मालवणात अनधिकृत बांधकामे हटविली

मालवणात अनधिकृत बांधकामे हटविली

मालवण - पालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या कारवाईस आजपासून सुरवात केली. यात आज सकाळपासून मेढा येथील चंद्रकांत गणपती पाटील यांच्या लॉजींगचे बांधकाम जेसीबीच्या साह्याने पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आले. शहरात अन्य भागातही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करत अतिक्रमण करण्यात आले असून संबंधितांना पालिका प्रशासनातर्फे नोटिसा बजावल्या आहेत. उद्यापासून बाजारपेठेसह अन्य अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईस सुरवात केली जाणार असल्याचे अनधिकृत बांधकाम निर्मूलन पथकाचे प्रमुख विशाल होडावडेकर यांनी स्पष्ट केले.

शहरात मोठ्या प्रमाणात झालेल्या अनधिकृत बांधकामावर पालिका सभांमध्ये नगरसेवकांनी आवाज उठवीत प्रशासनाकडून यावर कारवाई होणार केव्हा? असा प्रश्‍न उपस्थित केला होता. यावर प्रशासनातर्फे बांधकामचे अवेक्षक सुधाकर पाटकर यांनी ३१ मे पूर्वी अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या कारवाईस सुरवात केली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आज सकाळपासून अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या कारवाईस पालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात सुरवात केली. यात शहरातील मेढा येथील चंद्रकांत पाटील यांनी अनधिकृतरीत्या बांधलेली लॉजींगची इमारत पाडण्यासाठी पालिका प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यात अनधिकृत बांधकाम निर्मुलन पथकाचे प्रमुख विशाल होडावडेकर, बांधकामचे अवेक्षक सुधाकर पाटकर, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता दत्तप्रसाद पाटकर, संदीप परुळेकर, गुरूदत्त पाटकर, रमेश कोकरे, विजय रावले, सुभाष कुमठेकर, हेमंत कोचरेकर यांच्यासह पालिका प्रशासनाचे अन्य कर्मचारी तसेच पोलिस उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ तसेच पोलिस, महिला पोलिस कर्मचारी उपस्थित होते. 

पाटील यांना पालिका प्रशासनातर्फे ३० डिसेंबरला अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यानंतर मंगळवारी (ता. ३०) पाटील यांनी अंतिम नोटीस बजावली. मात्र संबंधितांनी बांधकाम न हटविल्याने सकाळी ११.२० वाजता अनधिकृत बांधकाम हटविण्याच्या कारवाईस सुरवात केली. बांधकाम हटविण्यात येणार असल्याचे दिसताच पाटील कुटुंबीयांनी इमारतीतील सामान हटविण्यासाठी सायंकाळपर्यंतची मुदत द्यावी, अशी मागणी केली. मात्र पालिकेच्या पथकाने त्याला नकार देत कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला. पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने इमारतीतील किमती साहित्य बाहेर काढण्यास सुरवात केली. यावेळी स्लॅबची इमारत पाडण्यासाठी आणलेला जेसीबी अडविण्याचा प्रयत्न पाटील कुटुंबीयांनी केला. यावेळी उपस्थित महिला तसेच अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना बाजूला केले. त्यानंतर पालिकेच्या पथकाने इमारतीचे बांधकाम हटविण्यास सुरवात केली. मुख्याधिकारी रंजना गगे यांच्या आदेशानुसारच ही कारवाई सुरू असल्याचे पालिका प्रशासनाने यावेळी स्पष्ट करण्यात आले. 

पालिकेच्या पथकाकडून बांधकाम हटविण्याच्या कारवाईस सुरवात झाल्यानंतर पाटील कुटुंबीयांनी त्याला विरोध करत शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत ती सुरवातीस हटविण्यात यावीत त्यानंतरच आमचे बांधकाम तोडावे. आमच्यावर पालिका प्रशासनाकडून हेतुपुरस्सर कारवाई केली आहे असा आरोप केला. मात्र यानंतरही पालिकेच्या पथकाने याकडे लक्ष न देता बांधकाम हटविण्यास सुरवात केल्यावर पाटील कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. बांधकाम हटविण्याच्या ठिकाणी वारंवार पाटील कुटुंबीय धावत असल्याने त्यांना पकडून ठेवताना महिला पोलिस कर्मचाऱ्यांचीही दमछाक होत होती. मुसळधार पाऊस सुरू असतानाही पालिकेच्या पथकाने आपली कारवाई सुरू ठेवत सायंकाळी साडे पाचपर्यंत ही इमारत जमीनदोस्त केली. 
पालिकेकडून बांधकामाची परवानगी मिळाल्यानंतर रस्ता रुंदीकरणासाठी सोडण्यात आलेल्या जागेवर अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचे आढळून आले आहे. संबंधितांना हे अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसाही बजावल्या आहेत. पालिकेच्या गटार, व्हाळी यावरही अतिक्रमण झाले असून ही सर्व अतिक्रमणे येत्या दोन दिवसात हटविण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे पथक प्रमुख विशाल होडावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पालिकेने अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी हाती घेतलेली मोहिम ही धाडसी आहे. अनेकजण पालिकेने न जुमानता अनधिकृत बांधकाम करू लागल्यानेच पालिका प्रशासनास कडक भूमिका घ्यावी लागली आहे. शहरात अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करताना पालिकेचे नियम धाब्यावर बसविले आहेत ही बाब गंभीर आहे. अशा परिस्थितीत ही अतिक्रमणे हटविण्यासाठी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, मुख्याधिकारी रंजना गगे यांनी जो धाडसी निर्णय घेतला आहे त्याचे आपण अभिनंदन करत असल्याचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी सांगितले. 

राजकीय हस्तक्षेपास न जुमानता कारवाई  
पालिकेच्या पथकाकडून सुरू करण्यात आलेली कारवाई थांबविण्यासाठी पाटील कुटुंबीयांनी आमदार, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यासह अन्य राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून याची माहिती दिली. मात्र पालिका प्रशासनाच्या पथकाने कोणाचाही हस्तक्षेप न स्वीकारता आपली कारवाई सुरू ठेवत सुमारे आठ ते दहा लाख रुपये खर्चाची स्लॅबची इमारत भर पावसात सात ते आठ तासाच्या अथक मेहनतीनंतर जमीनदोस्त केली. पालिकेच्या इतिहासात शहरात प्रथमच प्रशासनाकडून एवढी मोठी कारवाई झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com