महेश सारंग काँग्रेससाठी गद्दार - संजू परब

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

सावंतवाडी - महेश सारंग हे गद्दार आहेत. त्यांच्या आईला आणि त्यांना तब्बल दोन वेळा संधी देण्यात आली. पक्षविरोधी काम केल्यानंतर पक्षात पुन्हा स्थान देऊनही त्यांनी पक्षाशी गद्दारीच केली, अशी टीका काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केली. 

सावंतवाडी - महेश सारंग हे गद्दार आहेत. त्यांच्या आईला आणि त्यांना तब्बल दोन वेळा संधी देण्यात आली. पक्षविरोधी काम केल्यानंतर पक्षात पुन्हा स्थान देऊनही त्यांनी पक्षाशी गद्दारीच केली, अशी टीका काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केली. 

महेश सारंग यांनी आपल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात श्री. परब यांच्यावर टीका केली होती. वीज कंपनीत कार्यरत असलेल्या त्यांच्या भावाच्या विरोधात आपण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याने श्री. परब यांनी आपल्या विरोधात षड्‌यंत्र रचले, असे सारंग यांनी म्हटले होते. श्री. परब म्हणाले, ‘‘केवळ आपले अपयश वाचविण्यासाठी श्री. सारंग चुकीची माहिती देऊन मला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझे बंधू वीज कंपनीत अधिकारी पदावर आहे; मात्र त्यांचा विभाग हा मीटर देण्याचा नसून केवळ विजेची मागणी पूर्ण करण्याचा आहे. त्यामुळे श्री. सारंग यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांचे शिक्षणच तेवढे असल्यामुळे ते अर्धवट माहिती घेऊन बोलत आहेत. श्री. सारंग हे गद्दार आहेत. त्यांना काँग्रेसविरोधात बोलण्याचा हक्क नाही. एकाच घरात त्यांच्या आईला आणि त्यांना तिकीट देण्यात आले होते. जिल्ह्यात फक्त सावंतवाडीत त्यांच्यासाठी काँग्रेसनेते राणे यांनी हा निर्णय घेतला होता. त्यानंतर पंचायत समितीत वेगळा गट स्थापन केल्यानंतर आपण अपात्र होणार या भीतीने पुन्हा सारंग यांनी राणे यांची भेट घेऊन लोटांगण घातले. त्यावेळी पुन्हा राणेंनी त्यांना मोठ्या मनाने माफ केले. असे असताना पक्षाच्या विरोधात काम करणे आणि केवळ आपला फायदा करून घेणे हेच काम श्री. सारंग यांनी काँग्रेसमध्ये राहून केले.

आपण प्रामाणिक होतो असे सारंग यांचे म्हणणे आहे. मग त्यांनी गणेश चतुर्थी काळात तसेच ग्रामपंचायतीच्या बुकलेटवर काँग्रेस नेत्यांना डावलून आपलेच फोटो का लावले, याचे उत्तर त्यांनी द्यावे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत तालुक्‍यातील जास्तीत जास्त जागा ताब्यात घेण्यासाठी पक्षाकडून मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत पक्षाकडून अधिकृत उमेदवारांची नावे घोषित करण्यात येणार आहेत.

आघाडी होणार की नाही याबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेसनेते राणेच घेतील.’’

उमेदवारांसाठी दारोदारी फिरण्याची वेळ तेलींवर
भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी कोणी इच्छुक नसल्याने पक्षातून हकालपट्टी केलेल्यांना घेण्याची वेळ भाजपचे नेते राजन तेली यांच्यावर आली. त्यासाठी त्यांना दारोदार फिरावे लागते, हे त्यांचे दुर्दैव आहे, असेही श्री. परब म्हणाले.

आधी डोंबिवलीत दोन दुकाने घाला
कोलगाव येथील सभेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्या ठिकाणी गारमेंटचा उद्योग आणणार, असे जाहीर केले होते. याबाबत श्री. परब म्हणाले, ‘‘त्यांनी उद्योग आणण्याची खोटी आश्‍वासने न देता प्रथम डोंबिवलीत दोन कपड्यांची दुकाने चालवून दाखवावी आणि नंतर गारमेंट प्रकल्पाच्या बाता कराव्यात.’’ 

Web Title: mahesh sarang trailor for congress