मालवण परिसरात लाखोंचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस - जनजीवन विस्कळीत; घरांनाही धोका, वीजपुरवठ्यात अडथळे
मालवण - तालुक्‍यात आज तिसऱ्या दिवशी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने लाखो रुपयांची हानी झाली. तालुक्‍यातील विस्कळीत झालेला वीजपुरवठा सुरू करण्यातही पावसामुळे अडथळे येत आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने तालुक्‍याच्या काही भागात पूरजन्य स्थितीचा धोका निर्माण झाला आहे.

तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस - जनजीवन विस्कळीत; घरांनाही धोका, वीजपुरवठ्यात अडथळे
मालवण - तालुक्‍यात आज तिसऱ्या दिवशी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने लाखो रुपयांची हानी झाली. तालुक्‍यातील विस्कळीत झालेला वीजपुरवठा सुरू करण्यातही पावसामुळे अडथळे येत आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने तालुक्‍याच्या काही भागात पूरजन्य स्थितीचा धोका निर्माण झाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आजच्या तिसऱ्या दिवशीही कायम आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह काल पडलेल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी विद्युत खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. आजच्या दुसऱ्या दिवशी विद्युत खांब उभे करून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम महावितरणकडून सुरू होते. मात्र पावसाचा जोर कायम असल्याने त्यांच्या कामात अडथळा आला होता. आज मुसळधार पावसामुळे तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात वित्तहानीच्या घटना घडल्या आहेत. 

अतिवृष्टीमुळे तालुक्‍यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. तालुक्‍यातील नद्यांना पूर आला असून अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूकही ठप्प झाल्याचे चित्र आहे. भगवंतगड किनाऱ्यालगत गडनदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. भगवंतगड, लब्देवाडी, साटमवाडी येथे नदीचे पाणी घुसले असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. तालुक्‍यातील कुसरवे येथील प्रकाश शिवराम गावडे यांच्या घरावर झाड पडल्याने सुमारे १५ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले. कट्टा येथील आत्माराम डगरे यांच्या गोबरगॅसच्या टाकीवर झाड पडल्याने दहा हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे. 

सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका शहराला बसला आहे. अनेक ठिकाणची झाडे तसेच विद्युत खांब कोसळल्याने शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. शहरातील मेढा तसेच देऊळवाडा भागातील वीज पुरवठा आजच्या दुसऱ्या दिवशीही बंद होता. या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कोसळलेले विद्युत खांब पुन्हा उभे करण्याच्या कामास सकाळपासून सुरुवात केली. मात्र मुसळधार पावसामुळे त्यांच्या कामात व्यत्यय होत होता. स्थानिक नागरिकांकडूनही महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्यात येत होते. 

आचरा - सोसाट्याच्या वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसाने आचरा परिसरात हाहाकार उडविला आहे. अनेक ठिकाणी झाडे तसेच विद्युत तारा पडल्याने नुकसान झाले आहे. वरचीवाडी भागात नवीन शेडच्या पत्र्याचे छप्पर उडून गेल्याने सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. खाडीकिनारी परिसरात भातशेती पाण्याखाली गेल्याने शेती कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. महावितरणचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विद्युत खांब पडल्याने गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
आचरा वरचीवाडी येथील काजू व्यावसायिक अशेष पेडणेकर यांच्या नवीन शेडचे पत्र्याचे छप्पर उडून गेले. त्यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. आचरा हिर्लेवाडी येथील सतीश गोलतकर यांचा माड रस्त्यावर असलेल्या सदाशिव हिर्लेकर यांच्या रिक्षेवर पडल्याने रिक्षाचे सुमारे २२ हजार रुपयांचे नुकसान झाले. पोलिस पाटील जगन्नाथ जोशी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. वरचीवाडी येथील नंदू कांबळी यांचे आंब्याचे कलम कोसळल्याने नुकसान झाले. चिंदर लब्देवाडी येथील अरुण दशरथ लब्दे यांच्या घराच्या छपरावर फणसाचे झाड पडल्याने सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.

चिंदरमध्ये पुराचा धोका
चिंदर लब्देवाडी येथील खाडीचे पाणी शेतीत घुसल्याने भातशेती पाण्याखाली गेली आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास या भागातील घरांना पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. आचरा, चिंदर, पळसंब, आडवली या भागातील २० विद्युत खांब पडल्याने या भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. आचरा हिर्लेवाडी, डोंगरेवाडी, वायंगणी, चिंदर आदी भागातील विद्युत ताराही तुटून पडल्या आहेत. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी भर पावसात शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

Web Title: malvan konkan news loss by rain