मुंबई गोवा महामार्गावरील नद्यांना पूर ; हा मार्ग बंद....

राजेश कळंबटे | Wednesday, 5 August 2020

मुसळधार पावसाने जिल्ह्यात दणादण उडवली असून जिकडे तिकडे जलप्रलय निर्माण झाला आहे.

रत्नागिरी :  मुसळधार पावसामुळं जिल्ह्यात धुमाकूळ घातलेला असून मुंबई गोवा महामार्गावरील अनेक मोठ्या नद्यांना पूर आला आहे. बावनदी,  अर्जुना पाठोपाठ अंजणारी नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे  त्याचा फटका मुंबईहुन गावाकडे परतणाऱ्या चाकमान्यांना बसला आहे. 

मुसळधार पावसाने जिल्ह्यात दणादण उडवली असून जिकडे तिकडे जलप्रलय निर्माण झाला आहे.  रायगडपासून रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यंत सगळेच भाग पावसाने बाधित झाले आहेत. जगबुडी, वाशिष्ठी,  सावित्री,  बावनदी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी केव्हाही रस्त्यावर येण्याची शक्यता आहे.  या मार्गावरील ब्रिटिशकालीन बावनदीचा पूल सकाळी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.  पाठोपाठ अर्जुना नदीवरील पूलही पूर परिस्थिती पाहून बंद केल्याने वाहतूक करणाऱ्यांची तारंबळ उडाली आहे.  रत्नागिरी  ते लांजा मार्गांवर असलेला अंजणारी पूलही प्रशासनाने वाहतुकीस बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 

हेही वाचा- चांदेराई बाजारपेठेत पाणीच पाणी ; भरती वेळी पाणी वाढण्याची शक्यता.. -

काजळी नदीने कालपासून धोक्याची पातळी ओलांडली आहे.  किनारी बघ जलमय झाले आहेत.  पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे काजळी पातळी स्थिर असून त्यात भर पडत आहे.  काजळीची नियमित पातळी 16.50 मीटर आहे. पावसामुळं ती पातळी ओलांडली असून 17.50 इतकी आहे.  धोक्याच्या पातळी पेक्षा एक मीटरने जास्त पाणी वाहत असून आंजणारी पुलाच्या कठड्याला पाणी लागले आहे.  पाणी केव्हाही पुलावरून जाण्याची शक्यता आहे.  तसेच हा पूल खूप जुना असल्यामुळे प्रशासनाने सुरक्षितता म्हणून महामार्गावरील वाहतूक या पुलावरून बंद केली आहे. 

रत्नागिरीत अतिवृष्टी : संगमेश्वरमध्ये बावनदीने धोक्याची पातळी ओलांडली..... -

गणपती उत्सवासाठी अनेक चाकरमानी क्वारंटाईन कालावधी पूर्ण करण्याच्या दृष्टीने काही दिवस आधीच गावाकडे निघाले आहेत.  त्यांना या पावसाचा फटका बसला असून ठिकठिकाणी वाहतूक बंद केल्यानं ते अडकून पडले आहेत.  त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.  पावसाचा फटका असाही चाकरमान्यांना बसला आहे.  रस्त्यातचं अडकून पडल्याने गैरसोय होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात नद्यांना पूर ,मुंबई गोवा महामार्ग ठप्प
 गेल्या 40 तासांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने जवळपास सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.  सुरक्षिततेचा उपाय म्हणून मुंबई-गोवा महामार्गावर काही ठिकाणी वाहतूक थांबविण्यात आली आहे.
  खेड मधील जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहत आहे.  येथे इशारा पातळी 6 मीटर असून धोक्याची पातळी 7 मीटर आहे.  सध्या प्रवाह 6.75 मीटरवर आहे.

इतर नद्यांची स्थिती खालीलप्रमाणे 

कंसातील आकडे अनुक्रमे धोका पातळी व इशारा पातळीचे आहेत.
चिपळूण वाशिष्ठी 4.88 मी. (5 मी. व 7 मी.), लांजा काजळी 18.34 (16.5 मी व 18 मी.) राजापूर, कोदवली 8.20 (4.90 मी व 8.13 मी), खेड जगबुडी 6.75 मी. (6 मी व 7 मी.),  संगमेश्वर शास्त्री  6.40 मी. (6.20 मी. व 7.80 मी.), संगमेश्वर सोनवी 6.20 मी. (7.20 मी व 8.60 मी.),  लांजा मुचकुंदी 2.40 मी. (3.50 मी व 4.50 मी.), संगमेश्वर बावनदी 11.80 मी. (9.40 मी व 11 मी.)

पाटगावला घरावर झाड कोसळून नुकसान

▪️देवरुख : नजीकच्या पाटगाव पागार वाडीतील ग्रामस्थ  दिपक महादेव भालेकर यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले आहे. 

▪️तालुक्यात आजही पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याचा वेग कायम असून अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत.  बावनदी पुर : वांद्री बाजारपेठेत पुराचे पाणी 

▪️संगमेश्वर : बावनदीला आलेल्या पाण्याने वांद्री बाजारपेठेत शिरकाव केला आहे. 

▪️येथील ग्रामदेवता मंदिराला पाणी टेकले असून ग्रामस्थांची धावपळ उडाली आहे.

▪️पाण्याचा जोर वाढत असल्याने अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.

संपादन - अर्चना बनगे