शिवसेना-भाजपमध्ये ‘शिमगा’

राजेश कळंबटे
सोमवार, 18 मार्च 2019

रत्नागिरी - युतीचा तिढा सोडविण्यासाठी लोकसभेसाठी शिवसेना आग्रही आहे; परंतु रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपमधील धुसफूस या ना त्या निमित्ताने पुढे येत आहे. कुवारबाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने शिवसेनेविरोधात ग्रामविकास आघाडीला पाठबळ दिले.

रत्नागिरी - युतीचा तिढा सोडविण्यासाठी लोकसभेसाठी शिवसेना आग्रही आहे; परंतु रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपमधील धुसफूस या ना त्या निमित्ताने पुढे येत आहे. कुवारबाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने शिवसेनेविरोधात ग्रामविकास आघाडीला पाठबळ दिले. त्यावरून दोन्हीकडील नेत्यांनी शाब्दिक चिमटे काढले आहेत.

कोतवडे ग्रामपंचायतीत सुरूबनाचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. राज्यपातळीवर मनोमिलनाचा प्रयत्न होत असला तरीही स्थानिक पातळीवर राजकीय "शिमगा' रंगतच आहे. 

कुवारबाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना विरोधात सर्वपक्षीय ग्रामविकास आघाडी असे चित्र पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळाताच ही निवडणूक होत असल्याने सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. एकीकडे युतीची घोषणा झाली आहे, मात्र तरीही येथे युतीतील घटक पक्ष आमनेसामने आहेत. ग्रामविकास आघाडीला पाठिंबा देत असल्याचे भाजप तालुकाध्यक्ष सतीश शेवडे यांनी जाहीर केले होते.

तसेच शिवसेनेकडून युतीचा प्रस्तावच आला नसल्याचे त्यांनी सांगितले. कुवारबावमध्ये प्रचार यंत्रणाही राबविण्यास सुरवात केली आहे. शहराजवळील ग्रामपंचायत असल्याने या निवडणुकीला मोठे महत्त्व आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी युतीचे उमेदवार उभे करण्यापूर्वी भाजपपुढे प्रस्ताव ठेवल्याचे सांगितले. त्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेना-भाजपा युतीत आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले. 

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील प्राबल्य लक्षात घेऊन शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपसह अन्य पक्षांकडूनही संधी सोडली जात नाही. कोतवडे ग्रामपंचायत भाजपकडे आहे. येथील सुरू बनाच्या प्रश्‍नावरून शिवसेनेकडून भाजपा पदाधिकाऱ्यांची कोंडी केली जात आहे. त्याची प्रचिती पंचायत समितीच्या मासिक सभेच्या निमित्ताने आली.

यावरून भाजप पदाधिकाऱ्यांकडून नाराजीही व्यक्‍त केली जात आहे. त्याचबरोबर भाजपकडून सुरू असलेल्या जिल्हा परिषद गटनिहाय बैठकांमध्ये कार्यकर्त्यांकडूनही शिवसेना विरोधी सूर असल्याचे दिसत आहे. तिथे पदाधिकाऱ्यांकडूनही सुरात सूर मिसळला जात आहे. 

तोडगा काढण्याचे आव्हान 

लोकसभा निवडणुकीच्या गोंधळात सुरू असलेला युतीमधील शिमगा विरोधकाच्या पथ्थ्यावर पडण्याची भीती आहे. रत्नागिरीत सुरू असलेल्या राजकीय शिमग्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आव्हान शिवसेना नेतृत्वापुढे निर्माण झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: malaise in Shivsena -BJP in Ratnagiri