मजुरी बुडत असल्याने कुपोषित बालके वाऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

नेरळ - कुपोषणाच्या विळख्यात सापडलेल्या कर्जत तालुक्‍यात कशेळे ग्रामीण रुग्णालयातील बाल उपचार केंद्र उघडायला, तेथील कुपोषित बालकांवर उपचार सुरू करायला तब्बल एक महिना उशीर झाला आहे. प्रशासनातील वरिष्ठांनी कान टोचल्यानंतर कुपोषित बालकांच्या पालकांना त्यांची बुडीत मजुरी 19 डिसेंबरला, म्हणजे 15 दिवस उशिरा दिली आहे. अजूनही तीव्र 17 बालके त्यांच्या घरीच आहेत. त्यांना उपचारासाठी केंद्रात कधी दाखल करणार, याचे उत्तर प्रशासनाकडे नाही.

नेरळ - कुपोषणाच्या विळख्यात सापडलेल्या कर्जत तालुक्‍यात कशेळे ग्रामीण रुग्णालयातील बाल उपचार केंद्र उघडायला, तेथील कुपोषित बालकांवर उपचार सुरू करायला तब्बल एक महिना उशीर झाला आहे. प्रशासनातील वरिष्ठांनी कान टोचल्यानंतर कुपोषित बालकांच्या पालकांना त्यांची बुडीत मजुरी 19 डिसेंबरला, म्हणजे 15 दिवस उशिरा दिली आहे. अजूनही तीव्र 17 बालके त्यांच्या घरीच आहेत. त्यांना उपचारासाठी केंद्रात कधी दाखल करणार, याचे उत्तर प्रशासनाकडे नाही.

बाल उपचार केंद्रात मुले का राहत नाहीत? त्यांचे पालक त्यांना तेथे का आणत नाहीत? याबाबत दिशा केंद्र या संघटनेने कर्जतचे आमदार सुरेश लाड यांना अहवाल दिला आहे. या कुपोषित बालकांच्या पालकांचा रोजगार बुडत असल्याने त्यांना केंद्रावर आणले जात नसल्याची प्रमुख बाब "दिशा'चे समन्वयक अशोक जंगले यांनी उजेडात आणली. केंद्रात दाखल होणाऱ्या कुपोषित बालकांच्या पालकांना त्यांची बुडीत मजुरी देण्याची मागणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्याकडेही यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य अधिकारी आर. व्ही. माने यांनी कर्जत येथील बाल उपचार केंद्राची पाहणी केली. उपचार घेऊन गेलेल्या कुपोषित बालकांच्या पालकांना त्यांची 21 दिवसांची बुडीत मजुरी देण्याची सूचना त्यांनी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चव्हाण यांना दिली. त्यानुसार 12 कुपोषित बालकांच्या पालकांना दिवसाला 100 रुपये याप्रमाणे बुडीत मजुरी देण्यात आली आहे. आता उपचार घेत असलेल्या तीव्र कुपोषित बालकांच्या पालकांना 21 दिवसांचे उपचार पूर्ण झाल्यानंतर बुडीत मजुरी दिली जाणार आहे.

कुपोषणाबाबत जिल्हा परिषदेत 16 डिसेंबर रोजी आढावा बैठक घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी नार्वेकर यांनी कर्जत तालुक्‍यातील उदासीन अधिकारी वर्गाला कडक शब्दांत समज दिली. त्यानंतर सोमवारपर्यंत सहा कुपोषित बालकांना दाखल करण्यात आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांनी महिला बालविकासचे तालुका प्रकल्प अधिकारी गहाणे यांना आदेश दिले आहेत. कर्जत आणि कशेळे येथे दाखल तीव्र कुपोषित बालकांशिवाय कोणत्याही उपचाराविना असलेली 15 बालके तत्काळ बाल उपचार केंद्रात दाखल करण्यास त्यांनी सांगितले आहे.

कर्जत व कशेळे येथे दाखल केलेल्या तीव्र कुपोषित बालकांची पाहणी ठाणे विभागीय सहायक उपसंचालक डॉ. के. आर. थोरात यांनी केली. ठाणे जिल्ह्यातील पालघर आणि मोखाडा या तालुक्‍यांचा कुपोषणाचा अभ्यास असलेल्या डॉ. थोरात यांनी येथील अधीक्षक डॉ. लक्ष्मीकांत चव्हाण आणि डॉ. बाळकृष्ण हंकारे यांना मार्गदर्शन केले. या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. के. मोरे उपस्थित होते. कर्जत तालुक्‍यातील कुपोषण संपुष्टात येत नाही, तोवर बाल उपचार केंद्रे सुरू राहतील, अशी घोषणा डॉ. थोरात यांनी केली.

पिटाळून लावले...
कशेळे केंद्रात 6 डिसेंबरला मालेगाव येथील आकाश पुजाडा हे तीव्र कुपोषित बालक दाखल होते. त्यानंतर दोन बालके आली असता, कशेळे ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पालकांना येथे सोई नाहीत असे सांगून पिटाळून लावले, अशी तक्रार दिशा केंद्राचे समन्वयक अशोक जंगले यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे. त्यामुळे 17 डिसेंबरपासून हे केंद्र सुस्थितीत करून बाल उपचार केंद्र कार्यान्वित झाले. दोन वर्षांपूर्वीही रोजगार बुडत असल्याने आदिवासी पालक मुलांवरील उपचार अर्धवट सोडून निघून गेले होते.

Web Title: malnourished children issue