१६९ पूरग्रस्तांची सुटका; नंतर मृत्यूशी झुंज

सचिन माळी
बुधवार, 12 जुलै 2017

राजेंद्र गुजर यांचे बलिदान आणि कुटुंबाचे देशासाठीचे योगदान हे तालुक्‍याला प्रेरणादायी व अभिमान वाढवणारे आहे.
- ज्ञानदेव खांबे, सामाजिक कार्यकर्ते- मंडणगड

मंडणगड - पालवणी-जांभुळनगर येथील गुजर कुटुंबीयांची सैनिकी परंपरा अवघ्या कोकणसाठी प्रेरणादायी आहे. अरुणाचल प्रदेशमधील दुर्दैवी हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेले फ्लाईट इंजिनिअर राजेंद्र गुजर यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या आपत्तीने प्रत्येकजण हळहळला आहे. दुर्दैवाचा घाला येण्यापूर्वी राजेंद्र यांनी १६९ जणांची पुरातून सुटका केली होती.

पालवणी जांभुळनगर येथील अनेकजण सैन्यदलात देशाची सेवा बजावत आहेत. येथील राजेंद्र यांचे वडील निवृत्त मेजर यशवंत गुजर हे सैन्यदलात होते. त्याचबरोबर त्यांचे मोठे भाऊ शाम गुजर हे लष्करात गेली १४ वर्षे देश सेवा बजावत आहेत. 

राजेंद्र गुजर हेही वयाच्या अठराव्या वर्षीच वायुदलात दाखल झाले होते. आपल्या दोन्ही मुलांनी सैन्यदलात जावे, असे निवृत्त मेजर यशवंत गुजर यांची प्रबळ इच्छा होती. त्या दृष्टीने त्यांनी लहानपणापासूनच दोन्ही मुलांवर सैनिकी संस्कार केले. त्यामुळेच आपल्या वडिलांच्या निर्णयाचा आदर करत दोन्ही मुले अथक मेहनत घेऊन सैन्य दलात दाखल झाली. सार्जंट राजेंद्र गुजर यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये पूरग्रस्तांना वाचवताना ध्रुव हेलिकॉप्टरच्या साह्याने १६९ जणांची पुरातून सुखरूप सुटका केली.

सोमवारी (ता. १०) राजेंद्र गुजर यांना अखेरची सलामी देण्यासाठी हजर असलेल्यांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती. तालुक्‍यात अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडल्याने तालुकावासीयांची मने हळहळत होती. गुजर कुटुंबीयांबद्दल अभिमानही व्यक्त होत होता. तालुक्‍यातील अनेक गावातून लोक अखेरच्या सलामीसाठी दाखल झाले होते. 

आपल्या तालुक्‍यातील एक सैनिकाला पूरग्रस्तांना वाचवताना दुर्दैवी मरण आले, त्याबद्दल साऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. देशसेवेसाठी देह ठेवण्याची वेळ आलेल्या आपल्या तालुक्‍यातील सैनिकाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता. पार्थिव येण्यासाठी विलंब झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: mandangad news konkan news