ग्रामपंचायती जिंकण्यासाठी पक्षांची तयारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

मंडणगड - तालुक्‍यातील तेरा गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. स्थानिक स्वराज संस्थांची आणि राजकारणाची पहिली पायरी ठरलेल्या ग्रामपंचायतींची सत्ता हाती असल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक सोपी जाते. हे राजकीय गणित असल्याने या निवडणुका जिंकण्याची तयारी पक्षपातळीवरही सुरू झाली आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि आमदार संजय कदम यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार, यात शंका नाही.

गावातील वातावरणात राजकीय रंग भरू लागला आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी पाया भक्कम करण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गावे ताब्यात घेण्याची तयारी केली आहे.

मंडणगड - तालुक्‍यातील तेरा गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. स्थानिक स्वराज संस्थांची आणि राजकारणाची पहिली पायरी ठरलेल्या ग्रामपंचायतींची सत्ता हाती असल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक सोपी जाते. हे राजकीय गणित असल्याने या निवडणुका जिंकण्याची तयारी पक्षपातळीवरही सुरू झाली आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि आमदार संजय कदम यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार, यात शंका नाही.

गावातील वातावरणात राजकीय रंग भरू लागला आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी पाया भक्कम करण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गावे ताब्यात घेण्याची तयारी केली आहे.

विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून निवडणुकीकडे पाहिले जात आहे. यावेळची ग्रामपंचायत निवडणूक ही आधीच्या निवडणुकीपेक्षा वेगळी म्हणजे नगराध्यक्षप्रमाणे थेट जनतेमधून सरपंच निवड असल्याने राजकीय वर्तुळाबरोबरच मतदारांमध्येही उत्सुकता आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीपेक्षा ग्रामपंचायतींना शासनाचा सर्वाधिक निधी मिळत असल्याने या ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ सुरू आहे.

त्यातही सदस्य एका पक्षाचा आणि सरपंच दुसऱ्या पक्षाचा होऊ शकतो. त्यामुळे आपल्याच पक्षाचा सरपंच खुर्चीत विराजमान व्हावा, यासाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. आमदार संजय कदम यांनी विकासकामांवर भर देत ग्रामीण भागातील जनतेला आकर्षित केले आहे.

योगेश कदम यांनी जनसंपर्क वाढ विण्याच्या दृष्टीने कंबर कसली आहे. यावरून ही निवडणूक थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेत होणार असल्याचे सद्यस्थितीतील राजकीय गणित दिसते. त्यामुळे ग्रामपंचायतीचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्ष, कार्यकर्त्यांनी इच्छुक उमेदवारांची चाचपणी 
सुरू केली आहे.

भाजपचे थेट सरपंच निवडीवर लक्ष
ग्रामीण भागात पक्ष बळकट करण्यासाठी भाजपप्रणीत सरकारने थेट सरपंच हे धोरण आखल्याचा राजकीय जाणकारांचा होरा आहे. तालुक्‍यात सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे वर्चस्व समसमान आहे. भाजपने मधल्या कालखंडात विस्तार वाढवण्यावर भर दिल्याने इतर पक्षांतील काही राजकीय मातब्बर नेत्यांनी भाजपमध्ये आपला तळ ठोकला. त्यामुळे भाजप या वेळी थेट सरपंच निवडीवर लक्ष केंद्रित करणार आहे.

पितृपंधरवड्यातच मोर्चेबांधणी

गणपतीपुळे - तालुक्‍यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वारे वाहू लागताच ज्यांना उमेदवारी मिळेल असे वाटते त्यांनी व इच्छुकांनी पितृपंधरवड्याचा फायदा घेत वाडीवस्त्यात भेटीगाठीवर भर दिला आहे. त्यामुळे वाडीवाडीत सध्या परस्पर भेटींचे वातावरण आहे. सध्या पितृपंधरवडा असल्यामुळे प्रत्येक घराघरात धार्मिक विधी होत असल्याने हौशे, नौशे, गौशे त्याला हजेरी लावत आहेत. त्यामुळे मालगुंडमध्ये वाडीवाडीवर भेटीगाठींना महत्त्व आले आहे. 

रत्नागिरी तालुक्‍यात प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या मालगुंड ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा भगवा फडकणार, असा विश्‍वास येथील अनेक वर्षांच्या निवडणुकीचे साक्षीदार असणाऱ्या जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. मालगुंड गावात याअगोदर शिवसेनेची सत्ता होती. सुमारे ११ पैकी ९ शिलेदार शिवसेनेचे भरघोस मतांनी निवडून आले होते व दोन इतर पक्षांचे निवडून आले होते. यापैकी एक उमेदवार अपक्ष व एक उमेदवार इतर पॅनलकडून निवडून आला. मात्र, या दोन्ही उमेदवारांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मालगुंड ग्रामपंचायतीवर शिवसेनेची एकहाती सत्ता होती. तशीच सत्ता कायम राहिल, असा विश्‍वास येथील शिवसैनिक व्यक्त करीत आहेत. 

शिवसेना मालगुंड गावात घराघरात रुजली आहे. त्यातच पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आमदार उदय सामंत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मान वर काढलीच नाही. त्यामुळे या गावात सर्वपक्षीय पॅनल जरी उभे राहिले तरी फक्त शिवसेनेचाच झेंडा या ग्रामपंचायतीवर फडकेल, असा विश्‍वास शिवसैनिक व्यक्त करीत आहेत. येथे सेनेने केलेल्या विकासकामांच्या जोरावर प्रचार होईल. मात्र सेनेच्या विरोधात उभे राहाणारे सर्वपक्षीय पॅनल कोणता विषय घेऊन मतदारांपुढे जाणार, याचे कुतुहल आहे. मालगुंड हे गाव सर्वपक्षीय नेत्यांचे माहेरघर समजले जाते. या गावातून अनेक पक्षांना मातब्बर नेते मंडळी मिळाली आहेत. त्यामुळे त्यांचा प्रभाव लक्षात घेता ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी रंगत येणार हे नक्की आहे.

Web Title: mandangad kokan news grampanchyat election preparation