तालुकाध्यक्षपदावरून भाजपमध्ये वाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

मालवण - भाजपच्या तालुकाध्यक्ष पदावरून बाबा मोंडकर यांना हटवून विजय केनवडेकर यांची निवड केली आहे. मात्र बुधवारी (ता. ९) झालेल्या तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत या विषयावर कोणतीही चर्चा न करता तसेच तालुक्‍यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्‍वासात न घेता ही निवड झाली आहे. ही निवड प्रक्रिया चुकीची असून याप्रश्‍नी वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे बाबा मोंडकर यांनी स्पष्ट केले. यामुळे तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीवरून वादंग निर्माण झाला आहे. 

मालवण - भाजपच्या तालुकाध्यक्ष पदावरून बाबा मोंडकर यांना हटवून विजय केनवडेकर यांची निवड केली आहे. मात्र बुधवारी (ता. ९) झालेल्या तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत या विषयावर कोणतीही चर्चा न करता तसेच तालुक्‍यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्‍वासात न घेता ही निवड झाली आहे. ही निवड प्रक्रिया चुकीची असून याप्रश्‍नी वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे बाबा मोंडकर यांनी स्पष्ट केले. यामुळे तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीवरून वादंग निर्माण झाला आहे. 

भाजपचे तालुकाध्यक्ष म्हणून मोंडकर हे काम पाहत आहेत. काल जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत तालुका कार्यकारिणीची बैठक झाली. यात तालुक्‍यातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर रात्री उशिरा भाजपचे नूतन तालुकाध्यक्ष म्हणून केनवडेकर यांची तर मोंडकर यांची जिल्हा चिटणीस या पदावर निवड केली. या निवडीचे पत्र आज प्रसारमाध्यमांना देण्यात आले. सोशल मिडीयावरून या निवडीबाबत शुभेच्छांना सुरवात झाल्यानंतर बाबा मोंडकर यांनी आक्षेप घेतला. भाजपच्या तालुकाध्यक्ष पदावर अन्य कोणाची निवड झाली असल्याचे वृत्त कोणत्या आधारावर दिले जात आहे याची आपल्याला कोणतीही कल्पना नाही. यामुळे या बाबीची कोणतीही विश्‍वासार्हता नाही. माझी जिल्हा चिटणीस म्हणून कोणीही निवड जाहीर केलेली नाही व असा कोणताही प्रस्ताव मला मिळालेला नाही. काल तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष जठार उपस्थित होते. या बैठकीत अशा कोणत्याही बदलाचा विषय आला नाही. तालुक्‍यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना डावलून नंतर पाठीमागून असा काही निर्णय झाला असेल तर ही पद्धत अत्यंत चुकीची आणि पक्षाच्या कार्यपद्धतीविरोधातील आहे. त्यामुळे जर असे काही असेल तर याविरोधात प्रदेशाकडे, वरिष्ठ नेत्यांकडे दाद मागणार आहे असे म्हणणे श्री. मोंडकर यांनी सोशल मिडीयावर मांडले आहे.

सोशल मिडीयावरून तालुकाध्यक्ष व जिल्हा चिटणीस पदाच्या निवडीचे पत्र फिरत आहे. यात तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीच्या पत्रावर तारीख आहे तर आपल्या पत्रावर कोणतीही तारीख नाही. प्रत्यक्षात तालुकाध्यक्ष बदलासंबंधीचे वृत्त चुकीचे असल्याचे तालुकाध्यक्ष म्हणून जाहीर करत असल्याचे श्री. मोंडकर यांनी यात स्पष्ट केले आहे. 

तालुकाध्यक्ष पदावरून मोंडकर यांना हटवून केनवडेकर यांची निवड जाहीर झाल्याने भाजपच्या काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्याने तालुकाध्यक्ष पदाचा वाद वाढण्याची चिन्हे आहेत. जर जिल्हाध्यक्षांना तालुकाध्यक्ष पदाची निवड करायची होती तर त्यांनी काल झालेल्या तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत ती जाहीर का केली नाही असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे. जिल्हाध्यक्षांनी अशी कोणतीही चर्चा न करता पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्‍वासात न घेता ही निवड प्रक्रिया राबविल्याने श्री. जठार यांच्या कार्यपद्धतीबाबत काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त  केली आहे. 

भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी माझ्यावर जो विश्‍वास दाखविला तो सार्थकी ठरवेन. मी पक्षाकडे कोणतेही पद मागितले नव्हते. भाजपच्या वरिष्ठांना माझ्यावर विश्‍वास असल्यानेच या पदासाठी माझी निवड केली आहे. मला कोणावरही टिकाटिप्पणी करायची नाही. सर्वांना सोबत घेत तालुक्‍यात पक्ष संघटना वाढविण्यावर माझा भर राहिल.
- विजय केनवडेकर, नूतन तालुकाध्यक्ष, मालवण भाजप

निवड प्रक्रियेला मोंडकरांचा आक्षेप
दरम्यान, बुधवारी (ता. ९) रात्री उशिरा जिल्हाध्यक्ष जठार यांनी नूतन तालुकाध्यक्ष व जिल्हा चिटणीस पदाची निवड जाहीर केली. हे पत्र तालुकाध्यक्ष मोंडकर यांना देण्यासाठी पदाधिकारी गेले होते. मात्र मोंडकर यांनी हे पत्र स्वीकारले नाही असे भाजपच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. यासंदर्भात मोंडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तालुकाध्यक्ष पदाची झालेली निवड चुकीची असून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अंधारात ठेवून ही निवड झाली आहे. यासंदर्भात आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: malvan news bjp konkan