आंबा संस्थानी निर्यात क्षेत्रात उतरावे - देवेंद्र कुमार सिंह

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

प्रक्रियेसाठी स्थानिक हापूस आंबा कमी पडत असेल तर अन्य ठिकाणचा आंबा आणून प्रक्रिया व्यवसाय वाढवावा असे भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या कृषि आणि प्रसंस्कृत खाद्य उत्पाद निर्यात विकास प्राधिकरणचे (एपीडा) अध्यक्ष देवेंद्र कुमार सिंह यांनी यावेळी सुचित केले. 

देवगड - लुक्यातील शेतकर्‍यांचा माल स्थानिक पातळीवरूनच निर्यात करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या कृषि आणि प्रसंस्कृत खाद्य उत्पाद निर्यात विकास प्राधिकरणचे (एपीडा) अध्यक्ष देवेंद्र कुमार सिंह यांनी देवगडमधील भेटीदरम्यान केले. प्रक्रियेसाठी स्थानिक हापूस आंबा कमी पडत असेल तर अन्य ठिकाणचा आंबा आणून प्रक्रिया व्यवसाय वाढवावा असेही त्यांनी यावेळी सुचित केले.

तालुक्यातील आंबा उत्पादन, देवगड हापूसचे वैशिष्ट्य तसेच येथील प्रक्रीया व्यवसाय आणि त्यापासूनची विविध उत्पादने याची माहिती घेण्यासाठी एपीडाचे अध्यक्ष देवेंद्र कुमार सिंह येथे आले होते. त्यांच्यासोबत एपीडाचे जॉईंड सेक्रेटरी (वाणिज्य) संतोष सारंगी, एपीडाचे सहायक महाप्रबंधक (क्षेत्रिय प्रभारी) प्रशांत वाघमारे आदी होते. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे संचालक सुधीर जोशी, डी. बी. बलवान, व्यवस्थापक संतोष पाटकर, सहायक व्यवस्थापक राजेंद्र शेटये, तालुका कृषि अधिकारी पी. एन. दडस आदी उपस्थित होते. एपीडाच्या अधिकार्‍यांनी सुरूवातीला दहिबांव येथील ओगले यांच्या प्रकीया व्यवसायाची पहाणी केली. त्यांच्या विविध प्रक्रीया उत्पादनाची माहिती त्यांनी श्रीधर ओगले यांच्याकडून जाणून घेतली. आंबा यासह अन्य उत्पादनाची सखोल माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर आंबा उत्पादक संस्थेच्या दाभोळे येथील फळप्रक्रीया प्रकल्पाची पहाणी करून प्रक्रीया उत्पादन वाढवण्याबाबत भविष्यात काय करण्याची गरज आहे आणि त्यासाठी शासन काय करू इच्छिते याची माहिती दिली. या चर्चेदरम्यान त्यांनी देवगड हापूसचे वेगळेपण का आहे याची माहिती घेतली. देशातील अन्य ठिकाणचे आंबा उत्पादन आणि देवगड हापूस याची माहिती जाणून घेतली. ‘देवगड हापूसला’ पेटंट मिळणे का आवश्यक आहे याची माहिती संस्थेच्यावतीने त्यांना देण्यात आली. शासनाकडून आंबा उत्पादकाच्या काय अपेक्षा आहेत याचीही चर्चा यावेळी झाली. तालुक्यातील आंबा उत्पादकांनी थेट निर्यात क्षेत्रात उतरल्यास आर्थिक उन्नती साधण्यास मोठा वाव असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. तसेच प्रक्रीयेसाठी स्थानिक हापूसवरच अवलंबून न राहता अन्य ठिकाणचा आंबा येथे आणून व्यवसाय वाढवण्याचे सुचित केले. यानंतर अधिकार्‍यांनी जामसंडे येथील आंबा हाताळणी व निर्यात सुविधा केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. 

जिल्हाधिकार्‍यांसमवेत चर्चा - 
प्रातिनिधीक स्वरूपात जिल्ह्यातील काही आंबा, काजू उत्पादक तसेच प्रक्रिया उत्पादक यांच्याशी ‘एपीडा’च्या अधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या उपस्थित ओरोस येथे बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी विविध विषयावर चर्चा झाली.

Web Title: Mango Organization should work in export sector says devendra kumar sigh