खारफुटी रोपवाटिका गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी खारफुटींच्या वनांचे महत्त्व लक्षात घेऊन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा प्राणीशास्त्र विभाग त्यांच्या संरक्षण व संवर्धनाबाबत क्रियाशील आहे. खारफुटीची रोपवाटिका महाविद्यालयाच्या आवारात तयार करून त्या रोपांची लागवड रत्नागिरीच्या खाडी परिसरातील ज्या भागामध्ये खारफुटींची संख्या कमी होत आहे, अशा ठिकाणी करण्यासाठी प्राणिशास्त्र विभाग प्रयत्नशील आहे. 

रत्नागिरी - पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी खारफुटींच्या वनांचे महत्त्व लक्षात घेऊन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा प्राणीशास्त्र विभाग त्यांच्या संरक्षण व संवर्धनाबाबत क्रियाशील आहे. खारफुटीची रोपवाटिका महाविद्यालयाच्या आवारात तयार करून त्या रोपांची लागवड रत्नागिरीच्या खाडी परिसरातील ज्या भागामध्ये खारफुटींची संख्या कमी होत आहे, अशा ठिकाणी करण्यासाठी प्राणिशास्त्र विभाग प्रयत्नशील आहे. 

खारफुटीची वने ही खाडी भागात एका विशिष्ट अधिवासात वाढतात. मॅंग्रूव्ह सोसायटी ऑफ इंडियाशी प्राणीशास्त्र विभाग संलग्न आहे. त्याद्वारे खारफुटी वनांच्या संरक्षणासाठी विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत.

खारफुटीच्या प्रजोत्पादनाची प्रक्रिया एका विशिष्ट मुकुलिकेच्या (शेंगेच्या) रूपात पूर्ण होत असते. दरवर्षी एप्रिल ते जून या काळात त्या मुकुलिका परिपक्व होऊन पाण्यात रुजून येतात. खारफुटीची वने हे विविध प्रकारच्या प्राणी तसेच पक्षांचे निवासस्थान आहे. त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ही वने निसर्गातील जैवविविधतेचे जतन करत आहेत. 

प्राणीशास्त्र विभागातर्फे मालवण येथील आचरा- जामडूलवाडी येथे एकदिवसीय सहलीचे आयोजन केले. जामडूलवाडी भागातील खाडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात खारफुटीची वने आहेत. तेथील स्थायिक प्रमोद वाडेकर हे निसर्गप्रेमी असून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता ते खारफुटीच्या वनांचे संरक्षण करतात. सहलीमध्ये द्वितीय वर्ष विज्ञान शाखेत शिकणारे विद्यार्थी व प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मधुरा मुकादम, प्रा. अंबादास रोडगे, प्रा. मोहिनी बामणे व प्रा. मयुरेश देव सहभागी झाले. त्या वेळी वाडेकर यांनी खारफुटीच्या विविध प्रजातींची माहिती व ओळख करून दिली. त्यांची रोपवाटिका तयार करण्यासाठी मार्गदर्शनही केले. रोपवाटिका प्रकल्पाला प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mangrove nursery Gogate Jogalekar college