कोरोनामुक्त मालवण शहरात अखेर कोरोनाचा शिरकाव

प्रशांत हिंदळेकर  | Thursday, 6 August 2020

दोन्ही कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना तपासणी होणार आहे...

मालवण (सिंधुदुर्ग) : कोरोनामुक्त मालवण शहरात अखेर कोरोनाचा शिरकाव झाला. ३० जुलै रोजी तासगाव सांगली येथून शहरात आलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये एक जण तहसिल कार्यालयाचा कर्मचारी असून दुसरा एका बँकेत कर्मचारी आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना तपासणी होणार असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी दिली.

कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून मालवण शहर कोरोनामुक्त राखण्यात प्रशासनाला यश आले होते. मात्र आज शहरात कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने शहरवासीयांमध्ये घबराट पसरली आहे. ग्रामीण रुग्णालयात आज करण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये हे दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह सापडले  आहेत. यातील एक जण शहरातील एका बँकेचा कर्मचारी आहे तर दुसरा तहसिल कार्यालयाचा कर्मचारी आहे. हे दोघेही जण तासगाव सांगली येथून ३० जुलै रोजी येथे आले होते. या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. बँक कर्मचारी हा बांगीवाडा तर तहसिल कर्मचारी मेढा येथील रहिवासी आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती डॉ. बालाजी पाटील यानी दिली.

हेही वाचा- अन् सुटकेचा नि:श्‍वास टाकत त्यांनी पुन्हा घेतली झेप -

नागरिकांनी घाबरून जाऊ नये - उपनगराध्यक्ष राजन वराडकर

मालवणात प्राथमिक तपासणीत दोन रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. यातील एक व्यक्ती होम क्वारंटाईन होती. तर दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात नागरिक येण्याची शक्यता कमीच आहे. यामुळे संबंधित व्यक्ती यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकाने आपली आरोग्य तपासणी करण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधावा. मालवणवासियांनी घाबरून जाण्याची गरज नाही रुग्णांच्या संपर्कातील लोकांनी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेऊन आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे. मालवण पालिकेकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे असे उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी सांगितले. कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीना तपासण्यासाठी जाताना काही अडचणी आल्यास त्यांनी पालिकेशी संपर्क साधावा असे आवाहन श्री. वराडकर यांनी केले आहे.

हेही वाचा-दरड कोसळली ; कोंकण रेल्वे मार्गावरील या पाच गाड्या मिरजमार्गे वळवल्या -

अत्यावश्यक कामाशिवाय कोणी येऊ नये- तहसीलदार पाटणे

शहरात आढळून आलेल्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण तहसील कार्यालयातील असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाखेरीज तहसील कार्यालयात येऊ नये असे आवाहन तहसीलदार अजय पाटणे यांनी केले आहे.

संपादन - अर्चना बनगे