तिलारी नदीत मामा भाचीचा बुडून मृत्यू

कुडासे वानोशी रस्त्यावर दुर्घटना घडली
Tilari River
Tilari RiverSakal

दोडामार्ग - कुडासे येथे तिलारी नदीत आंघोळ करण्यासाठी आलेल्या गोव्यातील मामा भाचीचा बुडून मृत्यू झाला. कुडासे वानोशी मार्गे सासोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दसई नावाने परिचित असलेल्या ठिकाणी सकाळी अकरा साडेअकराच्या दरम्यान दुर्घटना घडली. त्यात तालिगाव (पणजी) येथील विजय पालयेकर (वय ५५) आणि हरमल (पेडणे) येथील तनिषा ठाकूर (वय १३) यांचा मृत्यू झाला. नात्याने दोघे मामा भाची आहेत. दरम्यान, सुरवातीला आणखी एक महिला पाण्यात पडून वाहून जाणार होती; पण त्यांना काठावरच्यांनी हात देवून वर काढल्याने त्या बालंबाल बचावल्या असे सांगण्यात आले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कुडासे दसई येथील कॉजवेच्या खालच्या बाजूला गोव्यातील अनेकजण आंघोळीसाठी आले होते. जिथे दुर्घटना घडली त्याचा बाजूला कोरडे नदीपात्र आहे. तेथे सर्वजण जमा झाले होते. सुरवातीला काहीजण आंघोळीला उतरले. त्यावेळी पायाखालची वाळू सरकून एक महिला पाण्यात पडली व वाहू लागली त्यांना इतरांनी बाहेर काढले. त्यानंतर पालयेकर आणि ठाकूर पाण्यात उतरले;मात्र ते पुढे गेल्यावर पाण्याची खोली वाढली. शिवाय तिथे भोवराही होता. त्यामुळे ते गटांगळ्या खावू लागले. वाचवा वाचवा असे ते मोठ्याने ओरडत होते, तर काठावरचे सर्वजणही कुणीतरी वाचवा म्हणून ओरडत होते. शेवटी बराच वेळ ओरडून कुणीही पुढे न आल्याने ते बुडाले.

दरम्यान, वाचवा वाचवा अशी ओरड ऐकल्यावर वानोशीहून सासोलीकडे जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने तेथील बागेत नारळ काढण्यासाठी आलेल्या यशवंत देसाई यांना कुणीतरी नदीत बुडत असल्याची माहिती दिली. त्यानंतर श्री. देसाई धावत नदीवर गेले. तिथे गेल्यावर त्यांनी ते दोघे बुडाल्याच्या ठिकाणी शोधाशोध केली असता त्यांना पहिल्यांदा पालयेकर सापडले. त्यांना त्यांनी बाहेर काढून काठावर ठेवले व त्यांच्यासोबतच्यांना त्यांना कृत्रिम श्वास देण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला. साधारण पंधरा मिनिटानंतर त्यांना तनिषा आढळली. दरम्यान, सोबतच्या लोकांनी पालयेकर यांना पहिल्यांदा रुग्णवाहिकेतून व नंतर तनिशाला खासगी गाडीतून कासारवर्णे (पेडणे) येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. संबंधितांनी त्या दोघांना येथील ग्रामीण रुग्णालयात न नेता थेट गोव्यात नेल्याने नेले.

'बायला वाचवा'चा काठावर आक्रोश

नदीत बुडणाऱ्या दोघांना वाचवण्यासाठी यशवंत देसाई पाण्यात उतरले तेव्हा काठावरील कुणीतरी 'बायला वाचवा, बायला वाचवा' असा आक्रोश करत होते. शिवाय इतर सर्वजण मोठमोठ्याने विलाप करत होते अशी माहिती देसाई यांनी दिली.

तो स्पॉट पार्टी व हुल्लडबाजांचा

नदीत आंघोळ करायची आणि काठावर पार्टी करायची असा दिनक्रम अनेकांचा असतो. विकेंड असला की पर्यटकांची गर्दी वाढते. दारू आणि बियरच्या बाटल्या रिकाम्या करून हुल्लडबाजी आणि आरडाओरड केली जाते. त्यामुळे नेमके काय घडले ते कळणे कठीण असते. आजची दुर्घटना घडली तेव्हा वाचवण्यासाठी केली जाणारी याचना रोजचाच प्रकार असल्याचे समजून कुणी तो प्रकार गांभीर्याने घेतला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com