मालवण दुर्घटना : समुद्रात सेल्फीचा हट्ट नडला 

Malvan Sea
Malvan Sea

बेळगाव : 'सेल्फी'च्या मोहातून विद्यार्थी समुद्राच्या पाण्यातून बाहेरच येत नव्हते आणि उधाण आल्यामुळे ते बुडाले; तर त्यांना वाचवताना प्राध्यापकाचा बुडून मृत्यू झाला अशी धक्कादायक माहिती प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांकडून मिळाली आहे. प्रा. महेश कुडुचकर यांचे काका मदन कुडुचकर यांनी ही माहिती 'सकाळ'ला दिली. 

मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजचे 47 विद्यार्थी आणि तीन प्राध्यापक औद्योगिक भेट दौऱ्याहून पुण्याहून परतत असताना सिंधुदुर्गला गेले होते. शनिवारी कोकण पर्यटन करून रात्री बेळगावला पोचण्याचे नियोजन होते. मालवणजवळच्या वायरी समुद्रकिनाऱ्यावर काही विद्यार्थी समुद्रस्नानासाठी उतरले; तर विद्यार्थिनीही सेल्फी घेण्यासाठी पाण्यात गेल्या होत्या. 

सुमारे तासभर ते पाण्यातच होते. तरीही बारा ते पंधरा विद्यार्थी बाहेर पडण्यास तयार नव्हते. त्यांना, 'चला... आता बाहेर पडा', अशी सूचना प्रा. महेश कुडूचकर यांनी दिली होती. त्यानंतरही मुलींनी सेल्फी घेण्याचा हट्ट धरला. त्याचवेळी समुद्राला उधाण आले आणि सारेच बुडायला लागले.

त्यांना वाचविण्यासाठी नारायण तोडकर आणि अन्य मच्छीमारांनी उडी घेतली. त्यांच्यासमेवत प्रा. महेश यांनीही समुद्रात उडी घेतली. मच्छीमार आणि प्रा. महेश यांनी मिळून एका विद्यार्थ्याचे प्राणही वाचवले. विद्यार्थ्याला बाहेर काढल्यानंतर बुडणाऱ्या मुलींसाठी प्रा. महेश यांनी पुन्हा समुद्रात उडी घेतली. पण महेश यांना एका विद्यार्थिनीने मिठी मारली आणि पट्टीच्या पोहणाऱ्या महेश यांचाही विद्यार्थिनींसमवेत बुडून मृत्यू झाला. 

प्रा. महेश पोहण्यात तरबेज. एक उत्कृष्ट जलतरणपटू अशी त्यांची ओळख होती. त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचे अनेकांच्या पचनी पडले नाही. त्याबद्दल महेश कुडूचकरांचे काका मदन यांच्यासह नातेवाईकांनी बचावलेले विद्यार्थी तसेच स्थानिक लोकांकडे चौकशी केली असता, समुद्रात बुडणाऱ्यांना वाचविताना प्रा. महेश बुडाले अशी माहिती त्यांना मिळाली.

विद्यार्थिनी पाण्याच्या लाटेबरोबर आत ओढल्या जात असताना पाण्यात जाणारे प्रा. महेश यांना काही मच्छीमारांनी अडवलेही होते. खोल समुद्रात ओढल्या गेलेल्या मुलींचा जीव वाचणे शक्‍य नसल्याची जाणीवही त्यांनी त्यांना करून दिली. तरीही स्वतःचा जीव धोक्‍यात घालून प्रा. महेश समुद्रात उतरले आणि मुलीपर्यंत पोचलेही. पण घाबरलेल्या एका मुलीने त्यांना घट्ट धरले आणि पोहण्याची संधीच त्यांना मिळाली नाही. 

चित्रकलेची आवड 
प्रा. महेश कुडूचकर यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण भातकांडे शाळेत झाले. भरतेशला डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले. मराठा मंडळ पॉलिटेक्‍निक महाविद्यालयात बीई व केएलई महाविद्यालय एम. टेक शिक्षण घेतले. मराठा मंडळ पॉलिटेक्‍निक महाविद्यालय येथे नोकरीनिमित्त रुजू झाले. किल्ले बनविणे, चित्रकलेची त्यांना खूप आवड होती. त्याबद्दल त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत. प्रा. महेश यांच्या पार्थिवावर शनिवारी शहापूर स्मशानात अंत्यसंस्कार झाले. आज मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा राजश्री हलगेकर, प्राचार्य आनंद मेणसे व एसीपी शंकर मारीहाळ यांच्यासह मराठा मंडळ शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांनी कुडूचकरांच्या घरी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले. 

अश्रू दाटले; अखेरचा निरोप 
शनिवारी वायरी समुद्रात बुडालेल्या आठही जणांच्या पार्थिवांवर शनिवारी मध्यरात्रीनंतर अंत्यसंस्कार पार पडले. तत्पूर्वी सायंकाळी सातच्या सुमारास शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. ते मृतदेह बेळगावला रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास पोचले. मालवणच्या गणेश सेवा मंडळ ट्रस्टची वाहने तसेच रुग्णवाहिकांचा त्यासाठी वापर करण्यात आला. सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मृतदेह पाठवण्याची व्यवस्था पाहिली. मृतांच्या नातेवाईकांबरोबर गणेश मंडळ ट्रस्टचे कार्यकर्तेही बेळगावपर्यंत आले होते. बेळगावात राहणारे प्रा. महेश कुडूचकर यांच्यावर शहापूरमध्ये, टेंगिनकेरा गल्लीतील विद्यार्थी अवधूत ताशिलदार याच्यावर सदाशिवनगर, मुजम्मील अन्निगेरीवर मुस्लिम स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले. तर सांबऱ्याच्या दोन विद्यार्थिनींवर सांबऱ्यात, तसेच किरण खांडेकर (तुरमुरी), नितीन मुत्नाळकर (काकती), माया कोले (बंबरगा) यांच्यावर त्यांच्या त्यांच्या गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com