
मालवण : युनेस्कोच्या धर्तीवर इंटरनॅशनल कमिशन ऑन इरिगेशन ॲण्ड ड्रेनेज (ICID) तर्फे दिला जाणारा ‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट २०२०’ हा सन्मान तालुक्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक धामापूर तलावाला मिळाला आहे. संपूर्ण जगात अशा १२१ साईट्स (जागा) आहेत. भारतामध्ये एकूण १० आहेत. पैकी महाराष्ट्र आणि गोवामधील एकमेव अशी नामांकित साईट धामापूर तलाव आहे. २०१८ आणि २०१९ मध्ये धामापूर तलावावर तपशीलवार अभ्यास करून संपूर्ण अहवाल आयसीआयडीला स्यमंतक संस्था, धामापूर (जीवन शिक्षण विद्यापीठ) तर्फे सादर करण्यात आला होता.
यापुढे तलाव संवर्धन झाल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर धामापूर आणि काळसे गावाची ओळख होऊ शकते. त्यासाठी सुद्धा एका वेगळ्या आंतरराष्ट्रीय नामांकनाची तरतूद आहे, असे स्यमंतक संस्थेचे सचिन देसाई यांनी सांगितले.धामापूर तलावाची नोंद पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय (MoEFCC) ने पाणथळ जागा म्हणून देशाच्या पाणथळ नकाशावर सुद्धा प्रसिद्ध केली आहे. आंतरराष्ट्रीय आणि उच्च दर्जाचे पर्यटक गावात यावेत, या उद्देशाने स्यमंतक संस्थेमार्फत गावात सोविनियर शॉप्स (souvenir shops) तसेच हेरिटेज पर्यटनासाठी, कला-कौशल्यांसाठी मार्गदर्शन देण्यात येत आहे. धामापूर आणि काळसे ही गावे जैवविविधतेने संपन्न आहेत. तलाव, कातळ, खाजण-जमीन, जंगल, नदी, डोंगर, जुनी मंदिरे अशा अनेक गोष्टींचा वारसा लाभलेली ही गावे आहेत. गरज आहे ती एका सृजनशील दृष्टिकोनाची आणि चिकाटीची, असे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.
ऐतिहासिक धामापूर तलाव १५३० मध्ये विजयनगर राजवटीच्या काळात बांधण्यात आले. या राजवटीच्या काळात अनेक तलाव, मंदिरे बांधण्यात आली. त्याची ठेवण धामापूर तलाव आणि परिसरातील मंदिर पाहिल्यावर लक्षात येते. धामापूर तलावात दुर्मिळ वनस्पतींच्या प्रजातींसह समृद्ध जैवविविधता आहे. समृद्ध जैवविविधता, पर्यटन, निसर्गसौंदर्य, सिंचन, पाणीपुरवठा आणि मासेमारी या सर्व बाबतीत धामापूर तलाव एक आदर्श असे ठिकाण आहे. धामापूरचा तलाव धामापूर आणि काळसे गावातील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा मुख्य स्रोत आहे. आता धामापूर तलावाला जागतिक हेरिटेजचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे उच्च दर्जाचे पर्यटन कसे वाढेल, यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत, असे श्री. देसाई यांनी सांगितले.
काही वर्षांपूर्वी इंटरनेटवर शोधल्यास धामापूर तलावाबद्दल काही स्थानिक यूट्यूब व्हिडिओ शिवाय इतर कोणतीही माहिती मिळत नव्हती; परंतु आता जगाच्या नकाशावर धामापूर तलावाचे स्थान आपण अभिमानाने या वेबलिंक वर बघू शकतो.
- सचिन देसाई, स्यमंतक संस्था