काजू उत्पादनात मोठी घट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

एक नजर

  • ढगाळ वातावरणाचा परिसरातील काजू उत्पादनावर अनिष्ट परिणाम
  • उत्पादनात कमालीची घट
  • अल्प उत्पादन व कमी दरामुळे येथील शेतकरी अडचणीत
  • गेल्या वर्षी काजूचा दर प्रतिकिलो १९० रुपयांपर्यंत तर यंदा तो प्रतीकिलो १२० रुपयांवर 

कडावल - ढगाळ वातावरणाचा परिसरातील काजू उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाला असून उत्पादनात कमालीची घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत काजूला बाजारभावही अतिशय कमी मिळत आहे. अल्प  उत्पादन व दरामुळे येथील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

काजू कोकणातील महत्त्वाच्या बागायती पिकांपैकी एक मानले जाते. येथील अनेक शेतकऱ्यांनी काजूच्या कलमांची आधुनिक पद्धतीने लागवड केली आहे. काही शेतकऱ्यांकडे पारंपरिक लागवडीखालील काजूची जुनी झाडेही आहेत. या वृक्षांपासून शेतकऱ्यांना दरवर्षी काही प्रमाणात उत्पन्न मिळते. काजू पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याने त्याच्या लागवडीखालील  क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

यंदा मात्र काजूनेही शेतकऱ्यांना दगा दिला आहे. ढगाळ वातावरणामुळे काजू उत्पादनात मोठी घट निर्माण झाली आहे. गतसालच्या तुलनेत यंदा काजूला दरही कमी मिळत आहे. गेल्या वर्षी काजूचा दर प्रतिकिलो १९० रुपयांपर्यंत पोहोचला होता. तर यंदा तो प्रतीकिलो १२० रुपयांवर रेंगाळत आहे. काजू उत्पादन कमी व बाजारभावही अत्यल्प, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.

गेला खरीप भात शेती हंगाम नुकसानीत गेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा काजूवर अवलंबून होत्या. आता काजूनेही दगा दिल्यामुळे  शेतकरी अडचणीत सापडले असून संसाराचा गाडा कसा हाकावा, हा प्रश्न त्यांना भेडसावू लागला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Major fall in cashew production in Sidhudurg