शिकारीच झाले रक्षक

marathi news kokan bird aadivasi forest prey
marathi news kokan bird aadivasi forest prey

पाली (जि. रायगड) - अनेक आदिवासी बांधव गायबगळ्याची शिकार करुन त्याला खातात. परंतू माणगाव तालुक्यातील पाटनुस गावाजवळ असलेल्या साजे आदिवासी वाडीत मात्र याला अपवाद बघायला मिळाला. साजेवाडीतील एका मुलाने गायबगळा पकडून आणून तो चक्क पाळला आहे. पाळीव कोंबडीप्रमाणे त्याला चरण्यासाठी सोडण्यात येते. त्याला काहीजण खायला देखील टाकतात. काही जण तर त्याला उचलून कवेत घेतात. 

वाडीमधील लहान, थोर सर्व मंडळी त्याची पाळीव पक्षाप्रमाणे काळजी घेतात. आदिवासी समाज म्हणजे जंगलाची इतंभूत माहिती असणारा आणि निसर्गाच्या बदलांना जाणणारा समाज आहे. आपले संपूर्ण आयुष्य जंगलामध्ये घालवणारा, प्राणी, पक्षी, वनऔषधी, जीवजंतू, सरपटणारे जीव याविषयी ज्ञानाचा ओतप्रोत साठा आणि दररोज नित्याने या गोष्टींशी संबंध येणारा समाज म्हणून तर यांना "जंगलाचे खरे राजे" म्हणून ओळखले जाते. 

येथील शिक्षक राम मुंढे यांनी 'सकाळ'ला सांगितले की उत्तुंग अशा सह्याद्री पर्वताच्या पसरलेल्या रांगाच्या पायथ्याशी असलेले पाटनुस हे गाव माणगाव तालुक्यात येते या गावाच्या अवतीभोवती सर्व भाग जंगलांचा आणि याच भागात आदिवासी समाज छोट्या छोट्या वाड्या वस्त्या करुन एकोप्याने राहतो. सर्वच आदिवासी बांधव शिकलेले आहेत असे नाही. काही गरीब वयस्कर, तरुण, लहान मुले हे दिवसभर मग जंगलात फिरतात आणि शिकारीसाठी काही मिळते का ते पाहतात. दिवसभर हातात पक्षी मारण्यासाठी बेचकी घेऊन जंगलाची पाहणी करायची व संध्याकाळी त्या भागात जाऊन फासे लावायचे. ज्यामध्ये काही वन्यजीव अडकले कि त्यांचे मांस खायचे, काही नाही मिळाले तर मग नदी मधील मासे पकडायचे असा यांचा दिनक्रम असतो. परंतु जंगलतोड व शिकार यामुळे जंगलातील वन्य जीवांचा वावर कमी झालेला असल्यामुळे आता या लोकांचा मोर्चा वळला तो गायबगळे यांच्या थव्याकडे. गायबगळा जो नेहमीप्रमाणे चरत असलेल्या गाईच्या, म्हशींच्या अवतीभोवती वावरणारा व त्यांच्या अंगावरील लहान लहान किडे, गोचीड, माश्या यांच्या वर ताव मारणारा पक्षी. साधारणतः 51 सेंमी लांबीचा, नेहमी थव्याने राहणार. हा पक्षी दिवसभर गुरांच्या मागे, पाणथळ जागी, नदीच्या काठावर झाडावर बसलेला आढळतो. परंतु आदिवासी शिकारी लोकांनी बेचकीच्या साहाय्याने याचीही शिकार करायला सुरुवात केली आणि शिकार करून त्याला भाजून खाणे हि जणू दिनचर्याच बनली आहे. 

पाटनुस भागात कुंडलिका नदीच्या पात्रात या पक्षाची शिकार करून खाल्लेली अनेक ठिकाणे निदर्शनास येतात. त्यामध्ये या पात्रात पक्षाची पिसे व त्याला भाजून खाण्यासाठी तय्यार केलेल्या छोट्या छोट्या चुली आढळतात. हि पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेची गोष्ट आहे. परंतू साजे आदिवासी वाडीतील या घटनेमुळे आश्चर्य होते. या गायबगळ्याने येथील लहान थोरांना जो लळा लावला आहे आणि त्याचे ज्या प्रमाणे संगोपन केले जात आहे. हे पाहून आशेचा किरण डोकावत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com