महिलांसाठी विकासाचा आराखडा बनविणार - दीपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

कुडाळ - सिंधुदुर्गात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. सारस्वत बॅंकेने इथल्या रोजगार वाढीसाठी १०० कोटींचे अर्थसाह्य देण्याची ग्वाही दिली आहे, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज सिंधुसरस कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी सांगितले.

कुडाळ - सिंधुदुर्गात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. सारस्वत बॅंकेने इथल्या रोजगार वाढीसाठी १०० कोटींचे अर्थसाह्य देण्याची ग्वाही दिली आहे, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज सिंधुसरस कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी सांगितले.

येथील कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाचे सिंधुसरस हे प्रदर्शन कालपासून (ता. २६) सुरू झाले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत आयोजित या उपक्रमाचे अधिकृत उत्पादन आज श्री. केसरकर यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब आदी उपस्थित होते. 

श्री. केसरकर म्हणाले, ‘‘बचत गटाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. येथील महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद मी जेव्हा पाहीन, त्याच वेळी पालकमंत्री असल्याचे समाधान मिळेल. 

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर आत्मविश्‍वास महत्त्वाचा आहे. तुमच्यात विविध योजनांच्या माध्यमातून आत्मविश्‍वास निर्माण करण्याची जबाबदारी शासनाची आहे. येत्या काही वर्षांत तुमच्या सर्वांगीण विकासासाठीचा परिपूर्ण आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे. जिल्हा बॅंकेने ४ कोटींचे कर्जवाटप करून रोजगार क्षेत्रात आदर्श असा पायंडा घातला आहे. आता सारस्वत बॅंकही पुढे सरसावली आहे. रोजगार वाढविण्यासाठी ते १०० कोटीचे अर्थसाहाय्य देणार आहेत.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी कांदळवने आहेत. त्या ठिकाणी खेकडा प्रकल्पासाठी शासन आर्थिक साहाय्य देणार आहे. भात व्यवसायातही पुढील काळात आधुनिकता आणली जाईल. शासनाच्या या योजनांचा फायदा घेऊन महिला बचत गटाने आर्थिक उन्नती साधावी.’’

जिल्हाधिकारी चौधरी यांनी महिला बचत गटांना बाजारपेठ मिळावी, त्यांनी उत्पादित केलेला माल अधिक दर्जेदार व्हावा या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. श्री. सिंह यांनीही मार्गदर्शन केले. प्रकल्प संचालक रेडकर यांनी प्रास्ताविक केले. प्रफुल्ल वालावलकर यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, संजय पडते, वर्षा कुडाळकर, महेश कांदळकर, अनुप्रिती खोचरे, जयभारत पालव, कन्हैया पारकर, वासुदेव नाईक, के. बी. जाधव, बबन साळगावकर, गणेश भोगटे, अभय शिरसाट, सचिन काळप, श्रेया गवंडे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात १२ काथ्या कारखाने होणार
श्री. केसरकर म्हणाले, ‘‘राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अंतर्गत चार तालुक्‍यांत उपक्रम राबविणार आहोत. पोल्ट्री, शेळीपालन, लोणचे-पापड या उद्योगांबरोबरच काथ्या उद्योगातही आर्थिक उन्नती आहे. यातून घरबसल्या महिलांना रोजगार मिळेल. यातून तयार झालेला माल घेण्यास शासन तयार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात १२ काथ्या कारखाने होणार आहेत.’’

Web Title: To make development plan for women