शेळी योजनेतून फसवणूक

शेळी योजनेतून फसवणूक

मालवण - केंद्राच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मागासवर्गीय लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शेळीपालन योजनेत फसवणूक झाल्याचा आरोप तालुक्‍यातील खोटले चव्हाणवाडी येथील सावित्री सत्यवान चव्हाण यांनी आज केला. दीड लाख अनुदानापेक्षा देण्यात येणाऱ्या शेळी व बोकडांचे वजन जास्त असल्याचे सांगून आपणास ४२ पैकी केवळ २८ शेळ्या व बोकड देण्यात आले. त्यांना रोगाची लागण झाल्याने योजनेतील आठ व आपल्याकडील २४ अशा एकूण ३२ शेळ्या व बोकडांचा मृत्यू झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शेळ्यांना झालेल्या आजाराची लागण आपल्या तीन वर्षीय नातवाला झाल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.

अधिकारी व लोकप्रतिनिधींनी या फसवणुकीची गंभीर दखल घेत आपल्याला नुकसानभरपाई तसेच न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही चव्हाण दांपत्याने केली आहे. सावित्री चव्हाण यांना २०१४- १५ मध्ये शेळीपालन योजना मंजूर झाली; मात्र या योजनेचा लाभ जून २०१७ मध्ये देण्यात आला. तीन लाखांच्या या योजनेत ५० टक्के अनुदान आहे. ४० शेळ्या व दोन बोकड असलेली ही योजना राबविण्यासाठी लाभार्थ्याकडे शासन निकषानुसार गोठा व खाद्यपदार्थांसाठी भांडी व वैरण यासाठीचा ९३ हजारांचा खर्च लाभार्थ्याने करावा लागतो. तीन लाख रुपये खर्चाच्या योजनेपैकी ५७ हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट काढून तो सांगली येथील पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर शेळी-मेंढी महामंडळा (रांजणी-कवठेमहांकाळ, सांगली) कडे लाभार्थ्यांनी दिला. त्यानंतर त्यांना शेळ्यांचे वजन व शासन अनुदान याचा विचार करता केवळ २७ शेळ्या व एक बोकड देण्यात आला. प्रत्यक्षात शासन निकषानुसार ४२ शेळ्या व बोकड चव्हाण यांना देण्यात आली असल्याची नोंद करण्यात आली. होळकर महामंडळाने आपली फसवणूक केली. मुळात शेळ्या व बोकड कमी दिले. ते जादा वजनाचे दाखवून कमी वजनाचेच शेळ्या व बोकड दिले. त्यांना रोगाची लागणही झालेली होती. ही जनावरे मालवणला आणण्यासाठी झालेला २० हजार रुपयांचा खर्चही मिळाला नाही. 

मुळात सांगली येथून तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर अंतर पार करून ही जनावरे मालवणात आणताना हवामान बदलामुळे त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे जिल्ह्यातच शेळ्या-बोकड खरेदी करून ते लाभार्थ्यांना द्यावेत, अशी मागणी करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शेळ्यांना रोगाची लागण झाली व शेळ्या मृत्युमुखी पडल्या. आपल्याकडील दुधाळ जनावरे विक्री करून शेळ्या-मेंढ्या राधानगरी येथून आपण ४० ते ५० शेळ्या व बोकड खरेदी केले होते. त्यांनाही रोगाची लागण झाली. इन्शुरन्स उतरवण्यात उशीर करण्यात आल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

सांगली येथून ३ जूनला अनुदान योजनेतील शेळ्या व बोकड आणले गेले. १४ ते २९ जून या कालावधीत लाभ योजनेतील व आधी असलेल्या अशा एकूण ३२ शेळ्या व बोकड मृत्युमुखी पडले. 

गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सभापती मनीषा वराडकर, पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य माधुरी बांदेकर, पंचायत समिती सदस्य अजिंक्‍य पाताडे यांनी पाहणी करून नुकसानभरपाई मिळवून देण्याबाबत शासकीय कार्यवाही केली जाईल, असे सांगितले. सध्या बाजारभावानुसार शेळ्या व बोकड यांचे दर वाढल्यामुळे या योजना राबविताना योजनेतील अनुदानाची रक्कम वाढविण्याबाबत पंचायत समिती सभेत शिफारस करणार असल्याची माहितीही पराडकर यांनी दिली.

शिवसेना उपतालुका प्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य प्रसाद मोरजकर, सरपंच सुशील परब, आशीष परब यांनी चव्हाण कुटुंबीयांची भेट घेऊन माहिती घेतली. याबाबत आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांचे लक्ष वेधून या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जाणार आहे. त्याचबरोबर या प्रश्‍नाबाबत अधिवेशनात आवाज उठविण्याची मागणी करणार असल्याचे प्रसाद मोरजकर यांनी सांगितले.

शेळ्यांकडून नातवाला संसर्ग
चव्हाण यांच्या तीन वर्षीय नातवाला शेळ्यांच्या तोंडाला झालेल्या आजाराचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे त्यांच्या घरात व परिसरातही काहीसे भीतीचे वातावरण आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ पाहणी करावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य प्रसाद मोरजकर यांनी केली आहे.

शवविच्छेदन अहवाल पुण्याकडे
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागास या प्रकरणाची माहिती देण्यात आली. यापैकी ७ शेळ्या व बोकड यांचा शवविच्छेदन अहवाल पुणे येथे अधिक तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पशुसंवर्धन अधिकारी वैभव पाटील यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com