महागावमधील “स्त्री शक्ती” महिला बचत गटाचे पाऊल पडते पुढे

LED
LED

पाली - रोजगारासाठी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सुधागड तालुक्यातील महागावमधील काही महिला कुटुंबासमवेत मुंबईला स्थलांतर करत होत्या. तसेच काही महिला रोजगाराच्या शोधत होत्या. मात्र मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत या आणि इतर महिला एकत्र आल्या आणि त्यांनी स्त्रीशक्ती महिला बचत गट स्थापन केला. त्यांनी एलईडी दिवे बनविण्याचा जिल्ह्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प साकारला. आणि महिलांना गावातच हक्काचा रोजगार मिळाला. 

महागावमधील संजना सुतार, सायली वाघमारे, भारती गायकवाड या महिला रोजगारासाठी स्थलांतर करणार होत्या. तसेच काही महिला रोजगाराच्या शोधत होत्या. त्यांच्या सक्षमीकरणासाठी ग्रामपरिवर्तक विनोद ठिकणे यांनी या महिलांना एकत्र आणले व हा प्रकल्प राबविण्यासाठी तयार केले. कोणत्याच तांत्रिक शिक्षणाचा मागमूसही नसलेल्या महिलांना एलईडी दिवे बनविण्याचे प्रशिक्षण दिले गेले. यातील तीन महिला तर अशिक्षित आहेत. ग्रामपरिवर्तनाच्या माध्यमातून प्रकल्प उभारण्यासाठी जवळपास 1 लाख 40 हजारांचा निधी मिळाला. हातात सोल्डरगन, विविध इलेक्ट्रिक उपकरणे घेऊन आत्मविश्वासाने या महिला साहित्य जोडणी करून एलईडी दिवे बनवू लागल्या. अवघ्या सात ते आठ दिवसांत जवळपास 700 एलईडी दिवे तयार सुद्धा झाले. मग हे दिवे स्थानिक बाजारपेठेत विकून 10-15 हजाराचे उत्पन्न मिळाले. उत्पन्नाचे साधन नसल्याने गाव सोडून निघालेल्या 

महिला तसेच इतर महिलांच्या हाती थोडे पैसे खेळू लागले. मग या महिलांचा उत्साह अधिक वाढला. जिल्हा प्रशासनाने या कामाची दखल घेतली. स्वतः जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रमण्यम, तसेच सामाजिक संस्था व संघटनांनी या प्रकल्पाचे काम पाहिले, त्यांच्या कामाचे कोतुक केले. हा प्रकल्प पाहून प्रोत्साहित होऊन माणगाव आणि पोलादपूर येथील काही महिला पुढे सरसावल्या आणि दोन महिन्यांपूर्वी माणगाव तालुक्यातील काकल व पोलादपूर तालुक्यातील कपडे बुद्रुक येथे स्त्री शक्ती महिला गटाची स्थापना होऊन तेथे देखील एलईडी दिवे बनविण्याचा प्रकल्प सुरू झाला. 

आता या दिव्यांना मोठ्या स्वरूपात बाजारपेठ मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महागाव प्रकल्पास नॅशनल रुरल लाईव्हहुड मिशन अंतर्गत 1 लाखाचे कर्ज देखील मिळाले आहे. मात्र ते सध्या वापरात नाहीत.

होणार ब्रँडिंग 
येथील ग्रामपरिवर्तक विनोद ठिकणे यांनी सकाळला सांगितले आहे की महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मदतीने प्रकल्पास लायसन्स व रजिस्ट्रेशनचे काम सुरू आहे. तसेच या महिला गटाचा लोगो सुद्धा तयार होणार आहे. ज्या माध्यमातून विस्तृत बाजारपेठ मिळविता येईल. 

हक्काच्या मोठ्या बाजारपेठेची गरज
महिलांनी बनविलेले एलईडी दिवे बाजारात मिळणाऱ्या नामांकित कंपनीच्या दिव्यांप्रमाणेच दर्जेदार व गॅरेटी आहे. मात्र या दिव्यांची किंमत स्वस्त आहे. सध्या इथे 3, 6, 9, 12, 18 व्याटचे दिवे बनविले जातात. स्थानिक बाजारपेठेत दिव्यांची विक्री केली जाते. एक महिला 3 ते 4 मिनिटांत एक एलईडी दिवा बनविते. आत्तापर्यंत जवळपास 40 हजार रुपये विक्रीतुन मिळाले आहेत. सध्या 200 दिवे उपलब्ध आहेत. बचत गटाची दिवे बनविण्याची क्षमता मोठया प्रमाणात आहे मात्र बनविलेले दिवे विकण्यासाठी मोठ्या बाजारपेठेची गरज आहे. तरच या महिला आर्थिकदृष्टया अधिक सक्षम बनू शकतील.

आम्हाला खूप आत्मविश्वास वाटतोय की आम्ही हे काम करतोय. आम्ही जिद्द करून दाखवली. आता आम्ही पुढेच चालत राहणार आहोत. गावात राहूनच आम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. 
- संजना सुतार, अध्यक्षा, स्त्री शक्ती महिला बचत गट, महागाव

बचत गटाच्या महिला खूप मेहनत घेत आहेत. उत्पादित मालाला हक्काची व मोठी बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे. शासनाकडून देखील या प्रकल्पास चांगले सहकार्य मिळत आहे. जबाबदारी वाढली आहे. अधिक प्रभावीपणे काम करायचे आहे.
- विनोद ठिकणे, ग्रामपरिवर्तक, महागाव

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा प्रकल्प खूप लाभदायक आहे. या दिव्यांना बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. पंचायतसमितीकडे देखील यासंदर्भात मागणी केली आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी जर हे दिवे विकत घेतले तर हक्काची बाजारपेठ निर्माण होईल.
- भास्कर पार्टे, सरपंच, ग्रामपंचायत, महागाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com