राणेंमुळेच असरोंडी रस्त्याला निधी

राणेंमुळेच असरोंडी रस्त्याला निधी

मालवण - असरोंडी-ताठरबाव रस्त्याच्या प्रश्‍नासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण छेडल्यानंतर त्यांच्या आंदोलनाला स्वाभिमानने पाठिंबा दिला. याप्रश्‍नी खासदार नारायण राणे यांनी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधल्यानंतर २ कोटी ३४ लाख रुपयांच्या या कामास तत्काळ मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे राणे यांच्यासह जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत, जिल्हा परिषद सदस्य, स्थानिक ग्रामस्थ, संबंधित यंत्रणा यांच्या अभिनंदनाचा ठराव पंचायत समिती सदस्य सुनील घाडीगावकर यांनी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत मांडला.

ओसरगाव-असरोंडी-शिरवंडे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला होता. या मार्गावरील एसटी वाहतूक बंद केल्याने शालेय विद्यार्थ्यांना पाच किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत होती. त्यामुळे १४ फेब्रुवारी रोजी स्थानिक ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण छेडले. या आंदोलनाला स्वाभिमानने पाठिंबा दिला.

याप्रकरणी खासदार राणे यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी तत्काळ बांधकाम मंत्री श्री. पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे काम दोन दिवसांत मंजूर झाले असून त्याची निविदा प्रक्रियाही होत आहे. १९ रोजी तालुक्‍यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत शिवजयंती उत्सव साजरा करण्यात यावा. याबाबत सर्व संबंधित ग्रामपंचायतींना सूचना करण्यात याव्यात, अशी मागणी श्री. घाडीगावकर यांनी केली. 

वीज वितरणकडून सभागृहाची दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे. त्यामुळे बाणेवाडी नळपाणी योजनेचे काम रखडले आहे. याप्रश्‍नी सभापती, उपसभापती यांनी कणकवली येथे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत लक्ष वेधले जाईल, असे स्पष्ट केले. वारस तपास, स्वतंत्र आणेवारीसह अन्य समस्या भेडसावत असल्याने किसान सन्मान निधी योजना जिल्ह्यात यशस्वी होऊ शकत नाही, असे श्री. घाडीगावकर यांनी सांगितले. यावेळी निधी मुणगेकर, छाया परब, गायत्री ठाकूर यांनी आपल्या भागातील समस्या मांडल्या.

नदी, ओहोळातील वाळू विनामूल्य काढा...
वाळू लिलाव प्रक्रिया न झाल्याने इंदिरा आवास घरकुल योजनेची कामे रखडली आहेत. मुदतीत ही कामे पूर्ण होणार केव्हा, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. संबंधित लाभार्थ्यांनी आता लगतच्या नदी, ओहोळातील वाळू विनामूल्य काढून ही कामे पूर्ण करावीत, असे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com