पालकमंत्र्यांनी फसवणूक केल्याने मळगाव ग्रामस्थांचे पुन्हा उपोषण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मार्च 2019

सिंधुदुर्गनगरी - प्रजासत्ताक दिनी न्याय मागण्यासाठी मळगाव ग्रामस्थांनी उपोषण केले होते. त्यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी संबंधीतांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. मात्र पालकमंत्र्यांनी आमची फसवणूक केली. अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आजपासून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धोंडू सावंत यांच्यासह मळगाव ग्रामस्थांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.

सिंधुदुर्गनगरी - प्रजासत्ताक दिनी न्याय मागण्यासाठी मळगाव ग्रामस्थांनी उपोषण केले होते. त्यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी संबंधीतांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. मात्र पालकमंत्र्यांनी आमची फसवणूक केली. अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आजपासून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धोंडू सावंत यांच्यासह मळगाव ग्रामस्थांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यास ठरल्यानुसार अर्धनग्न उपोषण छेडण्यात येईल असा इशारा धोंडू सावंत यांनी दिला आहे.

मळगाव गावचे विद्यमान सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर व  प्राथमिक शिक्षिकेने शासनाची फसवणूक करत अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मळगाव सरपंच व प्राथमिक शिक्षिका असलेल्या त्यांच्या पत्नीने मिळून सुमारे 50 हजार एवढे मासिक उत्पन्न आहे, असे असतानाही त्यांचे अन्न सुरक्षा यादीमध्ये नाव समाविष्ठ आहे. त्यांनी आपले वार्षिक उत्पन्न 36 हजार एवढे दाखविले असल्याचा आरोप उपोषणकर्ते धोंडू लक्ष्मण सावंत, मनोहर राऊळ, आबा नार्वेकर, संजय धुरी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

ज्या कुटुंबाचे वाषिंक उत्पन्न 44 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे. अशा कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेता येतो; मात्र विद्यमान सरपंच व त्याच्या पत्नीने शासनाची फसवणूक करून अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेतला आहे. तरी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी 26 जानेवारीला उपोषण केले होते. मात्र प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हाधिकारी यांनी संबंधीतांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यावेळी सुरु केलेले उपोषण मागे घेतले होते. मात्र पालकमंत्र्यांच्या आदेशाला येथील अधिकारी जुमानत नसल्याचा प्रत्यय आम्हाला आला आहे. अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आजपासून पुन्हा उपोषणाला सुरूवात केली आहे. या उपोषणाची दखल न घेतल्यास उपोषण अधिक तीव्र करत अर्धनग्न अवस्थेत उपोषणाला सुरूवात करणार असल्याचे यावेळी उपोषण कर्ते दाजी उर्फ धोंडू सावंत यांनी स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malgaon residents against hunger strike