आदिवासी, गरीब व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटून मुलाचा वाढदिवस साजरा

अमित गवळे 
रविवार, 4 मार्च 2018

आपल्या मुलाचा वाढदिवस साधेपणाने साजरा करून गरीब, गरजू मुलांना आवश्यक भेटवस्तू देण्याचा विचार पाटील दाम्पंत्याच्या मनात आला. त्याप्रमाणे त्यांनी सुधागड तालुक्यातील आदिवासी, कातकरी - ठाकूर बहूल भागातील जिल्हा परिषदेच्या शरदवाडी शाळेतील २५ विद्यार्थ्यांना व गावातील १५ विद्यार्थ्याना अशा एकूण ४० विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भेट म्हणून दिल्या.

पाली (जि. रायगड) - आपल्या लहान मुलाचा वाढदिवस म्हटला की, प्रत्येकजण पार्टीचा तर कोणी पर्यटन ठिकाणी जाऊन सेलिब्रेशन करण्याचा बेत आखतात. मात्र प्रशांत नारायण पाटील व त्यांच्या पत्नी निलम पाटील या दाम्पंत्याने आपला मुलाचा वाढदिवस रा. जि. प. शाळा शरदवाडी येथील आदिवासी,गरीब व गरजू मुलांना नवीन कपडे, स्कूल बॅग, शालेय वस्तू व खाऊ वाटप करुन साजरा केला. प्रशांत पाटील हे सेंट गोबेन्स कंपनी (मुंबई, अंधेरी) येथे ट्रेडिंग मॅनेजर पदावर कार्यरत आहे. आपल्या मुलाचा वाढदिवस साधेपणाने साजरा करून गरीब, गरजू मुलांना आवश्यक भेटवस्तू देण्याचा विचार पाटील दाम्पंत्याच्या मनात आला. त्याप्रमाणे त्यांनी सुधागड तालुक्यातील आदिवासी, कातकरी - ठाकूर बहूल भागातील जिल्हा परिषदेच्या शरदवाडी शाळेतील २५ विद्यार्थ्याना व गावातील १५ विद्यार्थ्यांना अशा एकूण ४० विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भेट म्हणून दिल्या. यावेळी लहानग्यांचा चेहऱ्यावरीला आनंद पाहण्यासारखा होता. यावेळी प्रशांत पाटील यांचे वडील नारायण पाटील (निवृत्त मुख्याध्यापक, बीएमसी, वरळी) यांनी विद्यार्थ्याशी व शिक्षकांशी हितगुज केली. आनंददायी व उत्साही शालेय वातावरण पाहून शिक्षकांचे कौतुक केले. शाळेचे मुख्याध्यापक संतोष तुरे व सहशिक्षिका ज्योती तुरे यांनी पाटील दाम्पंत्याचे शाळेच्या वतीने आभार मानले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महादू पुजारे व सदस्य उपस्थित होते.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संतोष तुरे यांनी आपले मत व्यक्त केले, 'पाटील दाम्पंत्य शाळेत आले. त्यांनी त्यांच्या अभिनव उपक्रमाबद्दल आम्हाला सांगितले. आम्ही त्याचे स्वागत केले. त्यांनी दिलेल्या भेटवस्तूमुळे विद्यार्थ्यांसहित आम्हांलाही खूप आनंद झाला. अशा निस्पृह माणसांमुळेच समाजाचा आणि देशाचा विकास होत आहे.' 

 

Web Title: marathi news kokan birthday celebration education kit need students