मच्छीमार वादाचे 'मोहोळ' जानकरांनी उठविले

शिवप्रसाद देसाई
सोमवार, 22 मे 2017

“मत्स्योद्योगमंत्री जानकर यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्विकारण्याचा सल्ला पारंपारिक मच्छीमारांना दिला आहे. तो पाळायला आम्ही तयार आहोत. फक्त त्यांनी समुद्रात आधुनिक तंत्रज्ञान वापरून मासे तयार करून दाखवावेत.”
- रविकीरण तोरसकर, सदस्य, नॅशनल फिश वर्कर फोरम

सावंतवाडी: पारंपारिक आणि आधुनिक मच्छीमारांमधील वादाच्या बसलेले मोहोळ दगड मारून उठविण्याचे काम मत्स्योद्योगमंत्री महादेव जानकर यांनी सिंधुदुर्गात येऊन केले आहे. यामुळे मत्स्य हंगामाच्या अंतिम टप्प्यात पुन्हा एकदा मच्छीमारांमधील वादात राजकारण घुसण्याची चिन्हे आहेत.

मच्छीमार हा सिंधुदुर्गातील राजकारणावर प्रभाव टाकणारा घटक मानला जातो. जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघात सागरी तालुक्यांचा पर्यायाने मच्छीमारांचा समावेश आहे. त्यामुळे ही मते कायमच निकालावर प्रभाव टाकणारी ठरली आहेत. यात साधारण पारंपारिक आणि पर्ससीन, मिनीपर्ससीन, ट्रॉलर्सव्दारे मासेमारी करणारे (आधुनिक) असे दोन गट आहेत. यातील पारंपारिक मच्छीमारांची संख्या 75 टक्केच्या दरम्यान तर इतरांची संख्या कमी असली तरी आर्थिक क्षमता जास्त आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांना नेमकी कोणाची बाजू घ्यायची असा प्रश्‍न नेहमीच पडतो. आक्रमक नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही कधी उघडपणे एका गटाची बाजू घेतली नाही. त्यातही पारंपारिक मच्छीमारांना थेट विरोधाचे धाडस फारसे कोणी दाखविले नाही. तरीही श्री. राणे आणि विद्यमान पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर पर्ससीन, मिनीपर्ससीनधारकांची बाजू घेतल्याचे आरोप अनेकदा झाले. त्याचा थोडाफार प्रभाव निवडणुकीतही दिसला. मात्र गेल्या आठवड्यात दोन दिवसाच्या जिल्हा दौर्‍यावर आलेल्या मत्स्योद्योगमंत्री जानकर यांनी थेट पारंपारिक मच्छीमारांचा रोष ओढवून घेतला. त्यांनी पहिल्या दिवशी मिनीपर्ससीन मासेमारीचे क्षेत्र असलेल्या निवतीला भेट देत स्वतः मिनीपर्ससीन करणार्‍या बोटीतून मासेमारीचा आनंद घेतला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मालवणात आढावा बैठक घेवून दोन्ही ठिकाणी मच्छीमारांनी आधुनिक तंत्रज्ञान स्विकारावे असे जाहीर करून टाकले. मालवणात पारंपारिक मच्छीमारांच्या नेत्यांनी त्यांच्या समोरच आंदोलन केले. मात्र त्यांची बाजूही जानकर यांनी ऐकून घेतली नाही.

यामुळे मच्छीमारांमधील वादाचे बसलेले मोहोळ पुन्हा उठण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जिल्ह्यात अधिकृत मिनीपर्ससीननेट धारकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. नव्याने परवाने देणे बंद आहे. समुद्रात अनधिकृतरित्या मात्र दीडशे ते दोनशे मिनीपर्ससीननेट सुरू आहेत. शिवाय मत्स्यदुष्काळाची स्थिती खूप गंभीर आहे. अशा स्थितीत आधुनिक तंत्रज्ञान स्विकारण्याचा जानकर यांचा सल्ला मच्छीमारांनाही बुचकळ्यात टाकणारा आहे.

गेल्या चार ते पाच वर्षात पारंपारिक आणि पर्ससीननेट मच्छीमारांचा वाद हातघाईवर आला होता. तो या हंगामात बर्‍यापैकी थांबला होता. आता हंगामाच्या शेवटी मत्स्योद्योग मंत्र्यांच्या या दौर्‍याने पुन्हा असंतोषाचे चित्र निर्माण झाले आहे. यावरून राजकीय रणधुमाळी सुरू होण्याची चिन्हे आहेत.

समुद्रात चालते राजकीय शक्तीप्रदर्शन
मच्छीमारांच्या दोन गटामधील वाद गेल्या काही वर्षात विकोपाला गेले. त्यामुळे या गटांनी आपल्याला पाठबळ मिळावे म्हणून काही वजनदार नेते आणि पक्षांच्या जवळ जाणे पसंत केले. याचे पडसाद समुद्रात मासेमारीवेळीही दिसत आहेत. मासेमारीला जाताना नौकांवर विविध पक्षाचे झेंडे लावले जातात. यात शिवसेना, भाजप, काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांच्या झेंड्यांचा वापर होतो.

Web Title: mahadev jankar talking fisherman in sindhururg