अनधिकृत आरोग्य शिबीरावर कारवाई 

marathi news illegal health camp police action
marathi news illegal health camp police action

सावंतवाडी - तब्बल पन्नास प्रकारच्या आरोग्य तपासण्याचा दावा करीत येथील श्रीराम वाचन मंदीर येथे एका खासगी संस्थेकडून आयोजित करण्यात आलेले आरोग्य शिबीर सावंतवाडीतील डॉक्टर संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी बंद पाडले. चुकीच्या पध्दतीने लोकांना आवाहन करुन हा प्रकार सुरु आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी आणि संबधित शिबीराच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उपस्थित डॉक्टरांनी केली. यावेळी अधिकृत परवानग्या न घेता आपण शिबीर आयोजित केले, अशी कबूली देत आयोजकांनी हे शिबीर गुंडाळले.

हदयस्वास्थ फांउडेशन पुणे आणि कार्डीओ डायबेटीक हॉस्पीटलच्या माध्यमातून येथील श्रीराम वाचन मंदिरच्या सभागृहात आज आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान त्या ठिकाणी डायबेटीस, हदयरोग, थायरॉईड, बध्दकोष्ट या रोगांसह संधीवात, आमवात अशा विविध पन्नास आजाराचे उपचार करण्यात येतील. तसेच आमच्या उपचारानंतर मधुमेहाच्या रुग्णांना इन्सुलीन किंवा गोळ्यांची गरज नाही, असा दावा करण्यात आला होता. यासाठी प्रत्येकी 999 रुपये आकारण्यात आले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडीतील डॉक्टर संघटनेने काल याला विरोध दर्शविला होता. तसेच त्यासाठी परवागनी देण्यात येवू नये, अशी मागणी पोलिस आणि पालीकेकडे केली होती. मात्र या विरोधाला झुगारुन आयोजक डॉ. कुलकर्णी यांनी आपल्या सहकार्‍यांच्या माध्यमातून सकाळपासून हे शिबीर सुरु केले. 
दरम्यान याबाबतची माहिती मिळताच संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी हे शिबीर बंद पाडण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी जगदिश पाटील तसेच गटविकास अधिकारी गजानन भोसले उपजिल्हा रुग्णालयाचे वैदयकीय अधिक्षक उत्तम पाटील आदींना त्या ठिकाणी बोलाविले. यावेळी प्रस्तुत अधिकार्‍यांनी त्या ठिकाणी असलेले आयोजक डॉ. कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. परंतू ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. अखेर त्या ठिकाणी जमलेल्या डॉक्टरांनी या प्रकाराला आपला तीव्र विरोध दर्शविला. तसेच संबधित डॉ. कुलकर्णी हे डॉक्टर असले तरी ते पत्रक वाटून पेशाला बदनाम करीत आहे. तसेच लोकांना बोगस आणि चुकीची ट्रीटमेंट देत आहेत. त्यामुळे या प्रकाराला जबाबदार कोण? असा प्रश्‍न करीत संबधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याचे सर्व तपासणी साहित्य जप्त करण्यात यावे, अशी मागणी केली. 

यावेळी त्या ठिकाणी डॉ. कुलकर्णी यांची कागदपत्रे तपासली असता त्यांनी कोणत्याही शासकीय अधिकार्‍यांकडून परवागनी न घेतल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हाच दाखल करा. अन्यथा आम्ही उद्या जिल्हाभरात बंद पुकारु, असा इशारा दिला. 
काही वेळाने त्या ठिकाणी पोलिस उपनिरिक्षक अमित गोटे आपल्या सहकार्‍यांना घेवून दाखल झाले.त्यांच्याकडे संबधित डॉक्टरकडून सुरू असलेले शिबीर हे बेकायदेशी आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. तसेच तालुका आरोग्य अधिकार्‍यांना या विरोधात तक्रार देण्याच्या सुचना केल्या. मात्र घडलेली घटना ही शहरात येत असल्यामुळे पालिकेच्या अधिकार्‍यांनी याबाबत पुढील भूमिका ठरवावी, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर डॉ. परुळेकर यांनी थेट जिल्हा शल्यचिकीत्सक आणी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली आणि झालेल्या प्रकाराची चौकशी करुन संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. डॉ. कुलकर्णी यांनी आपण केलेले शिबीर हे परवागनी शिवाय होते, असे कबुल केले. ते त्याच ठिकाणी थांबवत असल्याचे जाहीर केले. तसेच येथे आलेल्या रुग्णांचे पैसे आणि त्यांचा येण्याजाण्याचा खर्च दिला. 'गोळ्या इन्सुलीन बंद करा असा दावा संबधित डॉक्टरांकडून केला जात आहे. मात्र एखाद्या रुग्णाने खरोखरच तसा निर्णय घेतला आणी काही बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न करुन डॉ कुलकर्णी यांच्याकडुन सुरू असलेला प्रकार हा चुकीचा आहे त्यामुळे त्याचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे या मागणीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.' असे मत सावंतवाडी मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश नवांगुळ यांनी व्यक्त केले.

याबाबत पोलिस उपनिरिक्षक गोटे म्हणाले, याबाबत संबधितांची चौकशी जिल्हास्तरावरुन करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे तुर्तास याबाबत काहीही पोलिस ठाण्यात दाखल नाही. तर हा प्रकार चुकीचा असून याची आपण इंडीयन मेडीकल असोसिएशनकडे तक्रार करणार असल्याचा इशारा डॉ. जयेद्र परुळेकर यांनी दिला आहे. यावेळी शंतनू तेंडोलकर, मिलींद खानोलकर, सतिश सावंत, अनिश स्वार, कश्यप देशपांडे, धीरज सावंत, श्रेयस परब, गोविंद जाधव, चद्रकांत मगदुम, सुप्रिया लोकेगावकर, संजना देसकर, सुरज देसकर, राजशेखर कार्लेकर, सर्वेश पेटे, अमृत गावडे, प्रसाद नार्वेकर आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com