मात्र महाविकास आघाडी करून उमेदवारी मिळाली नाही तर आपली भूमिका काय असेल अशी विचारणा केली असता, आमचा निर्णय कोणत्या स्वरूपात बदलणार नसल्याचं सुनील जगताप यांनी स्पष्ट केलं.

महाडच्या राजकारणात उलथापालथ
शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी महाड मतदारसंघामधून तीन वेळा विजय मिळविला. यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं व त्यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड झाली होती. शिंदे गटातील आमदारांना कोणत्याही स्थितीत पराभूत करण्याची रणनीती विरोधकांकडून सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना महाड मतदारसंघात रंगेल. मात्र, ठाकरे गटाकडं आमदार गोगावले यांना टक्कर देऊ शकेल, असा चेहरा नसल्यानं महाविकास आघाडीकडून स्नेहल जगताप यांना उमेदवारी देण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात महाडच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल, हे आता स्पष्ट झालंय.
माणिक जगताप यांचे विचार पुढे घेऊन कामे करणार
काँग्रेस पक्षाशी आमचे कोणतेही मतभेद नाहीत, तसेच पक्षात नेहमीच सन्मानाची वागणूक दिली. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनतेची समाजोपयोगी कामे करता येतील, या दृष्टीने शिवसेनेत प्रवेश करीत आहे. वडील माणिक जगताप यांचे विचार पुढे घेऊनच आपण जनतेची कामे करणार आहे.
-स्नेहल जगताप, माजी नगराध्यक्षा